वनस्पति, आवृतबीज उपविभाग : या वनस्पती सामान्यतः सपुष्प वनस्पती (फुलझाडे) म्हणून ओळखल्या जातात. आधुनिक वनस्पतींमध्ये या वनस्पतींचा गट सर्वांत मोठा व सुस्पष्ट आहे. यांच्या जातींची संख्या २,५०,००० पर्यंत व एकूण वनस्पतींचीही संख्या सर्वाधिक असून आजमितीस पृथ्वीतलावरील वनश्रींमध्ये त्या प्रमुख आहेत. अगदी शंकुमंत (सूचिपर्णी) वृक्षांच्या जंगलांत, हरिता व शैवाक (दगडफुले) टंड्रामध्ये आणि नेचे व सायकसांच्या जाळ्यांत आवृतबीज वनस्पती महत्त्वाच्या असतात. त्यांचे वर्गीकरवैज्ञानिक स्थान काहीसे अनिर्णित आहे. सुरूवातीच्या काही वर्गीकरणांमध्ये त्यांना वर्गाचा दर्जा दिलेला आहे.

उपयोग व सामान्य लक्षणे : आवृतबीज वनस्पती अगदी भिन्न प्रकारच्या वातावरणांत वाढतात. जेथे उच्च वनस्पती जगू शकतात तेथे त्या आढळतात. त्यांच्या जीवनपद्धतीत विविध अंगांनी क्रमविकास (उत्क्रांती) झालेला आहे. वनस्पतिसृष्टीत एवढा क्रमविकास अन्य कोणत्याही विभागात झालेला आढळत नाही. त्यांचे आयुर्मान काही आठवडे ते हजारो वर्षे आढळते. त्यांच्यापासून अन्न (तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी, तसेच कडधान्ये, ऊस, बटाटा, कंदमुळे, फळे), तंतू, लाकूड, औषधे वगैरे उपयुक्त वस्तू माणसाला मिळतात. शिवाय यांपैकी काही वनस्पती शोभेसाठीही उपयुक्त आहेत.

उद्योगधंद्यात, औषधे व सुवासिक द्रव्यांत वापरण्यात येणारे स्निसग्ध पदार्थ (वसा व तेले), तसेच मिरी, लवंगा, दालचिनी, वेलदोडे, व्हॅनिला इ. मसाल्याचे पदार्थही आवृतबीज वनस्पतींपासून मिळतात. शिवाय चहा, कॉफी, कोको इत्यादींसारख्या उत्तेजक द्रव्ययुक्त वनस्पतीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मादक द्रव्यांचा (उदा., कोकेन व मॉर्फिन) औषधांत मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अशा मादक द्रव्ययुक्त वनस्पतींना मानवी जीवनात विशेष स्थान आहे. कापूस व फ्लॅक्स (अळशी) या तंतु-उत्पादक वनस्पती कापडासाठी अद्यापही महत्त्वाच्या आहेत. वस्त्रनिर्मितीखेरीज वनस्पतितंतूंचा उपयोग अन्य विविध प्रकारे केला जातो. पुष्कळ वृक्षांपासून उपयुक्त व व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे लाकूड मिळते. लाकडापासून किती तरी रसायने मिळविण्यात येतात. १०,००० हून अधिक आवृतबीज वनस्पतींचा उपयोग औषधनिर्मितीत होतो. उद्योगात वापरल्या जाणाऱ्या यांच्या जातींची संख्या बरीच कमी असली, तरी त्यांपैकी विशेषतःउष्ण कटिबंधातील रबरासारख्या वृक्षांना खास महत्त्व आहे. शोभिवंत सपुष्प (आवृतबीज) वनस्पतींमुळे आल्हाददायक नैसर्गिक वातावरण (पर्यावरण) निर्माण होते.

आवृतबीज वनस्पतींचा अधिवास (वसतिस्थान), आकार व आकारमान यांत खूपच विविधता आढळते. सूक्ष्म डकवीड (सर्वाधिक लहान सपुष्प वनस्पती) ते वडासारखे महाकाय वृक्ष यांत येतात. बहुतेक वनस्पती जमिनीवर सरळ उभ्या वाढतात तथापि पुष्कळ जमिनीवर पसरणाऱ्या, आरोही (आधारावर चढणाऱ्या) किंवा दुसऱ्या वनस्पतीचा आधार घेऊन वाढणाऱ्या आहेत. बहुसंख्य भूमिवासी आहेत. त्यांतील बहुतेकींमध्ये ⇨हरितद्रव्य असते व त्यापासून त्या आपले अन्न तयार करू शकतात. काही मृत द्रव्यातून अन्न शोषून घेतात (शवोपजीवी), इतर काही जिवंत वनस्पतींतून अन्न शोषतात (जीवोपजीवी). सनड्यू (ड्रॉसेरा) सारख्या अनेक वनस्पती मांसाहारी असून आपल्या अन्नाचा काही भाग त्या कीटक किंवा अन्य लहान प्राण्यांपासून मिळवितात.

पुष्कळशा आवृतबीज वनस्पती काष्ठयुक्त (वृक्ष व झुडपे) असल्या, तरी बहुसंख्य ओषधी (मऊ, तंतुमय) आहेत. वृक्षसम अधिवास हे सामान्यतः आवृतबीज वनस्पतींमधील आद्य लक्षण असून सर्व ओषधीय वनस्पती काष्ठयुक्त पूर्वजांपासून उगम पावल्या आहेत, हे आता सर्वमान्य झाले आहे. चिनोपोडिएसीतील (चाकवत कुलातील) काष्ठयुक्त वनस्पती व सर्व वृक्षसम एकदलिकित वनस्पती (उदा., नारळ, ताड, कळक, बांबू इ.) या याला अपवाद आहेत. ओषधीय आवृतबीज वनस्पतींची लक्षणे काष्ठयुक्त आवृतबीज वनस्पतींपेक्षा पुढारलेली (प्रगत) असून क्रमविकासाच्या संदर्भात त्या जास्त लवचिक आहेत. ओषधींमध्ये प्रजोत्पादक अवस्था लवकर प्राप्त होते व तीमध्ये शाकीय अवयवाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्याच्या मानाने कमीत कमी अन्नद्रव्य लागते. याउलट बीजनिर्मितीमध्ये शाकीय द्रव्याच्या मानाने पुष्कळच अधिक अन्नद्रव्य खर्ची पडते. यांशिवाय ओषधीय जाती वृक्षांपेक्षा आपला भौगोलिक विस्तार अगदी झटपट वाढवितात. पृथ्वीतलावर ओषधींचा प्रसार झटपट झालेला आहे व जागतिक वनश्रींमध्ये त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. शाकाहारी स्तनी प्राणी (सस्तन प्राणी) आणि जमिनीवर अन्न मिळविणारे पक्षी यांच्या क्रमविकासाच्या संदर्भात ओषधीय आवृतबीज वनस्पतींच्या विकासाला विशेष महत्त्व आहे.

जीवनचक्र : पाने, खोड व मुळे यांसह आदर्श आवृतबीज वनस्पती ही आवृतबीज जीवनचक्रातील सुस्पष्ट अवस्था आहे व ती बीजुकधारी (लाक्षणिक प्रजोत्पादक अवयव निर्माण किंवा धारण करणारी) पिढी असून तिच्या प्रत्येक जिवंत कोशिकेत (पेशीत) किमानपक्षी गुणसूत्रांचे (आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत वाहून नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांचे) दोन परिपूर्ण संच असतात ही संख्या नंतर येणाऱ्या गंतुकधारी (जनकोशिका धारण करणाऱ्या) पिढीतील कोशिकेतील संख्येच्या बरोबर दुप्पट असते. फुले येण्याच्या प्रक्रियेत ही वनस्पति पुं-गंतुकधारीमध्ये (नर जनन कोशिकेमध्ये) विकास पावणारी लघुबीजुके (सूक्ष्म लाक्षणिक प्रजोत्पादक अवयव) आणि स्त्री-गंतुकधारीमध्ये (गर्भकोशात) विकास पावणारी गुरूबीजुके (अधिक मोठे लाक्षणिक प्रजोत्पादक अवयव) निर्माण करते.

प्रकटबीज वनस्पतींप्रमाणे पुं- आणि स्त्री-गंतुकधारी या दोहोंचा ऱ्हास होतो. पुं-गंतुकधारी अंतिमतःपरागकणाच्या स्वरूपात गळून पडते आणि स्त्री-गंतुकधारी गंतुकधारीवरील बीजकात टिकवून ठेवला जातो. फुलाच्या किंजल्केवर (परागकण ग्रहण करणाऱ्या भागावर स्त्री-केसराग्रावर) योग्य परागकण पकडून ठेवले गेले, तर त्यांचे अंकुरण होऊ शकते व एकामुळे गर्भकोशातील अंदुक प्रकलाचे फलन होऊ शकते. या दोन जनन कोशिकांच्या संयोगातून रंदुक तयार होते व बीजकाचा विकास बीजामध्ये होतो. बीग पक्क होते व सुस्पष्ट बीजुकधारी वनस्पती होण्यासाठी ते रूजते. अशा तऱ्हेने जीवनचक्र पुरे होते.


परागण व फलन : पर-परागण (एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलावर जाऊन पडणे) हे बहुसंख्य आवृतबीज वनस्पतींचे खास वैशिष्ट्य आहे परंतु त्यांच्यात स्वपरागणही (त्याच फुलातील परागकण किंजल्यावर पडणे) होते. पर-परागणामुळे अस्तित्वात असलेल्या जीनांचे (जनुकांचे आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेणाऱ्या गुणसूत्रावरील सूक्ष्म घटकांचे) नवे संयोग निर्माण होतात हा फायदा आहे आणि संकरातून तयार झालेले अपत्य एकाच वनस्पतीच्या गंतुकांपासून तयार झालेल्या अपत्यापेक्षा जोमदार असते. फुलांच्या रचना व वर्तन अशा अनेकविध मार्गानी स्व-परागणास प्रतिबंध केला जातो किंवा त्यावर मर्यादा पडतात. स्वयंवंध्यत्व (स्वतःचा वांझपणा राखणे) हा अगदी सर्रास अवलंबिला जाणारा व हुकमी मार्ग आहे. [⟶ परागण].

परागकण किंजल्कावर पडल्यावर त्याचे अंकुरण होते व बाहेर पडणारी आणि किंजपुटाच्या (बीजकोशाच्या) पोकळीमध्ये परागनलिका किंजलामध्ये (किंजल्काच्या दांड्यामध्ये) खाली वाढते. नलिका प्रकल परागनलिकेच्या टोकाजवळ आणला जातो व मग जननकोशिका येते. नलिका विकास पावताना जननकोशिका दोन पुं-गंतुकांमध्ये विभागली जाते. बहुसंख्य वेळा सूक्ष्म छिद्रातून परागनलिका बीजकामध्ये प्रवेश करते. क्वचितच परागनलिका बीजकाच्या तळभागातून घुसते. 

आ. १. प्रातिनिधिक आवृतबीज वनस्पतीचे जीवनचक्र : (अ) द्विगुणित अवस्था : (१) गर्भकोश, (२) गर्भ, (३) रंदुक, (४) पक्क दाणा, (५) अंकुरणारा दाणा, (६) पक्क बीजुकधारी, (७) लघुबीजुकपर्ण, (८) एक फूल, (९) गुरूबीजुकर्पण, (१०) गुरूबीजुकाचा विकास, (११) लघुबीजुकाचा विकास (आ) एकगुणित अवस्था : (१) चार गुरूबीजुके, (२) तीन गुरूबीजुकांचा ऱ्हास, (३) क्रियाशील गुरूबीजुक, (४) लघुबीजुक, (५) परागकोश, (६) शाकीय प्रकल, (७) गुरूबीजुक, (८) प्रकल, (९) जनन प्रकल, (१०) पुं-गंतुकधारी, (११) परागनलिका, (१२) रेतुके, (१३) स्त्री-गंतुकधारी, (१४) ध्रुवीय प्रकल, (१५) प्रतिध्रुवी, (१६) दुहेरी फलन.

स्त्री-गंतुकधारीमध्ये प्रवेश केल्यावर परागनलिकेचे टोक फुटते व तीमधील दोन पुं-गंतुके स्त्री-गंतुकधारीच्या परिकलात (कोशिकाद्रव्यात) सोडली जातात. दोन्हीपैकी एक पुं-गंतुक अंड्यामध्ये घुसते व स्त्री-प्रकलाशी संयोग पावते आणि अशा तर्हे ने फलन घडून येते. तयार झालेल्या रंदुकाचा विकास सामान्यतः गर्भामध्ये होतो. दुसरे पुं-गंतुक स्त्री-गंतुकधारीच्या अन्य दोन प्रकलांशी संयोग पावते आणि पुष्काचा (गर्भाबाहेरील अन्नांशाचा) प्रकल तयार होतो. त्यापासून पुढे अन्न संचय ऊतक (अन्नाचा साठा करणारा कोशिका समूह) तयार होते. दोन पुं-गंतुकांपैकी एकाने संयोग प्रक्रियेत भाग घेणे ही आवृतबीज वनस्पतींच्या बाबतीत एक वैशिष्ट्यपूर्ण बाब असून तिला दुहेरी फलन असे म्हणतात.

