निंबारा : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) फळाचा छेद.

निंबारा : (हिं. काली खजूर गु. कडुकाजर क. हेब्बेवू, करिबेव्वू इं. मलबार नीम वुड लॅ. मेलिया काँपोझिटा कुल-मेलिएसी). सुमारे २० मी. उंचीचा हा वृक्ष भव्य व जलद वाढणारा असून त्याचा प्रसार सिक्किम, हिमालय, उ. बंगाल, आसाम, खासी टेकड्या, ओरिसा आणि दख्खन येथे व सह्याद्री घाटात १,५०० ते १,८०० मी. उंचीपर्यंत आहे. याची साल गर्द पिंगट व भेगाळ असून ती पातळ अरुंद तुकड्यांनी सोलून निघून जाते. पाने संयुक्त, द्विगुण किंवा त्रिगुण पिच्छाकृती (दोनदा किंवा तिनदा पिसासारखी विभागलेली) असून दलके अखंड किंवा अल्पदंतुर (किंचित दातेरी) असतात. फुले हिरवट पांढरी व सुगंधी असून परिमंजरीवर गर्दीने मार्च ते एप्रिलमध्ये येतात. सामान्य शारीरिक लक्षणे व फुलांची संरचना ⇨ मेलिएसी कुलात (निंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे व थोडीफार बकाणा निंबाप्रमाणे असतात [⟶ निंब]. अश्मगर्भी फळे (आठळी फळे) लांबट, गोलसर, पिवळसर बिया ५, क्वचित कमी असतात. याची झाडे रस्त्यांच्या दुतर्फा, बागेत किंवा मळ्यांत लावतात. नवीन जंगले निर्मिण्यास यांचा फार उपयोग करतात. याचे लाकूड हलके पण कडू निंबाइतके कठीण व टिकाऊ नसते. ते इमारतीमध्ये आतील बाजूस वापरता येते शिवाय खोकी, सिगार-पेट्या, पटई, शेतीची अवजारे, पेन्सिली, आगपेट्या, चहाच्या पेट्या, वाद्ये, प्लायबोर्ड (तक्ते), जळण इत्यादींसाठी ते उपयुक्त असते. फळातील कडू मगज (गर) कृमिनाशक व शूलावर (तीव्र वेदनांवर) गुणकारी हिरव्या फळांचा रस गंधक व दह्याबरोबर गरम करून कातडीच्या रोगांवर व चिघळलेल्या जखमांवर लावण्यास चांगला. फळे बाजारात ‘कडू खजूर’ या नावाने विकली जातात.

वैद्य, प्र. भ.