सुकाणू : (क. तंडे लॅ. सेर्बेरा ओडोलम कुल-ॲपोसायनेसी). या मोठ्या सदापर्णी क्षुपाचा किंवा लहान वृक्षाचा प्रसार भारतात (विशेषतः द. कोकण, उ. कारवार व मलबार या ठिकाणी) सामान्यपणे खाऱ्या दलदलीमध्ये सर्वत्र आहे. शिवाय चीन, मलाया, ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक बेटे येथेही तो आढळतो. याची साल पांढरी असते. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲपोसायनेसी (करवीर) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फांद्या लहान मंडलित असून त्यावर पर्णव्रण असतात. पाने लांबट-कुंतसम, प्रकुंचित, अखंड, चकाकीयुक्त व देठाकडे निमुळती होत जातात. फुलोरा-अग्रस्थ, गुलुच्छ-वल्लरी आणि फुले पांढरी, सुवासिक, क्वचित पिवळसर असून जून–जानेवारीपर्यंत येतात. फळ अश्मगर्भी असून त्यात एकच साधारण चपटे व रुंद बी असते.

सुकाणूची साल रेचक असते. कपाली (फळातील बाठा) मादक व विषारी असून फळ जलसंत्रास रोगावर उपयुक्त असते. वाळलेल्या बियांच्या मगजात सु. ४३·१% तेल, सेर्बेरिन ग्लुकोसाइड व कडू ओडोलिन असते. तेल दिव्यासाठी व केसांसाठी वापरतात. सालीपासून धागा काढतात.

पहा : वनस्पति, विषारी.

जमदाडे, ज. वि.