गर्भ व बीज विकास : जलद प्रकल विभाजनाबरोबर कोशिकाभित्ती तयार होण्याने रंदुकापासून गर्भाच्या विकासास सुरूवात होते. बीजामधील गर्भाच्या सुरूवातीच्या विकासावस्था आवृतबीज वनस्पतींच्या दोन्ही वर्गांत सारख्याच असतात. पुढील विकास भिन्न मार्गांनी होतो. द्विदलिकितांमध्ये खोडाच्या आद्य अंगाच्या प्रत्येक बाजूवर पार्श्विक (बाजूचे) बीजपर्ण (दलिका) येते एकदलिकितांमध्ये दोन आद्य दलिकांपैकी एकच विकास पावते व अग्राकडे ढकलली जाते. विकासाच्या आरंभीच्या अवस्थांमध्ये एकांतरणाच्या (अदलाबदलीच्या) अलग मार्गाने द्विदलिकित प्रकारापासून एकदलिकित गर्भ उगम पावला, हे विकासाच्या प्रक्रियेने स्पष्ट दिसून येते. द्विदलिकितांचा गर्भ आदिमूल, अधराक्ष, दलिका व आदिकोरक या चार अवयवांत विभेदित होतो. [⟶ फळ बीज].

प्रकल विभागून सुरूवातीचा पुष्क तयार होतो, त्यामुळे विकास पावणाऱ्या गर्भाचे पोषण होते व नंतर बहुधा अंकुरणाऱ्या बीजाचेही पोषण होते. क्रमविकासाच्या दृष्टीकोनातूनपुष्क ही नवी संरचना असून ती फक्त आवृतबीज वनस्पतींचेच वैशिष्ट्य आहे. तथापि बहुधा बीज पक्क होण्यापूर्वी पुष्क ऱ्हास पावतो व अन्नाचा संचय जाड दलिकांत (उदा., घेवडा, वाटाणा, डबल बी इत्यादी) आणि गर्भाच्या इतर भागांत, विशेषतः अधराक्षात केला जातो. बीजात भरपूर पुष्क व सूक्ष्म, अविभेदित गर्भ हे आदिम (आद्य) आवृतबीज वनस्पतींचे वैशिष्ट्य आहे. अधिक विकसित गटांच्या बीजांत सामान्यतः पुष्क अत्यल्प किंवा अजिबात नसणे व मोठा, विभेदित गर्भ असतो. सामान्यतः बीजाच्या विकासात प्रकल पुन्हा शोषला जातो परंतु काही गटांमध्ये तो टिकून राहतो व त्यापासून परिपुष्क नावाचे अन्न संचयी ऊतक तयार होते. अध्यावरणाचा विकास होऊन बीजाचे संरक्षक आवरण (बीज-चोल) तयार होते. पक्क बीज फळाने आवेष्टिलेले असते. फळ हा फक्त आवृतबीज वनस्पतीतील अवयव असून त्यामुळे बीजाचे संरक्षण व प्रसार होतात. फळ हे रूपांतरित किंजमंडल (स्त्रीकेसर मुख्यतःकिंजपुट) असून त्याबरोबर बहुधा फुलाचे संलग्न  अवयव असतात.

मांसल व शुष्क असे फळांचे दोन प्रमुख प्रकार करता येतात. शुष्क फळांचे स्फुटनशील (पक्क झाल्यावर तडकणारे) व अस्फुटनशील (पक्क झाल्यावर बंद राहणारे वा न तडकणारे) असे आणखी दोन उपगट करतात. मांसल फळे अस्फुटनशील असतात. अननस, तुती यांच्याप्रमाणे अलग पण एकत्र गच्च झालेल्या फुलांच्या झुपक्यापासून फळांचा गट विकास पावतो. त्याला संयुक्त फळ म्हणतात. हे फळांचे सांकेतिक वर्गीकरण अनुभवसिद्ध असले, तरी ते आवृतबीज वनस्पतींच्या वर्गीकरण व अभिज्ञानात (ओळख पटविण्याच्या कामात) उपयुक्त आहे. तथापि जातिविकासीय अध्ययनासाठी फळांचे क्रमविकासीय वर्गीकरण अधिक उपयुक्त ठरेल. असे वर्गीकरण फळे निर्माण करणाऱ्याट फुलांच्या मूलभूत लक्षणांवर आधारलेले हवे.


रूप व कार्य :शाकीय अवयव: अन्य वाहिनीवंत वनस्पतींप्रमाणे आवृतबीज वनस्पतींमध्ये विशेषित वाहक ऊतके असतात. ⇨प्रकाष्ठ पाणी व खनिजांचे वहन करते, त्याबरोबर वनस्पतीला बलकटीही देते. ⇨परिकाष्ठ विद्राव्य (विरघळणारे) अन्न व खनिजे यांचे वहन करते. वृक्षामध्ये प्रकाष्ठ हे काष्ठ (लाकूड) व परिकाष्ठ हे वल्क (साल) असते. फक्त आंतरसाल वहनाचे कार्य करते व मोठ्या वृक्षामध्ये काष्ठाचा फक्त बाहेरील भाग वहनाचे कार्य करतो. बहुसंख्य आवृतबीज वनस्पतींतील प्रकाष्ठात वाहिनी ह्या विशेषित वाहक नलिका असतात परंतु विशिष्ट प्रकारांत (जलवनस्पती, परजीवी, शवोपजीवी व रसाळ) क्रमविकासामध्ये त्या नष्ट झालेल्या आढळतात. काही प्रारंभिक आवृतबीज वनस्पतींत कदाचित वाहिन्या नसतात. त्यांमध्ये विंटरेसी, ट्रोकोडेंड्रेसी व टेट्रासेंट्रेसी या कुलांतील वनस्पतींचा समावेश होतो. परिकाष्ठातील अत्यावश्यक कोशिका प्रकार म्हणजे चालनी घटक होय. बहुसंख्य आवृतबीज वनस्पतींत चालनी घटक टोकांशी जोडले जाऊन चालनी नलिका तयार होते व टोकाकडील चालनी पट्टिकांवर चालनी प्रदेशांची गर्दी झालेली असते. याशिवाय प्रत्येक चालनी नलिकेचा सहचरी कोशिका या विशेषित कोशिकेशी अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेत) संपर्क असतो. याउलट प्रकटबीज वनस्पतींमध्ये सहचरी कोशिका नसलेले व टोकाकडील चालनी पट्टिकेवर चालनी प्रदेशांची गर्दी नसलेले साध्या प्रकारचे परिकाष्ठ असते. ऑस्ट्रेबेलियासारख्या अधिक प्रारंभिक आवृतबीज वनस्पतींतील परिकाष्ठ प्रकटबीज वनस्पतींतील परिकाष्ठापेक्षा फार वेगळे नसते.

पानांचा आकार, आकारमान व संरचना याबाबतींत आवृतबीज वनस्पतींमध्ये अमर्याद विविधता आहे. खोडावरील त्यांची मांडणी एकांतरित (एकाआड एक), संमुख (समोरासमोर किंवा विरूद्ध) किंवा मंडलित (वेढ्यात) असते. एकांतरित मांडणी प्रारंभिक असून संमुख व मंडलित पर्णविन्यास (पानांची मांडणी) क्रमविकास होताना उदयास आली आहे. प्रारंभिक आवृतबीज वनस्पतींची पाने साधी, अखंड, पिच्छाकृती (पिसासारख्या) शिरांची रचना असलेली, चामड्यासारखी व गुळगुळीत असतात. पिच्छाकृती शिराविन्यासयुक्त साधे, अखंड पान प्रारंभिक असते. हिवाळ्यात किंवा कोरड्या हंगामात गळणारी पाने द्वितीयक (दुय्यम) असतात व ती सदाहरित (बारा महिने किंवा वर्षभर हिरवीगार राहणाऱ्या) पानांपासून उगम पावलेली आहेत. कोरड्या हंगामात जिवंत राहण्यासाठीचा उपाय (अनुयोजन) म्हणून उष्ण कटिबंधात प्रथमतः पानझडी वनस्पतींचा क्रमविकास झाला असावा व अशा वनस्पतींचा प्रसार उष्ण कटिबंधी पट्ट्यातून अधिक मोसमी पट्ट्यांत झाला असावा. तथापि बहुतेक काष्ठयुक्त पानझडी वनस्पतींचा उगम आवृतबीज वनस्पतींचा प्रसार कमी अक्षांशाकडून उच्च अक्षांशाकडे होत असताना झाला आहे.

पाने व अन्य हिरव्या वायवी भागांमध्ये त्वग्रंध्रे (विशेषित छिद्रे) असतात. हे रंध्र म्हणजे रक्षक कोशिकांमधील (दोन विशेषित चंद्रकोरीच्या आकाराच्या अपित्वचीय पेशींमधील) मोकळी जागा होय. पुष्कळ आवृतबीज वनस्पतींमध्ये त्वग्रंध्रे ही अन्य अपित्वचीय कोशिकांपेक्षा आकाराने भिन्न अशा दोन किंवा अधिक कोशिकांच्या जोडीने असतात. या वेगळ्या कोशिका त्वग्रंध्रे कोशिकांच्या गौण किंवा साहाय्यक कोशिका असतात. आवृतबीज वनस्पतींमध्ये गौण कोशिकांची संख्या व रचना यांवर आधारित त्वग्रंध्रांचे काही मुख्य क्लिष्ट (जटिल) प्रकार ओळखण्यात येतात. त्वग्रंध्रीय जटिल प्रकारांपासून वर्गीकरणवैज्ञानिक लक्षणांच्या स्वरूपाची अधिक महत्त्वाची माहिती मिळते. 

द्विदलिकित व एकदलिकित या विभागांना अनुसरून सामान्यतः दोन प्रकारची मूल तंत्रे [⟶ मूळ–२] आवृतबीज वनस्पतींत आढळतात.

आ. २. आवृतबीज वनस्पतींच्या लाक्षणिक पुष्पीय संरचना : (अ) फूल : (१) प्रदल, (२) केसरदले, (३) किंजमंडल (मुक्त किंजदले) (आ) आदिम केसरदल : (१) परागकोश (इ) विशेषित केसरदल : (१) तंतू (ई) परागकणांसह परागकोशाचा आडवा छेद (उ) आदिम किंजदल : (१) किंजल्कीय प्रदेश (ऊ) विशेषित किंजदल : (१) किंजपुट, (२) किंजल, (३) किंजल्क (ए) किंजदलाचा उभा छेद : (१) पुटक, (२) बीजके (ऐ) मुक्तकिंज किंजमंडल (ओ) सीनोकार्पस किंजमंडल (औ) युक्तकिंज किंजमंडलाचा छेद (क) पॅराकार्पस किंजमंडलाचा आडवा छेद (ख) लायसीकार्पस किंजमंडलाचा आडवा छेद (ग) ऊर्ध्वमुख बीजक (घ) अधोमुख बीजक.

प्रजोत्पादक अवयव : आवृतबीज वनस्पतींच्या जीवनेतिहासात ⇨फूल ही उल्लेखनीय संरचना आहे (फुलातील विविध अवयवांच्या अधिक माहितीकरिता ‘ फूल ’ ही नोंद पहावी). फूल हा खूपच रूपांतरित व विशेषित प्रजोत्पादक प्ररोह (कोंब) असून त्यामध्ये बीजुकधारक अवयव किंवा बीजुकपर्णे (केसरदले व किंजदले) कमीअधिक प्रमाणात आखूड अक्षावर (पुष्पासनावर) असतात व ती परिदलमंडलाने (संदले म्हणजे पुष्पदले व प्रदले म्हणजे पाकळ्या) वेढलेली असतात. ज्या फुलात केसरदले आणि किंजदले ही दोन्ही असतात, त्याला द्विलिंगी म्हणतात. (अधिक अचूक परिभाषेप्रमाणे अँफिस्पोरँजिएट वा उभयबीजुकी). फुलात किंजदले किंवा केसरदले यांपैकी एक नसल्यास ते एकलिंगी (अधिक अचूकपणे मोनोस्पोरँजिएट वा एकबीजुकी) आणि पुं (नर केसर किंवा सूक्ष्मबीजुकी) किंवा स्त्री (मादी गुरूबीजुकी) होय. झाडाला जर फक्त नर फुले किंवा मादी फुले येत असतील, तर ते झाड विभक्तलिंगी (एकलिंगी) होय आणि जर नर व मादी फुले येत असतील तर ते एकत्रलिंगी होय. आवृतबीज वनस्पतींच्या फुलामध्ये व प्रकटबीज वनस्पतींच्या शंकूमध्ये मूलभूत असे भेद नाहीत. सामान्यतः असे मानले जाते की, किंजपुटाने (किंवा किंजपुटांनी) तयार झालेल्या बंदिस्त जागेमध्ये बीजक (आद्य बी) असते. हा आवृतबीज व प्रकटबीज वनस्पतींमधील भेद आहे परंतु हा भेद सुस्पष्ट नाही काही आद्य आवृतबीज वनस्पतींत परागणाच्या वेळी किंजपुट उघडे असते व काही प्रकटबीज वनस्पतींत (ॲरोकॅरिया) बीज शल्कामध्ये (खवल्यांत) वेष्टित असते.


