आग्या : (लॅ. अर्टिका इंटरप्‍टा कुल–अर्टिकेसी). हे वर्षायू (एक वर्ष टिकणारे ) झाड श्रीलंका, मलेशिया, पॅसिफिक बेटे, चीन इथिओपिया, भारत इ. देशात आढळते. त्यांच्या सर्व भागावर दाहक केस असतात. त्यांना इंग्रजीत ‘स्टिगिंग नेटल्स’ म्हणतात. त्यांची पुष्पसंरचना व सामान्य शारिरीक लक्षणे– ⇨ अर्टिकेसी कुलात वर्णिल्या प्रमाणे खोड १·५ मी. पर्यंत उंच सरळ, लवचिक व शाखायुक्त असते पाने मोठी, अंडाकृती व निमुळत्या टोकाची, उपपर्णे लांब व विभागलेली ऑगस्टमध्ये लहान हिरवी फुले पानांच्या बगलेत अंकुठित फुलोऱ्यावर येतात पुं-पुष्पे थोडी, लवकर कोमजणारी स्त्री पुष्पातील परिदले पेल्याप्रमाणे फळ शुष्क, एकबिजी न फुटणारे व चपटे.

‘बिचू’ या नावाची दुसरी जाती (अर्टिका डायोका)वायव्य हिमालय व काश्‍मीर ते सिमल्यापर्यंत आढळते. तिचे मूळ मूत्रल (मूत्रवर्धक), तिचा काढा स्तंभक्त(आकुंचन करणारा), आर्तवजनक (विटाळ सुरू करणारा), कृमिनाशक असतो . क्षय, कावीळ, मुत्रपिंडदाह, लघवीतून रक्त जाणे इत्यादींवर गुणकारी. बिचू व लाल बिचू (लॅ.फ्यूरिया इंटरप्‍टा) ह्या दोन्ही कंडू उत्पन्न करणाऱ्या आहेत.

ज्ञानसागर, वि. रा.