लोगॅनिएसी : (कुचला कुल). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] लोगॅनिएलीझ (कंटॉर्टी) गणातील पाच कुलांपैकी एक कुल. ह्यामध्ये सु. ३३ प्रजाती व ६०० जाती समाविष्ट असून त्याओषधी, क्षुपे (झुडपे) व वृक्ष आहेत. त्यांचा प्रसार मुख्यत्वे उष्ण कटिबंधात आणि शिवाय उपोष्ण कटिबंध, दक्षिण समशीतोष्ण कटिबंध, उत्तर अमेरिका, चीन, न्यूझीलंड इ. प्रदेशांत आहे. ह्या कुलातील कित्येक जाती प्रताने (तणावे) व अंकुश (आकडे) यांच्या सहाय्याने किंवा फक्त खोडाने वेटोळे घालीत वर चढणाऱ्या वेली [⟶महालता] आहेत. काही जातींत अंतःपरिकाष्ठ (आतील अन्नरसवाहक भाग) आणि कुचल्याच्या व इतर काही प्रजातींत ‘अंतःप्रकाष्ठी’ (प्रकाष्ठात विखुरलेले) परिकाष्ठ आढळते. पाने साधी, संमुख (समोरासमोर), अखंड, क्वचित रेखीव (रेषेप्रमाणे फार अरुंद) आणि तळाशी पेऱ्यावर रेषेने किंवा उपपर्णी (उपांगासारख्या) आवरकाने जोडलेली असतात. उपपर्णे विविध असतात. फुलोरा एक-द्वि-त्रि-पद वल्ली [⟶पुष्पबंध] व फुले द्विलिंगी, नियमित, विविध आकारांची व रंगांची, छदयुक्त (तळाशी उपांग असलेली), ४-५ भागी, संदले परिहित (परस्परांवर कळीमध्ये अंशतःपडून असणारी), पुष्पमुकुटाच्या पाकळ्या जुळलेल्या, धारास्पर्शी किंवा परिहित [⟶पुष्पदलसंबंध] असतात. केसरदले (पुं.-केसर) पुष्पमुकुटावर आधारलेली व प्रदलाशी (पाकळ्यांशी) एकाआड एक आणि किंजदले (स्त्री-केसर) दोन व जुळलेले असतात. किंजपुट ऊर्ध्वस्थ, कधी अर्ध-अधःस्थ, २-३कप्प्यांचा व बीजक एक किंवा अनेक असतात [⟶फूल]. फळ मृदू, अश्मगर्भी (आठळीयुक्त) किंवा बोंड. बिया सपुष्क (दलिकाबाहेर अन्नांश असलेल्या), सपाट गोलसर किंवा लंबगाल व कधी पक्षयुक्त (पंखधारी) असतात.कुला, निर्मळी [⟶निवळी], गोगारी लकडी, पपीटा इ. स्टिक्नॉस प्रजातीतील वनस्पती औषधी आहेत, कित्येक औषधी व विषारी (उदा., कुचला, चिनी जेल्सेमियम व अमेरिकन जेल्सेमियम अथवा जेसामिन) असून जेसामिन वेली शोभेकरिता बागेत लावतात.

पहा : ओलिएसी जेन्शिएनेलीझ परिकाष्ठ प्रकाष्ठ.

संदर्भ : 1. Mira, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

           2. Rendle, A.B. The Classification of Flowering Plants, Vol.II, Cambridge, 1963.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.