पुष्पासन हे खोडच असून त्याची पेरी खूपच आखूड किंवा दबलेली असतात. अतिआद्य फुलांमध्ये पुष्पासन लांबट असून त्यावर अनिश्चित व असंख्य पुष्पावयव (फुलांचे भाग) सर्पिल पद्धतीने मांडलेले असतात. फुलांचा क्रमविकास होताना पुष्पासन आखूड होऊन अवयव मोजकेच, त्यांची संख्या निश्चित व मांडणी मंडलांत झाली. अशी फुले विकसित आवृतबीज वनस्पतींची  वैशिष्ट्ये वा विशेष लक्षणे आहेत. संदले (एकत्रितपणे त्यांना संवर्त म्हणतात) सामान्यतः हिरव्या रंगाची असतात व काहीशी पर्णसम किंवा छदासारखी असतात परंतु ती ऱ्हास पावलेली असतात. आकारवैज्ञानिक दृष्ट्या ती विशेषित पानेच होत. फुलांच्या आतील व कळीमध्ये विकास पावलेल्या जास्त नाजूक अवयवांचे संरक्षण करणे हे संवर्ताचे मुख्य कार्य असते. काही प्रजातींत (ट्रोलियस, लिलियम, ट्यूलिपा ॲलियम) संदले प्रदलांसारखीच असतात आणि त्यांचे स्थान व वाहक ऊतकांचे शारीर यांच्या अध्ययनाखेरीज वेगळे ओळखणे अवघड असते.

प्रदले (त्यांना एकत्रितपणे पुष्पमुकूट म्हणतात.) सामान्यतः संदलांशी एकांतरित असतात आणि ती संदलापेक्षा अधिक नाजूक व आकारमानाने मोठी असतात. त्यांचा रंग हिरव्याखेरीज अन्य कोणताही असतो. काही आदिम आवृतबीज वनस्पतींत (मॅग्‍नोलिएलीझ, इलिसिएलीझ इ.) परिदलमंडलाचे सर्व भाग आकारवैज्ञानिक दृष्ट्या समान असतात  व त्यांचा उगम पानांमधून झालेला असतो. तथापि बहुतेक कुलांमध्ये प्रदलांचा उगम हा केसरदलांची क्रमविकासीय प्रदलासारखा (विस्तार) झालेला आहे. अशा तऱ्हेने पुष्पमुकूट दोन मार्गानी उदयास आला आहे व उदाहरणादाखल गुलाबाच्या पाकळ्या ह्या आकारवैज्ञानिक दृष्ट्या मॅग्नोसलियांच्या पाकळ्यांसारख्या (समान) नाहीत. पुष्कळशा विकसित गणांमधील वनस्पतींमध्ये प्रदले एकत्र होऊन युक्तप्रदल (भुक्त प्रदलाच्या विरूद्ध) पुष्पमुकूट तयार होतो. परागण कारकांना (परागसिंचन घडवून आणणाऱ्यांना) आकर्षित करणे हे प्रदलांचे प्रमुख कार्य आहे. पुष्कळशा आवृतबीज वनस्पतींत परिदलामंडलात फक्त संदलेच असतात, ही संदले ओक वृक्षांप्रमाणे खवल्यासारखी किंवा ॲनिमोनांप्रमाणे मोठी व दिखाऊ असून ती प्रदलांची जागा घेतात. अशी फक्त संदले असलेली फुले अप्रदल वा प्रदलहीनत्व म्हणून ओळखली जातात. प्रदलहीनत्व हे लक्षण बहुतांश आवृतबीज वनस्पतींच्या जातींमध्ये आदिम  लक्षणापेक्षा जास्तकरून द्वितीयक असते.

केसरदलांना (लघुबीजुकपर्णांना) एकत्रितपणे केसरमंडल म्हणतात. सामान्यतः प्रत्येक केसरदलाचे तंतू व परागकोशात विभेदन झालेले असते. अधिक विकसित प्रकार केसरदलांत वैशिष्ट्यपूर्ण स्पष्ट बारीक तंतू असतो, तर आदिम आवृतबीज वनस्पतींत (डिजिनेरिया, हिमँटँड्रा, काही मॅग्नोसलिएसीतील व अन्य) केसरदले रूंद, पसरट असतात व तंतूमध्ये विभेदन झालेले नसते. परागकोशात चार परागकोटरे (लघुबीजुककोश) असतात म्हणजे प्रत्येक परागकोशात दोन भाग होतात. त्यांना अलग ठेवणारे ऊतक फुले येण्यापूर्वी विघटन पावते व परिणामी परागकोश वरकरणी द्विपुटकी होतो. लघुबीजुककोशांच्या जोडीच्या मधील ऊतकाच्या पट्टीला संयोजी म्हणतात. आदिम केसरदलांत लघुबीजुककोशांच्या पलीकडे (दूरवर) संयोजी तयार होऊन कमीअधिक दूरस्थ उपांग निर्माण होते. आदिम गटांत लघुबीजुककोश लांब व अरूंद असतात.

लघुबीजुककोशामधील आद्य बीजुक निर्मिणाऱ्या कोशिका असंख्य द्विगुणित (२ n) बीजुक जननकोशिका जन्माला घालतात त्यांपैकी प्रत्येकीचे दोन वेळा विभाजन होऊन चार एकगुणित (n) लघुबीजुकांचा एक गट तयार होतो. जेव्हा पुं-गंतुकधारीच्या कोशिकाभित्तीमध्ये दिसू लागतात तेव्हा लघुबीजुक अंकुरणानंतर परागकण होतो. प्रत्येक परागकणात एक अतिऱ्हसित पुं-गंतुकधारी असतो. त्यात फक्त दोनच कोशिका असतात. त्यांपैकी एक लहान ही जननकोशिका व मोठी नलिका कोशिका किंवा वर्धी कोशिका असते. लघुबीजुकाची (आणि परागकण) कोशिकाभित्ती दोन थरांची असते. त्यांतील बाहेरील थर अधिलेप व आतील थर आलेप होय. अधिलेपावर विशिष्ट जातीच्या वैशिष्ट्यानुरूप कमीअधिक प्रमाणात नक्षी असते. कोशिकाभित्ती सामान्यतः एकदोन ठिकाणी पातळ (छिद्र) असून तेथे अधिलेप पूर्णपणे तयार झालेला नसतो आणि पुढे त्यामधून परागनलिका बाहेर येते. जननछिद्राचे खाचा व भोके असे दोन मुख्य प्रकार असतात. बहुतांश आवृतबीज वनस्पतींचा परागकण एक खाच प्रकारचा असून त्याला एक ध्रुवीय जनन–खाच असते. अशा एकखाची परागकणांना अखंड छिद्र पटल असते. त्या पटलाला परागनलिका बाहेर येण्यासाठी आलेपात विशेष रंध्र नसते. एकखाची पराग हे मॅग्नोलिएलीझ, अन्य काही आदिम द्विदलिकित व बहुतेक एकदलिकित व पुष्कळशा प्रकटबीज वनस्पतींचे वैशिष्ट्य असते. क्रमविकास घडत असताना खाचांची व छिद्रांची संख्या भिन्न असलेले पुष्कळ अन्य प्रकारांचे परागकण उदयास आलेले आहेत.

किंजदलांना (गुरूबीजुकपर्णांना) एकत्रितपणे किंजमंडल म्हणतात. किंजदलात परिवेष्टित (समावृत) बीजक, किंजल्क व किंजल असतात. सर्वांत आदिम किंजदल हे कोवळे पान मध्यशिरेच्या दिशेने गुंडाळले गेल्याचे सूचित करते. अशा किंजदलाला संमीलित म्हणतात. व हे विशिष्ट आदिम आवृतबीज वनस्पतींचे वैशिष्ट्य असते, उदा., डिजिनेरिया, टास्मॉनिया या प्रजाती व काही अंशी मॅग्नोलिएसी कुल. किंजल नसणे हे आदिम किंजदलांचे फार महत्त्वाचे वर्गीकरणवैज्ञानिक लक्षण आहे. किंजल्कीय पृष्ठभाग किंजदलांच्या शिवणीवर असतो. किंजदलातील बीजकविन्यासाच्या (मांडणीच्या) तटलग्न व धारालग्न (शिवणीला लागून) या दोन मूलभूत प्रकारांपैकी तटलग्न हा प्रकार बहुतकरून अधिक आदिम असावा.

किंजमंडलात एक किंवा अनेक किंजदले असू शकतात. पुष्पासनावर किंजदलाची मांडणी सर्पिल किंवा मंडलांत असू शकते. सर्वांत आदिम किंजमंडलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील किंजदले लांब पुष्पासनावर सर्पिलात मांडलेली असतात, उदा., मॅग्नोलिया. किंजमंडलाच्या क्रमविकासात किंजदलांची संख्या घटते व मंडलित रचना क्रमविकसित होते. किंजमंडलातील किंजदले जेव्हा सुटी असतात, तेव्हा त्यांना मुक्तकिंज म्हणतात. अशा प्रकारांची किंजमंडले मॅग्नोलिएलीझ, रॅनन्क्युलेलीझ, डायलेनिएलीझ, ॲलिस्मेलीझ आणि अन्य अधिक आदिम गणांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा क्रमविकास घडताना किंजदले विविध प्रकारे एकमेकांशी जुळून सामान्यतः सीनोकार्पस किंजमंडले तयार होतात. सीनोकार्पस किंजमंडलांचे तांत्रिक दृष्ट्या तीन प्रकार आहेत : युक्तकिंज वा पॅराकार्पस (दोन किंवा अधिक पुटके व अक्षलग्न बीजकविन्यास, उदा., लिलियम ), पराकिंज [एक पुटक आणि तटलग्न (भित्तीय) बीजकविन्यास, उदा., व्हायोला ] व लायसीकार्पस (एक पुटक आणि मुक्त मध्य बीजकविन्यास, उदा., प्रिम्युला) तथापि वनस्पतींच्या वर्णनात्मक आकारविज्ञानात जुळलेल्या किंजदलांच्या किंजमंडलांना युक्तकिंज म्हणतात.


सीनोकार्पस किंजमंडलाच्या कमी विकसित प्रकारांत किंजदलांचे व्यक्तिगत किंजल कमीअधिक मुक्त असतात व फक्त किंजपुटे एकजीव झालेली असतात, उदा., हायपरिकाम. अधिक विकसित किंजमंडलांत ऱ्होडोडेंड्रॉनप्रमाणे किंजले व त्यांचे किंजल्स एकत्र जुळलेले (युक्त) असतात. अधिक आदिम गटांत फूल अवकिंज म्हणजे परिदलमंडल व केसरदले यांच्या जोडाच्या वर किंजमंडल असून किंजपुट ऊर्ध्वस्थ असतो. अधिक विकसित गटांत बहुधा फूल आणि अपिकिंज असते. त्यात किंजमंडलाचे किंजपुटीय भाग हे परिदलमंडलाच्या तळभागाशी एकजीव झालेले असतात किंवा काहींमध्ये ते पुष्पासनात खोल गेलेले असतात व असे किंजपुट अपिकिंज असते (म्हणजे परिदलमंडल व केसरदले किंजपुटाच्या माथ्यावरून निघाली आहेत, असे दिसते).

बीज होऊ घातलेले बीजक प्रदेहाचे बनलेले असते व त्याच्या वरच्या टोकाची सूक्ष्मछिद्राची जागा सोडून पूर्णपणे एक किंवा दोन आवरणांनी वेढलेले असते. प्रत्येक बीजक बीजबंधावर धारण केलेले असते व ते ऊर्ध्वमुख (तोंड वर असलेले) आणि अगदी सामान्यतःअधोमुख (तोंड खाली असलेले) असते. बीजकांचा तळभाग जेथे एकत्र जुळलेला असतो त्याला बीजकतल म्हणतात. अधिक आदिम आवृतबीज वनस्पतींत बीजके मोठी असून त्यांना दोन आवरणे असतात. अधिक विकसित आवृतबीज वनस्पतींत बीजके लहान असून त्यांना फक्त एकच आवरण असते. सँटॅलेलीझ  (चंदन) गणातील काही प्रातिनिधिक कुलांमध्ये विशेषेकरून लोरँथेसी (बांडगूळ कुल) व बॅलॅनोफोरेसी यांमध्ये बीजक ऱ्हास पावलेले, आवरणरहित व बीजुककोश नग्ना (उघडा) असतो.

