आभाळ : (१) फळे व स्त्री शंकू असलेली फांदी, (२) पुं-शंकुधारक फांदी, (३) पुं-शंकु, (४) स्त्री-शंकू, (५) पक्व 'फळ'.

आभाळ : (होशा इं. कॉमन जूनिपर हिं. आरार लॅ. जूनिपेरस कॉम्यूनिस, कुल-क्युप्रेसेसी). ð प्रकटबीज वनस्पतींपैकी (गण कॉनिफेरेलीझ) जूनिपेरस  वंशातील ह्या जातीची झाडे आर्क्टिक सागरापासून सर्व युरोप (दक्षिणेत १२४० – २४८० मी. उंचीवर), मध्य व उ. आशिया, पू. व प. अमेरिका इ. प्रदेशांत फार मोठ्या प्रमाणावर व भारतात प. हिमालयात (१५०० – ४३५० मी. उंचीवर) आढळतात. यांचा आकार परिस्थितीप्रमाणे क्षुपापासून (झुडूपापासून) ते १५ मी. उंच वृक्षापर्यंत असतो. साल लालसर पिंगट पाने साधी, लहान सुईसारखी पण काहीशी चपटी, तीक्ष्ण टोकाची व प्रत्येक पेऱ्यावर तीन (मंडलित) असतात. मार्च-एप्रिलात स्त्री-शंकू व पुं-शंकू (प्रजोत्पादक अवयव) स्वतंत्र झाडावर येतात. पुढल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरात स्त्री-शंकूपासून गोल, लाल किंवा गर्द जांभळे, मांसल फळासारखे शंकुफळ बनते व त्यात बहुधा तीन बिया व प्रामुख्याने मांसल शल्कपर्णाचा (खवल्या पानांचा ) भाग असतो. या फळाचे तेल कातडीस लागल्यास आग होते फळे व तेल उत्तेजक, मूत्रल, जंतुनाशक, वायुनाशी असून परमा, कटिवात, शोफ (सूज) व पोटशूल (पोटात होणाऱ्या वेदना) इत्यादींवर देतात ‘जिन’ नावाच्या मद्याला स्वाद आणण्यास हे तेल घालतात लाकूड सुगंधी असते.

पहा : जूनिपर कॉनिफेरेलीझ.

परांडेकर, शं. आ.