स्त्री-गंतुकधारी गुरूबीजुक कोशात विकास पावतो व सर्वसामान्यपणे संभाव्य गुरूबीजुकांच्या चतुष्कांच्या सर्वात आतील गुरूबीजुकाच्या विभाजनाने तयार होतो इतर तीन गुरूबीजुके ऱ्हास पावतात. क्रियाशील गुरूबीजुक खूपच मोठे होते व भोवतालच्या प्रदेह ऊतकाचे थोडे शोषण करते. क्रियाशील गुरूबीजुकाच्या केंद्रकाचे विभाजनाने दोन अपत्य केंद्रक तयार होतात. ते खूपच लांबट झालेल्या गुरूबीजुकाच्या विरूद्ध टोकांना जातात. नंतर अपत्य केंद्रकांचे विभाजन होते व सामान्यतःदोन्ही केंद्रक चार कोशिकांचे दोन गट (एकूण आठ) तयार करतात. प्रत्येकी एक त्यक्त गटातून एक केंद्रक नवीन गतुकधारीच्या मध्याकडे जातो. या दोन केंद्रकांना ध्रुवीय (त्यक्त) केंद्रक म्हणतात. ते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि तात्काळ एकजीव होतात किंवा काही काळ वेगवेगळे राहतात. गंतुकधारीमध्ये बीजकरंध्राच्या बाजूला (अग्राला) लगेच तीन कोशिका (एक स्त्री-गंतुक असते व अन्य दोन्हींना सायनरगिड म्हणतात) आणि बीजकतलाच्या बाजूला तीन कोशिका (त्यांना विरूद्धस्थानी म्हणतात) तयार होतात. अशा रीतीने आवृतबीज वनस्पतींचा स्त्री-गंतुकधारी एकदम साधा असतो व त्यात गंतुकाशयांचा लवलेशही नसतो.

क्रमविकास व पुराजीवविज्ञान :आवृतबीज वनस्पतींचा उगम: आवृतबीज वनस्पती एकाच वंशावळीतील (एकस्त्रोतोद्‌भव) प्रकटबीज वनस्पतींपासून उगम पावल्या असाव्यात. अद्याप अज्ञात परंतु एखाद्या आदिम बीजी नेचासारख्या समान वंशजाकरवी ⇨बेनेटाइटेलीझशी आवृतबीज वनस्पती जोडलेल्या असण्याची दाट शक्यता आहे.

पहिल्या आवृतबीज वनस्पती (व त्यांच्या लगतच्या किंवा लगेचच्या पूर्वगामी प्रकटबीज वनस्पती) ह्या एखाद्या पर्वतावर वाढत असाव्यात की, जेथे त्यांचे लहान, अर्धस्वतंत्र स्थानिक समष्टी (समूह) तयार झालेली असावी. अशा समष्टी सामान्यतः पर्वतीय वनस्पतींत आढळतात व त्यामुळे आनुवंशिक विस्थापन व निवड यांची जुळणी होणे ही जलद क्रमविकासाला मिळणारी सर्वाधिक प्रभावी चालना आहे. ही अटकळ जर खरी असेल, तर आवृतबीज वनस्पतींच्या लगेचच्या वंशजांचा व खुद्द सुरूवातीच्या आवृतबीज वनस्पतींचा क्रमविकास फारच झपाट्याने झाला असावा आणि मोठी अनुयोजी रूपांतरणे निर्माण होण्यास चालना नक्कीच मिळाली असेल. अशा परिस्थितीत प्रकटबीज वनस्पतींच्या शाखांपैकी (गटांपैकी) एखाद्या शाखेने उच्च अनुयोजकता असलेल्या बीजी वनस्पतींच्या अधिक प्रगत गटाला चालना दिली असावी.

आवृतबीज वनस्पतींच्या मूलभूत आकारवैज्ञानिक वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या यौवनीय उगमाच्या (सुरूवातीच्या विकासावस्था टिकून राहाण्याच्या निओटेनिक) गृहीतकामध्ये संभवनीय स्पष्टीकरण मिळते. अशा रीतीने फूल हे वंशज प्रकटबीज वनस्पतीच्या शंकूचे यौवनीय रूप आहे, असे संबोधता येऊ शकेल. सर्वाधिक आदिम आवृतबीज वनस्पतींची किंजदलांवरून [विशेषतः डिजिनेरियाटास्मानिया यांच्यामधील सूचक कोवळी वाळलेल्या (घड्या पडलेल्या) पानांवरून] वंशज प्रकटबीज वनस्पतींच्या बीजुकपर्णाच्या यौवन अवस्थांशी ‘बाल’ (शैशव) अवयव अनुरूप असल्याचे सूचित होते. शैशवावस्थेत वलन होऊन व मध्य शिरेपाशी हळूहळू घडी पडून उघड्या बीजुकपर्णाचे क्रमविकासीय रूपांतरण झाले असावे. उघडी गुरूबीजुकपर्णे गुंडाळलेली असतानाच त्यांचे काहीशा बंदिस्त किंजपुटात रूपांतरण विकास अवस्थेत झाले असावे. वंशज प्रकटबीज वनस्पतीच्या लघुबीजुकपर्णाच्या शैशवावस्थेतून बहुतकरून आवृतबीज वनस्पतींच्या केसरदलांचा उगम झाला असावा. आवृतबीज वनस्पतीच्या पानांमध्ये एवढे स्पष्ट नसेल, तरी शैशव उगम अल्पांशाने का होईना दृष्टोत्पत्तीस येतो. मॅग्नोललिया प्रजातीतल्याप्रमाणे आदिम आवृतबीज वनस्पतींची साधी व अखंड पाने सुरूवातीच्या शैशव अवस्थेत वंशज प्रकटबीज वनस्पतींच्या विकासाला अटकाव होऊन आली असावीत. यौवनीय अनुयोजना म्हणून वाहिनीहीन आद्य आवृतबीज वनस्पतींतील प्रकाष्ठाच्या आदिम संरचनेचा उलगडा होत नाही. ते प्रकटबीज वनस्पतींच्या शैशव प्रकाष्ठाशी जुळणारे आहे.

फुलाचा उगम बहुतेककरून द्विलिंगी शंकूपासून झाला असावा. ह्या अटकळीला विशिष्ट जीवाश्मरूप (शिळारूप झालेल्या अवस्थेतील प्रकटबीज वनस्पतीमध्ये कीटक परागणाशी संबंधित द्विलैंगिकतेच्या शोधामुळे पुष्टी मिळते. प्रकटबीज वनस्पतींच्या शंकूचे आवृतबीज वनस्पतीचे रूपांतरण होण्यासाठी कीटकांची मोठी मदत नक्कीच झालेली आहे. आवृतबीज वनस्पतींच्या वंशजांच्या शंकूंना भेट देणाऱ्या कीटकांना तेथेच आश्रय मिळाला व ज्यांच्यावर उपजीविका करतात त्या परागकणांनी (त्यांना) आकर्षिले, त्याचबरोबर पर-परागणासही त्यांनी मदत केली. तथापि त्यांना (कीटकांना) बीजके खाऊन टाकली म्हणून या आदिम परागणाने बीजकांचे संरक्षण केले असावे. आवृतबीज वनस्पतीच्या जवळच्या वंशजामधे वलित (घडी पडलेल्या) शैशव गुरूबीजुकपर्ण अंशतः बंदिस्त झाले असावे. आद्य आवृतबीज वनस्पतींच्या आदिम किंजुपुटांमध्येही कोवळ्या रसाळ बीजकांचे संरक्षण आदिम अविशेषित परागण कारकांबरोबरच नंतरच्या युगातील शोषक कीटकांपासूनही केले गेले. विशिष्ट प्रकारच्या कीटकांपासून संरक्षण अनुयोजना म्हणून प्रथम त्यांचा उगम झाला असला, तरी किंजपुटांनी अन्य मारक बाह्य कारकांपासूनही (विशेषतः वातावरणातील कोरडेपणा) संरक्षण केले. किंजपुटाच्या आतील भागात बीजकाचट्या विकासासाठी आणि फलनाची प्रक्रिया होण्यासाठी नवीन वातावरण तयार केले गेले.


किंजपुटांचा उगम झाल्यामुळे आवृतबीज वनस्पतींच्या बीजकांची संरचना साधी व सुटसुटीत होणे शक्य झाले. तसेच अधिक वेगाने विकास पावणाऱ्या ऱ्हासित गंतुकधारीच्या जोडीला छोटी बीजके निर्माण करणेही शक्य झाले. विकासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण त्यामुळे आवृतबीज वनस्पतींना बीजकाच्या व स्त्री-गंतुकधारीच्या निर्मितीमध्ये द्रव्याची अत्यंतिक बचत करणे शक्य झाले. किंजपुटांच्या विकासामुळे किंजल्कीय पृष्ठभागाची निर्मिती झाली. पुढे त्याचा क्रमविकास होऊन परागणाची निर्दोष प्रक्रिया साध्य होऊ शकली. किंजल्क लाभणे हा सपुष्प वनस्पतींच्या क्रमविकासाच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे परागणाच्या प्रक्रियेत सुधारणा झाली. अवांछित परागांना नवा अडथळा करण्यास मदत झाली. तसेच त्यामुळे पर-परागणास सहाय्य झाले आणि त्याहीपेक्षा पुढची पायरी म्हणजे बीजकाच्या सुटसुटीतपणा आला. शेवटी किंजपुटाच्या क्रमविकासामुळे युक्तकिंजपुट (किंजदले जुळलेली, सीनोकार्पी) आणि अँजिओकार्पी (फुलाच्या इतर अवयवांनी किंजपुट झाकले जाते) या दोन्ही बाबी साध्य झाल्या. प्रजोत्पादनाच्या यशस्वीतेच्या बदलात सुधारणा यासारख्या बाबीला अनुयोजनाच्या दृष्टीने निःसंशयपणे मोठे महत्त्व आहे.

जीवाश्म पुरावा : आवृतबीज वनस्पतींचे सर्वांत पुरातन व विश्वसनीय जीवाश्म पूर्व क्रिटेशस कल्पातील (सु. १३ कोटी वर्षांपूर्वीचे) आहेत. त्या कल्पाच्या शेवटास त्यांची संख्या व विविधता नजरेत भरण्याइतपत वाढली. जीवाश्म आवृतबीज वनस्पती विविध प्रकटबीज वनस्पतींच्या बरोबरीने (बेनेटाइटेलीझसह) नेचांच्या जोडीला आढळतात व फक्त अगदी थोड्याच ठिकाणी त्या अधिक आहेत. त्यांच्या स्पष्ट अशा अगदी छोट्या समष्टी तयार झाल्या व तुलनात्मक दृष्ट्या कमी संख्येने त्यांचे प्रतिनिधित्व केले होते. तथापि क्रिटेशस कल्पाच्या मध्यास (सु. १० कोटी वर्षापूर्वी) स्थलवासी वनस्पतींच्या जीवनात एक तात्काळ बदल घडून आला. भूवैज्ञानिक दृष्टीने छोट्याशा कालावधीत म्हणजे काही कोटी वर्षांत जगभर त्यांचा सर्वत्र विस्तृत प्रसार झाला आणि लवकरच त्या आर्क्टिक व अंटार्टिक प्रदेशांत पोहोचल्या. त्यांच्यात खूप विविधता येऊन त्या प्रबळ झाल्या आणि स्थलवासी प्राणिजगतावर, विशेषतः कीटक, पक्षी व स्तनी प्राणी यांच्या भवितव्यावर त्यांचा निर्णायक प्रभाव पडला आणि शेवटी भूतलावर मानव अवतरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

आवृतबीज वनस्पतींच्या उगमस्थानाविषयी व प्रसाराविषयी विविध मतप्रवाह आढळून येत असले, तरी अधिक आदिम जिवंत आवृतबीज वनस्पतींच्या सध्याच्या प्रसाराचे विश्लेषण केल्यास असे सूचित होते की, त्यांचे उगमस्थान जुन्या जगाच्या उष्ण कटिबंधात कोठे तरी म्हणजे सध्याच्या आग्नेय आशियात असावे. त्या भागात आदिम आवृतबीज वनस्पतींची सापेक्षतः सर्वाधिक दाटी झालेली आहे.

वर्गीकरण :विभेदक वर्गीकरणवैज्ञानिक गुणधर्म: तुलनात्मक आकारविज्ञान, परागविज्ञान, गर्भविज्ञान, कोशिकाविज्ञान, आनुवंशिकी, जीवरसायनशास्त्र, रक्तरसशास्त्र व जीवभूगोल या विविध क्षेत्रांतून मिळालेल्या माहितीच्या आकडेवारीच्या विश्लेषणावर आवृतबीज वनस्पतींचे वर्गीकरण आधारलेले आहे. संगणक व क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यांचा वर्गीकरणविज्ञानाच्या आधुनिक पद्धतीच्या विकासामध्ये वाढता उपयोग होत असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आवृतबीज वनस्पतींचे गण व कुले यांचे उपविभाग करण्यासाठी आणि त्यांच्यामधील नातेसंबंध निश्चित करण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर आकारवैज्ञानिक लक्षमांवर विसंबून रहावे लागते. प्रामुख्याने पुढील लक्षणांचा त्यांमध्ये समावेश होतो : फुलाच्या अवयवांची संख्या व रचना, झाडावरील फुलांची मांडणी, किंजमंडल व बीजकविन्यासाचा प्रकार, किंजदलांची संरचना, बीजकांचे प्रकार व संरचना आणि आवरणांची संख्या, पुष्क व फलावरण असणे किंवा नसणे केसर मंडल, परागकण व परिदलमंडल यांची संरचना व विकास, पानांची संरचना व मांडणी, त्वग्रंध्रीय आकृतिबंध आणि प्रकाष्ठाची संरचना.

मॅग्नोसलिओफायटा विभागाची मॅग्नोओप्सिडा (द्विदलिकित) व लिलिओप्सिडा (एकदलिकित) या दोन वर्गांत विभागणी केलेली आहे. या दोन्ही वर्गांतील भेद कोष्टकात दिलेले आहेत. कोणत्याही एका लक्षणापेक्षा अनेक लक्षणांचा मेळ घालून द्विदलिकित व एकदलिकित यांच्यातील भेद स्पष्ट केले जातात. एकदलिकितांपासून द्विदलिकित वेगळे (अलग) आहेत हे दाखवू शकतील असे एकही खात्रीलायक लक्षण नाही, ही वस्तुस्थिती आहे. एवढेच काय आवृतबीज वनस्पतींचे दोन गटांत मूळची उपविभागणी ज्या दलिकांच्या संख्येवर आधारलेली आहे तीसुद्धा बदलू शकते. लिलिएलीझ गणातील ॲसगापँथस ह्या आदर्श एकदलिकित वनस्पतींमध्ये काही वेळा गर्भात दोन दलिका असतात तर रॅनन्क्युलस, फिकारिया, कॉरिडॅलिस प्रजातींतील काही जाती, जेस्नेदरिएसी कुलातील काही वनस्पती व इतर अनेक द्विदलिकित वनस्पतींच्या गर्भामध्ये एकच दलिका असते.

द्विदलिकित व एकदलिकित तुलना 

मॅग्‍नोलिओप्सिडा 

( द्विदलिकित) 

लिलिओप्सिडा 

( एकदलिकित) 

सामान्यतः गर्भात दोन दलिका. 

गर्भात एकच दलिका. 

पाने सामान्यतः (१) जाळीदार शिरविन्यास (पिच्छाकृती किंवा हस्ताकृती), (२) क्वचित तळाशी आवरक, (३) देठ उत्तम विकसित. 

पाने सामान्यतः (१) समांतर शिराविन्यास, (२) तळाशी बहुधा आवरक, (३) देठ क्वचित विकसित. 

छदक (असल्यास) सामान्यतः दोन, पार्श्विक. 

छदक (असल्यास) सामान्यतः एक, अक्षसंमुख. 

वाहक वृंदांचे वलय सतत ऊतककर, मध्यत्वचा व भेंड सामान्यतः उत्तम विभेदित 

वाहक वृंद सामान्यतः विखुरलेले किंवा क्वचित दोन वा धिक वलयांत, सामान्यतः मध्यत्वचा व भेंड स्पष्ट नसतात. 

प्राथमिक मूळ सामान्यतः सतत व त्याचे सोटमूळ होते मूलत्राण व रोम उत्पादक स्तर यांचा समान उगम (निंफिएलीझचा अपवाद). 

प्राथमिक मूळ अल्प काळ टिकते, लवकरच त्याची जागा आगंतुक मुळे घेतात मूलत्राण व रोम उत्पादक स्तर यांचा उगम भिन्न ठिकाणाहून. 

काष्ठयुक्त व ओषधीय 

(मुख्यतः काष्ठयुक्त). 

ओषधीय व वृक्षसम 

(मुख्यतः ओषधीय). 

फुलाचे अवयव सामान्यत:चार किंवा पाचाच्या गटात (क्वचित तीन किंवा कमी). 

फुलाचे अवयव आदर्शपणे तिनाच्या गटात (क्वचित चार, पाच कधीही नाही). 

मकरंद ग्रंथी विविध प्रकारच्या, बहुधा रूपांतरित केसरदले व क्वचित सपट प्रकारचे. 

मकरंद ग्रंथी मुख्यतः सपट प्रकारच्या (किंजदलांमधील पटलांत आढळतात). 

परागकण सामान्यतः त्रिखाची किंवा त्रिखाचीसाधित (एकखाची फक्त अगदी थोड्या आदिम कुलांत). 

परागकण एकखाची किंवा एकखाचीसाधित प्रकारचे (केव्हाही त्रिखाची नसतात). 

मुक्तकिंज किंजपुट व एकखाची परागकण असलेल्या काही पूर्वीच विलुप्त झालेल्या वाहिनीविहीन ओषधीय द्विदलिकितांपासून एकदलिकित उगम पावल्या हे पुराव्यांवरून दिसून येते (एकखाची परागकण हे लक्षण आधुनिक निफिंएलीझशी बरेच सारखे आहे). निंफिएलीझ गण हा बहुतकरून काही प्राचीन मॅग्नोलिएलीझपासून आलेला जलपरागित प्रकार असावा. मॅग्नोहलिएलीझचे शाकीय अवयव जलीय पर्यावरणात कमीअधिक ऱ्हास पावले आहेत. कमल कुलीय प्रकारच्या अशा प्राचीन ओषधीय द्विदलिकितांनी एकदलिकितांची सुरुवात झाली असण्याची दाट शक्यता आहे. कमल कुलीय प्रकार त्यांच्या हल्लीच्या प्रतिनिधींपेक्षा अधिक आदिम (कमी ऱ्हसित) असावेत.  


बहुसंख्य द्विदलिकितांच्या तुलनेत एकदलिकितांच्या शाकीय अवयवांत काही अंशी शैशवता असते, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांना सामान्यतः वाहक वृंदीय ऊतककर नसतो. त्यांचे प्राथमिक मूळ सामान्यतः अल्पजीवी, पानांचे देठ व पात्यांत विभेदन न झालेले (किंवा द्विदलिकितांसारखे विभेदन स्पष्ट नसते). पानांचा शिराविन्यास द्विदलिकिंतांच्या अल्पविकसित पानांच्या अवयवांच्या शिराविन्यासाशी जुळता (कळीच्या खवल्यासारखा किंवा छदासारखा) व दोन्हींपैकी एक दलिका दमन झालेली. सर्वांत आधीच्या एकदलिकित वनस्पती बहुधा दलदलवासी वनस्पती असाव्यात व त्यांना बळकट मूलक्षोड (जमिनीखालील आडवे जाडजूड खोड) होते. खरे तर बहुसंख्य ॲलिसमेलीझ व त्याचबरोबर बहुतेक निंफिएलीझ (सेरॅटोफायलम व्यतिरिक्त) आदर्श जलीय भूवनस्पती (जमिनीखाली अन्नसंचय करणारे अवयव असणाऱ्या) आहेत. वरवर पहाता निंफिएलीझ व एकदलिकितांच्या समान पूर्वज वनस्पती उभयवासी भूवनस्पती होत्या. या भूवनस्पतींचे वनांचे छत किंवा वनाची सीमा अशा अवस्थेत स्थलवासी स्थितीत अनुकूलन झाले.

सटीप वर्गीकरण : या लेखात अवलंबिलेले वर्गीकरण हे आर्मेन तख्तजान (१९६९, १९७०) यांच्या वर्गीकरणानुसार असून त्यात नंतरच्या सुधारणांचा समावेश आहे. आवृतबीज वनस्पतींच्या गणांची पूर्ण सूची पुढे दिली आहे. सर्वाधिक महत्त्वाच्या गणांमधील कुलांची परिपूर्ण सूची व त्यांचा निसर्गेतिहास, आर्थिक महत्त्व, आकारविज्ञान व क्रमविकास यांची सविस्तर माहिती गणांवरील व कुलांवरील स्वतंत्र लेखांत दिलेली आहे.

मॅग्नोजलिओफायटा विभाग (अँजिओस्पर्मी) 

संपूर्ण सपुष्प वनस्पती किंवा आवृतबीज वनस्पती याच्या जगभर सर्वत्र प्रसार असलेल्या २,५०,००० जाती आहेत. पुढे गणांमधील कुलांची नावे देताना त्यांच्या पुढील कंसात शक्यतो सर्वसाधारणपणे परिचित असलेल्या वनस्पतींची नावे दिली आहेत.

मॅग्नोकलिओप्सिडा वर्ग : (द्विदलिकित वर्ग). प्रारूपपणे (नमुनेदारपणे) वनस्पतींच्या बीजांत दोन दलिका. मॅग्नोलिया या प्रारूप प्रजातीवरून वर्गाला नाव दिलेले आहे. 

मॅग्नोलिइडी उपवर्ग : बहुतांश काष्ठयुक्त वनस्पती, त्यांपैकी काही वाहिनीविहीन व पुष्कळांमध्ये तेल कोशिका असतात. त्वग्रंध्रांमध्ये बहुधा दोन गौण कोशिका. बहुतेक फुले द्विलिंगी, बहुधा सर्पिल किंवा सर्पिल–चक्रीय. किंजमंडल बहुधा मुक्तकिंज. परागकण द्वि-कोशीय किंवा त्रि-कोशीय, एकखाची अथवा एकखाची साधित प्रकारचे. बीजकांना दोन आवरणे. बीजांत भरपूर किंवा अल्प पुष्क अथवा अजिबात नसतो. याचे सहा गण आहेत.

मॅग्नोचलिएलीझ : (ॲनोनेलीझ). हा आवृतबीज वनस्पतींचा सर्वांत आदिम, हल्ली जिवंत असणारा गण असून यात ⇨मॅग्नोलिएसी (सोन चाफा, कवठी चाफा), डिजिनेरिएसी, ⇨ॲनोनेसी (सीताफळ, हिरवा चाफा), विंटरेसी इ. आठ कुले आहेत.

लॉरेलीझ : मॅग्नोलिएलीझला जवळचा गण पण अधिक विकसित स्पष्टपणे मॅग्नोलिएलीझच्या काही प्राचीन वाहिनीविहीन प्रतिनिधीपासून उगम. ऑस्ट्रोबेलीएसी, मोनिमिएसी, कॅलिकँथेसी, ⇨लॉरेसी (दालचिनी, कापूर, तमाल) वगैरे दहा कुले यात येतात.

पायपरेलीझ : या लॉरेलीझच्या सर्वांत जवळच्या व अधिक विकसित गणात सौरूटेसी व ⇨पायपरेसी (मिरी, नागवेल) ही कुले आहेत.

ॲरिस्टोलोकिएलीझ : मॅग्नोलिएलीझपासून या गणाचा उगम झाल्याची शक्यता असून ⇨ ॲरिस्टोलोकिएसी (पोपटवेल) हे यातील कुल होय.

रॅफ्लेसिएलीझ : ॲरिस्टोलोकिएलीझच्या पूर्वजापासून या गणाचा उगम झाल्याची शक्यता असून यात रॅफ्लेसिएसी व हिद्नोकार्पेसी ही कुले आहेत. 

निंफिएलीझ : मॅग्नोलिएलीझच्या प्राचीन वाहिनीविहीन पूर्वजापासून या गणाचा उगम झाल्याची शक्यता सर्व जलवनस्पती यात ⇨निंफिएसी (कमळ), सेरॅटोफायलेसी वगैरे चार कुले आहेत.

रॅनन्क्युलिडी उपवर्ग : (मोरवेल उपवर्ग). मॅग्नोलिइडीला जवळचा पण अधिक विकसित. बहुतेक वाहिनीयुक्त ओषधीय वनस्पती व सामान्यतः तैल-कोशिकारहित. विविध प्रकारांची त्वग्रंध्रे, बहुतेक वेळा गौण कोशिकारहित. फुले द्विलिंगी किंवा एकलिंगी, सर्पिल किंवा सर्पिलचक्रीय. परागकण बहुधा द्विकोशीय, त्रिखाची किंवा त्रिखाची साधित प्रकारचे. बीजकांना सामान्यतः दोन आवरणे असतात. बहुधा बीजांत भरपूर पुष्क असतो. याचे पाच गण आहेत.

इलिसिएलीझ : स्पष्टपणे मॅग्नोलिएलीझपासून उगम पावलेला गण बहुतकरून विंटरेसीच्या पूर्वजापासून उगमाची शक्यता. इलिसिएसी व शिसॅंड्रेसी ही यातील दोन कुले होत.

निलंबोनेलीझ : सामान्यतः निंफिएसीमध्ये किंवा नंतरचे स्थान असलेला गण तथापि अनेक लक्षणांत भेद. इलिसिएलीझ-रॅनन्क्युलेलीझ पूर्वजांशी दुवा असण्याची दाट शक्यता. निलंबोनेसी हे एक कुल यात आहे.

रॅनन्क्युलेलीझ : (मोरवेल गण). स्पष्टपणे इलिसिएलीझच्या पूर्वजांपासून उगम. लार्डिझाबेलेसी, मेनिस्पर्मेसी, रॅनन्क्युलेसी (मोरवेल), बर्बेरिडेसी वगैरे नऊ कुले यात आहेत. [⟶ रॅनन्क्युलेसी].

पॅपॅव्हरेलीझ : ( अफू गण ). रॅनन्क्युलेलीझच्या अतिनिकटचा परंतु किंजमंडल नेहमी पॅराकार्पस (पराकिंज). ⇨पॅपॅव्हरेसी (अफू), ⇨फ्यूमॅरिएसी (पित्तपापडा) आणि हायपेकोएसी ही यातील कुले होत.

सॅरोसेनिएलीझ : (कलशपर्णी गण). खूप विशेषित गण पण काही आदिम लक्षणांमुळे रॅनन्क्युलेलीझजवळ स्थान असून यात एक कुल आहे [⟶ सॅरोसेनिएलीझ].

हॅमामेलिडी उपवर्ग : बहुसंख्य काष्ठयुक्त वनस्पती, सामान्यतःवाहिनीवंत (युक्त) (ट्रोकोडेंड्रेलीझ अपवाद). त्वग्रंध्रांत दोन किंवा अधिक गौण कोशिका किंवा त्या नसतात. फुले कमीअधिक ऱ्हसित. बहुधा एकलिंगी व प्रदलहीन, क्वचित नग्ने. किंजमंडल सामान्यतः सीनोकार्पस. परागकण सामान्यपणे द्विकोशीय, त्रिखाची किंवा त्रिखाची साधित प्रकारचे. बीजकांना सामान्यतः दोन आवरणे. बीजात भरपूर पुष्क किंवा अजिबात नसतो. यात पंधरा गण आहेत.

ट्रोकोडेंड्रेलीझ : अनेक बाबतींत मॅग्नोलिएलीझ व हॅमामेलिडेलीझमधील स्थान व हॅमामेलिडेलीझला जवळचा गण. ट्रोकोडेंड्रेसी व टेट्रासेंट्रेसी ही यातील कुले होत.

सेर्सिडिफायलेलीझ : ट्रोकोडेंड्रेलीझला जवळचा गण. सेर्सिडिफायलेसी हे एक कल यात येते.  

यूप्टोलिएलीझ : वर्गीकरणवैज्ञानिक दृष्ट्या काहीसा स्वतंत्र गण. यूप्टेलिएसी हे एक कुल यात आहे.

डिडीमेलेलीझ : या गणात डिडीमेलेसी हे कुल आहे. 

हॅमामेलेलीझ : ट्रोकोडेंड्रेलीझ व प्रदलहीन अर्टिकेलीझ, कॅझुरिनेलीझ फॅगेलीझ इ. गणांच्या मधील जोडणारा दुवा असलेला हा हॅमामेलिडेलीझ गण स्पष्टपणे ट्रोकोडेंड्रीलीझ गणाच्या लगेचच्या पूर्वजापासून उगम पावला. हॅमामेलिडेसी, अल्टिंजिएसी, प्लॅलटॅनेसी (चिनार) इ. चार कुले यात आहेत.

यूकोमिएलीझ : या गणात यूकोमिएसी हे कुल आहे. 

आर्टिकेलीझ : ( आग्या गण ). बहुधा हॅमामेलिडेलीझपासून उगम. उल्मेसी (एल्म), ⇨मोरेसी (वड), ⇨कॅनाबिनेसी (गांजा) व ⇨आर्टिकेसी ही यातील कुले आहेत.

बर्बिएलीझ : या गणात बर्बिएसी हे कुल आहे. 

कॅझुरिनेलीझ : हॅमामेलिडेझपासून स्पष्टपणे उगम पावलेला गण. कॅझुरिनेसी हे यातील कुल होय. 


फॅगेलीझ : हॅमामेलिडेलीझपासून या गणाचा उगम झाल्याची शक्यता असून ⇨फॅगेसी (मायफळ, ओक) हे यातील कुल आहे.

वेट्युएलीझ : (भूर्ज गण). बहुधा फॅगेलीझ व त्याचा एक समान उगम असावा. ⇨बेट्युलेसी (भूर्ज) हे यातील एक कुल आहे.

बेलॅनोपेलीझ : या गणात बेलॅनोपेसी हे कुल येते. 

मिरिकेलीझ : (कटफल गण). बहुधा हॅमामेलिडेलीझपासून उगम झाला असावा. ⇨मिरिकेसी (कायफळ) हे एक कुल यात आहे.

जुग्लँडेलीझ : (अक्रोड गण). मिरिकेलीझबरोबर उगम झाला असावा. जुग्लँरडेसी (अक्रोड) व ऱ्हॉयप्टेकिएसी ही यातील कुले होत. [⟶ जुग्लँडेलीझ ].

कॅरिओफायलिडी उपवर्ग : सामान्यतः ओषधीय वनस्पती, छोटी झुडपे, क्वचित वृक्ष. नेहमी वाहिन्या असतात. त्वग्रंध्रात दोन किंवा तीन (क्वचित चार) गौण कोशिका असतात किंवा त्या नसतात. फुले द्विलिंगी किंवा क्वचित एकलिंगी, बहुधा प्रदलहीन, किंजमंडल मुक्तकिंज किंवा सीनोकार्पस. परागकण बहुधा त्रिकोणीय, त्रिखाची किंवा त्रिखाची–साधित प्रकारचे. बीजकांना सामान्यतः दोन आवरणे असतात. बीजात अनेकदा परिपुष्क असतो. यात चार गण आहेत.

कॅरिओफायलेलीझ (चिनीपोडिएलीझ) : (चाकवत गण). रॅनन्क्युलेलीझ गणापासून उगम पावला असण्याची शक्यता. खास करून फायटोलॅकेसीचा रॅनन्क्युलेलीझशी दुवा, विशेषतः मेनिस्पर्मेसी व लार्डिझॅबेलीसी, फ्लायटोलॅकेसी, ⇨निक्टॉजिनेसी (पुनर्नवा), ऐझोएसी, ⇨कॅक्टेसी (निवडूंग, नागफणा), ⇨पोर्च्युलॅकेसी (घोळ), ⇨कॅरिओफायलेसी (कार्नेशन), ⇨ॲमरॅंटेसी (माठ, तांदुळजा), चिनोपोडिएसी (चाकवत) इ. १६ कुले यात येतात.

पॉलिगोनेलीझ : (चुका गण). कॅरिओफायलेलीझप्रमाणे समान पूर्वजापासून उगम झाला असावा. ⇨पॉलिगोनेसी (रेवंदचिनी) हे यातील कुल आहे.

प्लंगबॅजिनेलीझ : (चित्रक गण). कॅरिओफायलेलीझप्रमाणे समान पूर्वजापासून उगम. ⇨प्लंसबॅजिनेसी हे यातील कुल होय.

थेलिगोनेलीझ : थेलिगोनेसी (सायनोकँब्रेसी) हे या गणातील एक कुल आहे. 

डायलेनेइडी उपवर्ग : काष्ठयुक्त किंवा ओषधीय वनस्पती, वाहिन्या नेहमी असतात. त्वग्रंध्रे विविध प्रकारांची, बहुधा गौण कोशिकारहित. फुले द्विलिंगी किंवा एकलिंगी सामान्यतः संवर्त व प्रदल असतात अधिक आदिम कुलांमध्ये परिदलमंडल बहुधा सर्पिल किंवा सर्पिलचक्रीय. किंजमंडल मुक्तकिंज किंवा अनेकदा सीनोकार्पस परागकण द्विकोशीय, त्रिखाची किंवा त्रिखाची–साधित प्रकारचे. बीजकांना सामान्यतः दोन आवरणे. बीजांत बहुधा पुष्क असतो. यात सतरा गण आहेत.

डायलेनिएलीझ : (करंबळ गण). मॅग्नोलिएलीझ व थीएलीझ-व्हायोलेलीझ गटाला जोडणारा दुवा. डायलेनेसी (करंबळ) व क्रॉसोसोमॅटेसी ही यातील कुले होत [⟶ डायलेनिएसी].

पिओनिएलीझ : डायलेनिएलीझला जवळचा व पिओनेसी हे एक कुल असलेला गण. 

थीएलीझ : डायलेनिएलीझला जवळचा गण स्पष्टपणे सुरूवातीच्या डायलेनिएसीपासून उगम. यात थीएसी (चहा), क्लुसिएसी, हायपरिकेसी इ. वीस कुले आहेत.

व्हायोलेलीझ : थीएलीझला अगदी जवळचा गण व त्याच्या जोडीने डायलेनिएलीझपासून समान उगम. यात ⇨फ्लॅकोर्टिएसी (चौलमुग्रा), व्हायोलेसी (व्हायोलेट), सिस्टॅसी इ. आठ कुले आहेत.

पॅसिफ्लोटरेलीझ : (कृष्णकमळ गण). व्हायोलेलीझच्या आदिम प्रतिनिधीपासून उगम व त्यांना अगदी निकटचा. ⇨पॅसिफ्लोरेसी (पॅशन फ्रूट), ⇨कॅरिकेसी (पपई) वगैरे पाच कुले यात आहेत.

कुकर्बिटेलीझ : (कूष्मांड गण). पॅसिफ्लोरेसीशी अगदी निकटचा नातेसंबंध. कुकर्बिटेसी (काकडी, दुधी भोपळा, तोंडले) हे यातील कुल आहे.

बिगोनिएलीझ : व्हायोलेलीझपासून या गणाचा उगम झाला असावा. बिगोनिएसी व डॅटिस्केसी ही यातील कुले होत. 

कॅपॅरेलीझ : (करीर गण). व्हायोलेलीझच्या आदिम प्रतिनिधींपासून उगम, फ्लॅकोर्टिएसीपासून अधिक शक्यता. कॅपॅरेसी, ब्रॅसिकेसी किंवा ⇨क्रुसिफेरी (मोहरी, मुळा, कोबी) वगैरे आठ कुले यात येतात.

टॅमॅरिकेलीझ : (झाऊ गण). व्हायोलेलीझपासून उगम. ⇨टॅमॅरिकेसी, फौक्किरिएसी व फ्रँकेनिएसी ही यातील कुले होत.

सॅलिकेलीझ : (वालुंज गण). सर्व शक्यतांनुसार फ्लॅकोर्टिएसीपासून उगम. सॅलिकेसी हे यातील एक कुल आहे. 

एरिकेलीझ : (क्षेप्यज गण). थीएलीझपासून उगम. ॲक्टिनिडिएसी, क्लेथ्रेसी, एरिकेसी, मोनोट्रोपेसी इत्याही १० कुले यात येतात [⟶ एरिकेलीझ].

डायापेन्सिझएलीझ : डायपेन्सिएसी हे एक कुल असलेला गण.  

एबेनेलीझ : (टेंबुर्णी गण). थीएलीझपासून उगम. स्टायरॅकेसी, ⇨एबेनेसी (तेंडू, रक्तरोहिडा), ⇨सॅपोटेसी (चिकू) वगैरे पाच कुले यात आहेत.

प्रिम्युलेलीझ : एबेनेलीझला अगदी जवळचा गण व थीएलीझबरोबर समान उगमाचा वाटेकरी. ⇨मिर्सिनेसी (वावडिंग), प्रिम्युलेसी (प्रिमरोझ) इ. तीन कुले यात आहेत. [⟶ प्रिम्युलेलीझ].

माल्व्हेलीझ : (भेंडी गण). सुरूवातीच्या व्हायोलेलीझपासून स्पष्टपणे उगम. नऊ कुले- टिलिएसी, बाँबॅकेसी, माल्व्हेसी वगैरे.

यूफोर्बिएलीझ : (एरंड गण). फ्लॅकोर्टिएसी व माल्व्हेलीझ यांच्या दरम्यानच्या प्राचीन गटापासून उगम. बक्सेसी (घोगर), ⇨यूफोर्बिएसी (रबर, राय आवळा) इ. सात कुले यात आहेत.

थायमेलिएलीझ : यूफोर्बिएलीझ व माल्व्हेलीझ यांच्या बरोबरीने समान उगम म्हणजे फ्लॅकोर्टिएसी प्रकारच्या पूर्वजापासून उगम असलेला गण. थायमेलिएसी हे कुल यात येते. 

रोझिडी उपवर्ग : काष्ठयुक्त किंवा ओषधीय वनस्पती वाहिन्या नेहमी असतात. त्वग्रंध्रे विविध प्रकारांची, बहुधा गौण कोशिकारहित किंवा दोन गौण कोशिका. फुले बहुधा द्विलिंगी, संवर्त व प्रदले दोन्ही असतात किंवा प्रदलहीन, किंजमंडल मुक्तकिंज किंवा सीनोकार्पस,परागकण द्विकोशीय, त्रिखाची किंवा त्रिखाची–साधित प्रकारचे. बीजकांना नेहमी दोन आवरणे, बीजांत पुष्क असतो किंवा नसतो. यात १९ गण येतात.

सॅक्सिफ्रागेलीझ : डायलेनिएलीझच्या पूर्वजापासून उगम पावलेला गण. हायड्रँजिएसी, ⇨क्रॅसुलेसी (घायमारी), सॅक्सिफ्रागेसी वगैरे २८ कुले यात आहेत.

रोझेलीझ : (गुलाब गण). सॅक्सिफ्रागेलीझबरोबर समान उगम. रोझेसी (गुलाब), क्रिसोबॅलॅनेसी व न्यूरॅडेसी ही यातील कुले आहेत. [⟶ रोझेलीझ].

फॅबेलीझ : सॅक्सिफ्रागेलीझला जवळचा गण व निकटच्या पूर्वजापासून स्पष्टपणे उगम. फॅबेसी किंवा ⇨लेग्युभिनोजीसह तीन कुले यात येतात.

कोनॅरेलीझ : कोनॅरेसी हे एकच कुल असलेला गण. 

नेपेंथेलीझ : सॅक्सिफ्रागेलीझपासून या गणाचा उगम झाला असावा. ड्रॉसेरेसी व नेपेंथेसी ही यातील कुले होत. 


पोडॉस्टेमोनेलीझ : ⇨पोडॉस्टेमोनेसी (अश्मपुष्पी, घंटाकारी) हे कुल या गणात आहे.

मिर्टेलीझ : (जंबुल गण). सॅक्सिफ्रागेलीझपासून स्पष्टपणे उगम. ⇨लिथ्रेसी (मेंदी), ⇨ऱ्हायझोफोरसी (कांदळ), मिर्टेसी (जांभूळ), ⇨ऑनेग्रेसी (शिंगाडा) वगैरे ११ कुले यात आहेत. [⟶ मिर्टेलीझ].

हिप्पुरिडेलीझ : (हॅलोरॅगेलीझ). मिर्टेलीझच्या निकटचा गण. हॅलोरॅगेसी, गुन्नेरेसी व हिप्पुरिडेसी ही यातील कुले होत.

रूटेलीझ : (सताप गण). सॅक्सिफ्रागेलीझपासून बहुधा उगम झाला असावा. ⇨ॲनाकार्डिएसी (आंबा), ⇨रूटेसी (सताप कुल), ⇨मेलिएसी (निंब) इ. १२ कुले यात आहेत.

सॅपिंडेलीझ : (अरिष्ट गण). रूटेलीझबरोबर स्पष्टपणे समान उगम. ॲसरेसी (मॅपल), हिप्पोकॅस्टॅनेसी (कानोर), ⇨सॅपिंडेसी इ. नऊ कुले यात येतात.

जिरॅनिएलीझ : (कषायमूल गण). स्पष्टपणे रूटेलीझशी विशेषतः रूटेसीशी संबंध. ⇨लिनेसी (अळशी), इरिथ्रोझायलेसी (कोका), ⇨झायगोफायलेसी (गोखरू, धमासा), जिरॅनिएसी, ⇨बाल्समिनेसी (तेरडा) इ. २० कुले यात आहेत [⟶ जिरॅनिएलीझ].

पॉलिगॅलेलीझ : जिरॅनिएलझमधील मालपीगीएसीशी अगदी निकटचे नाते असलेला गण. ट्रायगोनिएसी, व्हॉकिसिएसी, पॉलिगॅलेसी, क्रॅमेरिएसी व ट्रेमँड्रेसी ही यातील कुले होत.

अंबेलेलीझ : (चामर गण). बहुधा सॅक्सिफ्रागेलीझपासून उगम. कॉर्नेसी, निस्सेसी, ॲरेलिएसी (तापमारी), एपिएसी किंवा अंबेलीफेरी (गाजर) इ. १४ कुले यात आहेत [⟶ अंबेलेलीझ].

सेलॅस्ट्रेलीझ : स्पष्टपणे सॅक्सिफ्रागेलीझपासून उगम पावलेला गण. ॲक्विफोलिएसी, ⇨सेलॅस्ट्रेसी वगैरे दहा कुले यात येतात.

ऱ्हॅसम्नेलीझ : (बोर गण). सेलॅस्ट्रेसीबरोबर समान उगमाची शक्यता. ⇨ऱ्हॅम्नेदसी (बोर), ⇨व्हायटेसी (द्राक्ष) व लोएसी ही यातील कुले होत.

ओलिएलीझ : (पारिजातक गण). सेलॅस्ट्रेसीबरोबर समान उगमाची दाट शक्यता. ओलिएसी (जाई, जुई, मोगरा, हेदी) हे यातील कुल.

सँटॅलेलीझ : (चंदन गण). बहुधा सेलॅस्ट्रेलीझबरोबर समान उगमाची शक्यता. ⇨सँटॅलेसी (चंदन), ⇨लोरँथेसी (बांडगूळ), व्हिस्केसी (हाडमोडी) इत्यादींसह याची तेरा कुले आहेत.

एलेग्नेंलीझ : सॅक्सिफ्रागेलीझपासून या गणाची सेलॅस्ट्रेलीझ आणि सँटॅलेलीझ यांच्याशी समान उगमाची शक्यता. एलेग्नेसी हे यातील कुल होय. 

प्रोटिएलीझ : एलेग्ने लीझ व सँटॅलेलीझ यांच्याबरोबर समान उगम असलेला गण. प्रोटिएसी हे यातील कुल आहे. 

ॲस्टरिडी उपवर्ग : बहुतेक ओषधीय वनस्पती. वाहिन्या सदैव असतात. विविध प्रकारांची त्वग्रंध्रे, बहुधा गौण कोशिकारहित. फुले सामान्यतः द्विलिंगी, किंजमंडल सीनोकार्पस (बहुधा आकारवैज्ञानिक दृष्ट्या नेहमी पॅराकार्पस), परागकण ३ किंवा २ कोशीय त्रिखाची किंवा त्रिखाची-साधित प्रकारचे. लहान बीजकांना एकच आवरण असते. बीजांत पुष्क असतो किंवा नसतो. सात गण यात येतात.

डिप्सॅकेलीझ : कॉर्नेलीझशी नाते व त्यापासून समान उगमाची शक्यता असलेला गण. कॉर्नेलीझ व हायड्रँजिएसी या दोहोंशी कॅप्रिफोलिएसीचा स्पष्ट दुवा दिसतो. कॅप्रिफोलिएसी (हनीसकल), व्हॅलेरिएनेसी, डिप्सॅकेसी व  ॲडॉक्सेसी ही यातील कुले आहेत.

जेन्शिएनेलीझ : (किरात गण). डिप्सॅकेलीझबरोबर समान उगम. ⇨लोगॅनिएसी (कुचला), ॲपोसायनेसी (कण्हेर, सदाफुली, सासवीण), ॲस्क्लेपीएडेसी (रूई, मांदार, सोमलता), जेन्शिएनेसी (उडीचिराइत, शंखपुष्पी), रूबिएसी (कदंब) इ. ११ कुले यात आहेत. [⟶ जेन्शिएनेलीझ].

पॉलेमोनिएलीझ : जेन्शिएनेलीझला अगदी निकटचा, बहुधा लोगॅनिएसी व संबंधित कुलांच्या जवळच्या पूर्वजापासून उगम पावलेला गण. पॉलीमोनेसी, ⇨कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी (रताळे, गारवेल), ⇨बोरॅजिनेसी (भोकर, दत्रंग) वगैरेंसह याची आठ कुले आहेत.

स्क्रोफ्यूलॅरिएलीझ : (तारपुष्प गण). पॉलेमोनिएलीझला अगदी निकट, त्यांच्या बरोबराने समान उगम. सोलॅनेसी (धोत्रा), ⇨स्क्रोफ्यूलॅरिएसी (तारपुष्प), ⇨बिग्नोएनिएसी (आकाशनिंब, पाडळ), ⇨जेस्नेरिएसी (पाथरफोडी), ⇨ॲकँथेसी (अबोली, अडुळसा, कोरांटी), प्लँटॅजिनेसी (इसबगोल) इत्यादींसह याची १७ कुले आहेत.

लॅमिएलीझ : (तुलसी गण). स्क्रोफ्यूलॅरिएलीझला अगदी निकट आणि त्यामधून उगम. ⇨व्हर्बिनेसी (निर्गुडी), लॅमिएसी किंवा ⇨लॅबिएटी (तुळस) इत्यादींसह यात चार कुले आहेत.

कँपॅन्यूलेलीझ : (घंटापुष्प गण). पॉलेमोनिएलीझबरोबर जेन्शिएनेलीझमधून समान उगम झाल्याची दाट शक्यता. कँपॅन्यूलेसी, लोबेलिएसी (देवनळ) वगैरे सात कुले यात येतात. [⟶ कँपॅन्यूलेलीझ].

कॅलिसेरेलीझ : कॅलिसेरेसी हे कुल असलेला गण. 

ॲस्टेरेलीझ : (सूर्यफूल गण). कँपॅन्यूलेलीझबरोबर समान उगम. ॲस्टरेसी किंवा ⇨कंपॉझिटी (करडई) हे यातील एक कुल आहे.

लिलिओप्सिडा वर्ग : (एकदलिकित वर्ग). या वनस्पतींच्या बियांत एक दलिका असते. लिली या प्रारूपिक प्रजातीवरून या वर्गाला हे नाव देण्यात आले आहे. 

ॲलिस्मिडी उपवर्ग : ओषधीय वनस्पती, जलवनस्पती किंवा अर्धजलवनस्पती. वाहिन्या नसतात किंवा फक्त मुळांमध्ये असतात. त्वग्रंध्रात (असल्यास) दोन किंवा क्कचित चार गौण कोशिका. किंजमंडल बहुधा मुक्तकिंज. परागकण सामान्यतः द्विकोशीय, एक खाची, अच्छिद्री किंवा दोन पॉलिपोरेट. बीजकांना दोन आवरणे. बीज पुष्करहित. यात तीन गण आहेत.

 ॲलिस्मेलीझ : द्विदलिकितांबरोबर निंफिएलीझशी दुवा साधणारा गण. ब्युटोमेसी, ॲलिस्मेसी (पाणकेळ) व लिग्नोकँटेसी ही यातील कुले होत.

 हायड्रोकॅरिटेलीझ : ॲलिस्मेलीझला निकटचा व त्यापासून उगम पावलेला गण. हायड्रोकॅरिटेसी हे यातील कुल आहे. 

नाजाडेलीझ : ॲलेस्मेलिझला निकटचा व त्यापासून उगम पावलेला गण. दहा कुले असून त्यांपैकी पोटॅमोजेटोनेसी अग्रेसर आहे. 

लिलिइडी उपवर्ग : ओषधीय किंवा क्वचित वृक्षसम वनस्पती. बहुधा फक्त मुळांतच वाहिन्या क्वचितच खोड व पानांत असतात. त्वग्रंध्रे बहुधा गौण कोशिकारहित. क्वचित दोन (लिलिएलीझ गणाच्या काही प्रतिनिधींमध्ये) किंवा दोन वा अधिक गौण कोशिका (झिंजिबरेलीझमध्ये). किंजमंडल बहुतेककरून सीनोकार्पस (बहुधा युक्तकिंज) व अगदी क्वचित बहुशः ॲपोकार्पस. परागकण सामान्यतः द्विकोशीय, बहुधा एकखाची, बीजांत पुष्क असतो किंवा नसतो. यात पाच गण येतात.

ट्राययुरिडेलीझ : ट्राययुरिडेसी हे कुल यात आहे. 

लिलिएलीझ : (पलांडू गण). ॲलिस्मेलीझबरोबर समान उगम. ⇨लिलिएसी (कांदा, लसूण, कोरफड, लिली), ⇨ॲमारिलिडेसी (काळी मुसळी, निशिगंध), ⇨डायास्कोरिएसी (कोनफळ, गोराडू), ॲगेव्हेसी (घायपात), ॲस्परॅगेसी (शतावरी) वगैरे १८ कुले यात आहेत [⟶ लिलिएलीझ].

इरिडेलीझ : (केसर गण). लिलिएसी कुलापासून बहुधा उगम. इरिडेसी (केशर, बाळ वेखंड) यासह चार कुले यात येतात.

झिंजिबरेलीझ : (आर्द्रक गण). बहुधा लिलिएसीपासून उगम पावला असावा. मुसेसी (केळ), झिंजिबरेसी (आले), कॅनेसी (कर्दळ), मॅरँटेसी (तवकीर) इ. आठ कुले यात येतात. [⟶ सिटॅमिनी].

ऑर्किडेलीझ : (आमर गण). बहुधा लिलिएसीपासून उगम. ⇨ऑर्किडेसी (सालंमिश्री, व्हॅनिला) हे यातील कुल आहे. [⟶ ऑर्किडेलीझ].


कॉमेलिनिडी उपवर्ग : बहुशः ओषधीय वनस्पती, सर्व शाकीय अवयवांत वाहिन्या किंवा फक्त मुळांत मर्यादित. त्वग्रंध्रांत दोन, चार किंवा सहा गौण कोशिका, अगदी क्वचित गौण कोशिकारहित. फुले बहुधा द्विलिंगी असून परिदलमंडल कमीअधिक ऱ्हास पावलेले. किंजमंडल सीनोकार्पस (युक्तकिंज किंवा पॅराकार्पस). परागकण द्विकोशीय किंवा त्रिकोशीय, बहुधा एकखाची किंवा मोनोपोरेट. बीजकांना सामान्यतः दोन आवरणे, बीजांत सामान्यतः पिठूळ पुष्क. यात सात गण आहेत.

जुंकेलीझ : (प्रनड गण). लिलिएलीझमधून ब्रोमेलिएलीझ वा कॉमेलिनेलीझ यांच्या बरोबरीने समान उगम झाला असावा. ⇨जुंकेसी व थर्निएसी ही यातील कुले होत.

सायपेरेलीझ : (मोथा गण). सर्वांत आदिम जुंकेसीपासून स्पष्टपणे उगम. ⇨सायपेरेसी (मोथा) हे यातील कुल आहे.

ब्रोमेलिएलीझ : (अननस गण). लिलिएलीझपासून उगम झाल्याची शक्यता (जुंकेलीझ व कॉमेलिनेलीझबरोबर समान उगम). ⇨ब्रोमेलिएसी (अननस) हे यातील कुल होय.

कॉमेलिनेलीझ : (कंचट गण). ब्रोमेलिएसीबरोबरीने समान उगम. ⇨कॉमेलिनेसी (कोषपुष्पी), झायरीडेसी, रॅपॅटिएसी इत्यादींसह याची चार कुले आहेत.

एरिओकॉलेलीझ : एरिओकॉलेसी हे कुल असलेला गण आहे. 

रेस्टिओनेलीझ : कॉमेलिनेलीझबरोबर समान उगमाची शक्यता असलेला गण. रेस्टिओनेसी, फ्लॅजेलॅरिएसी वगैरेंसह चार कुले यात आहेत.

पोएलीझ : (दर्भ गण). रेस्टिओनेलीझपासून उगम, बहुतेक सुरूवातीच्या फ्लॅजेलॅरिएसीपासून. पोएसी किंवा ⇨ग्रॅमिनी (ऊस, गहू, बांबू) हे यातील एक कुल आहे.

ॲरेसिडी उपवर्ग : ओषधीय किंवा वृक्षसम वनस्पती असून बहुतेकांना रूंद सदेठ पाने. सर्व शाकीय अवयवांत वाहिन्या किंवा मुळांमध्ये (ॲरेलीझ) मर्यादित. त्वग्रंध्रांत बहुधा दोन, चार किंवा क्वचित सहा गौण कोशिका. फुले बहुधा एकलिंगी, सामान्यतः लहान व असंख्य असून बहुधा कमीअधिक सहज दिसणाऱ्या महाछदाच्या विरूद्ध फुलोऱ्यात एकत्रित आलेली. परिदलमंडळ सहा खंडांचे, राठ केस  किंवा खवल्यांत ऱ्हासित किंवा नसतात. किंजमंडल सामान्यतः सीनोकार्पस (युक्तकिंज वा पॅराकार्पस), क्वचितच मुक्तकिंज (काही माडांमध्ये). परागकण द्विकोशीय, क्वचित त्रिकोशीय, बहुधा एकखाची. मोठ्या बीजकांना सामान्यतः दोन आवरणे. बीजांत बहुधा नेहमी पुष्क असतो. यात पाच गण येतात.

ॲरेकेलिझ : (ताल गण). लिलिएलीझच्या मुक्तकिंज पूर्वजापासून उगम झाला असावा. ॲरेकेसी  किंवा ⇨पामी (पामेसी नारळ, वेत) हे यातील एक कुल [⟶ पामेलीझ].

सायक्लँथेलीझ : सायक्लँथेसी हे कुल या गणात येते. 

ॲरेलीझ : (अळू गण). बहुतेककरून  ॲरेकेलीझबरोबर समान उगम झाला असावा. ॲरेसी (अळू) व लेम्नेसी ही यातील कुले आहेत. 

पँडॅनेलीझ : (केतकी गण). ॲरेकेलीझ व  ॲरेलीझ यांच्या  बरोबरीने समान उगमाची शक्यता. पँडेनेसी (केवडा) हे यातील एक कुल होय. [⟶ पँडॅनेलीझ].

 टायफेलीझ : (पाणकणीस गण). पँडॅनेलीझबरोबर समान उगमाची शक्यता परंतु आप्तभाव स्पष्ट नाहीत. स्पार्‌गॅनिएसी व टायफेसी (पाणकणीस) ही यातील कुले आहेत.

वर्गीकरणाचे टीकात्मक मूल्यमापन : १९०७ सालानंतर जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ आडोल्फ एंग्लर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुचविलेली वर्गीकरणाची पद्धतीच प्रमुख होती. सध्या उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांत, वनस्पतिवर्णनाच्या ग्रंथांत आणि मोठ्या वनस्पतिसंग्रहांत नमुन्यांच्या मांडणीसाठी अद्यापही हीच पद्धती प्रमाणभूत मानली जाते. तरीही ब्रिटिश वनस्पतिसंग्रहांत जॉर्ज बेंथॅम व सर जोसेफ डाल्टन हुकर यांनी सुचविलेल्या पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पद्धती त्यांनी जेनेरा प्लँवटॅरम (१८६२–८३) या त्रिखंडीय ग्रंथात प्रसिद्ध केली. ब्रिटिश पद्धती परिपूर्ण असल्यामुळे ती सर्वत्र स्वीकारली गेली. तसेच एंग्लर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिचा वापर सर्व वनस्पतिजगतासाठी व सर्व वर्गीकरणवैज्ञानिक पातळ्यांवर केलेला आहे. ही पद्धती १८८३ मध्ये आउगुस्ट व्हिल्हेल्म आइख्लर यांनी सुचविलेल्या पद्धतीवर मुख्यत्वे आधारित होती व फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ आदॉल्‌फ तेऑदॉर ब्राँन्यार (१८४३) यांच्या पद्धतीची वैशिष्ट्ये, तसेच जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ आलेक्सांडर ब्राउन (१८६४) यांच्याही पद्धतीवर आधारलेली होती. एकदलिकित द्विदलिकितांपेक्षा आदिम आहेत, असे एंग्लर यांनी मानले आणि प्रदलहीन व नतकणिश (लोंबती कणसे) फुलोरायुक्त [⟶ पुष्पबंध] द्विदलिकित अक्रोड, भूर्ज, ओक इ. इतरांपेक्षा आदिम असेही ते मानीत. एंग्लसर यांच्या पद्धतीतील प्रमुख दोष म्हणजे त्यांनी साधेपणा हा आदिमपणाचे लक्षण मानला आणि त्याचबरोबर द्वितीयक ऱ्हासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

ब्राउन यांनी १८७५ मध्ये काही मूलभूत कल्पना मांडल्या. त्यांमध्ये आवृतबीज वनस्पतींच्या जातिविकासीय वर्गीकरणविज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांची अनेक दशकांपूर्वीच अटकळ बांधलेली होती. मॅग्नोलिएसी, ॲलिस्मेसी व इतर समान कुलांचा आदिमपणा ब्राउन यांच्या मते फूल हे शंकू मानले, तर वरकरणी आहे. शंकू वस्तुतः सायकॅडांच्या शंकूशी समजात आहे आणि याच्यापुढे लहान, साधी संरचना असलेली एकलिंगी लक्षणांची पाकळ्यांरहित रूपे (एपेटॅली) ही नक्कीच अनुजात म्हणजे त्यांच्यापासून आलेली आहेत व त्यांच्या फुलांचा साधेपणा आदिम नाही. ‘कलेप्रमाणे निसर्गातही साधेपणा सर्वांत परिपूर्ण असू शकतो’, हे ब्राउन यांचे सूत्रवाक्य होते. निश्चितपणे प्रतिपादन केल्याप्रमाणे नव्या तत्त्वांनुसार वर्गीकरणात सुधारणा करण्यापूर्वीच ब्राउन यांचे निधन झाले

इ. स. १८८४ मध्ये ⇨कार्ल व्हिल्हेल्म फोन नेअगेली या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांनी व १८८५ मध्ये पुरावनस्पतिशास्त्रज्ञ गॅस्टन डे सॅपोर्टा यांनी स्वतंत्रपणे सारखे विचार मांडले तथापि क्रमविकासाच्या पायानुसार आवृतबीज वनस्पतींच्या वर्गीकरणात सुधारणा करण्याचे श्रेय अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ चार्ल्स ई. बेसी व जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ हान्स हॅलियर यांच्याकडे जाते. त्यांचे प्रथम शोधनिबंध १८९३ (बेसी) व १९०३ (हॅलियर) मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र हॅलियर यांच्या पद्धतीचे संपूर्ण वर्णन १९१२ मध्ये व बेसी यांच्या पद्धतीचे १९१५ मध्ये प्रसिद्ध झाले. १८९० मध्ये सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात आपल्या व्याख्यानांत वापरलेली पद्धती रशियन वनस्पतिशास्त्रज्ञ क्रिस्टोफर गोबी यांनी १९१६ मध्ये प्रसिद्ध केली. ‘एपेटॅली’ ही फक्त अनुजात व साधेपणा नसून विजातीयही आहे, असे अनुमान ह्या तिघा संशोधकांनी काढले होते व द्विदलिकितांच्या फुलातील भिन्न अवयव क्रमविकासाच्या विभिन्न मार्गांनी उगम पावले असावेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन हचिन्सन यांनी आपल्या द फॅमिलीज ऑफ फ्लॉववरिंग प्लँट्‌स (१९२६–३४) या ग्रंथात वर्गीकरणाची नवी पद्धती सुचविली. ती पद्धती बेसी व हॅलियर यांनी पूर्वी अवलंबिलेल्या तत्त्वांवरच आधारलेली होती. तीमधील एक मुख्य फरक म्हणजे द्विदलिकितांची लिग्नो जी व हर्बेसी या दोन मुख्य गटांत विभागणी होय. लिग्नोजी विभागात ‘तत्त्वतः काष्ठयुक्त’ कुलांचा समावेश होतो तर हर्बेसी विभागात ‘तत्त्वतः ओषधीय’ कुलांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे ॲरिलिएसी व ॲपिएसी किंवा व्हर्बिनेसी व लॅमिएसी यांसारख्या उघडपणे अगदी निकटच्या कुलाची पुष्कळच फारकत होते. हचिन्सन यांची पद्धती मुख्यतः एकूण आकारवैज्ञानिक माहितीवर आधारलेली आहे. तीत काही उणिवा असल्या, तरी तिच्यामुळे आवृतबीज वनस्पतींच्या जातिविकासीय वर्गीकरणविज्ञानाच्या विकासाला चालना मिळाली.

आवृतबीज वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या अगदी अलीकडील पद्धती ह्या सोव्हिएट-आर्मेनियन वनस्पतिशास्त्रज्ञ आर्मेन तख्तजान व अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आर्थर क्रॉन्क्विस्ट यांच्या आहेत. १९४२ मध्ये प्रथम प्रकाशनापासून आतापर्यंत तख्तजान यांच्या वर्गीकरणात खूपच बदल झालेले आहेत. त्याची अद्ययावत रशियन आवृत्ती १९६९ मध्ये व इंग्लिश आवृत्ती १९७० मध्ये प्रसिद्ध झाली. क्रॉन्क्विस्ट यांची पद्धती १९५७ मध्ये भागशः (द्विदलिकित) व संपूर्ण आवृत्ती  १९६८ साली प्रसिद्ध झाली. दोन्ही पद्धती कृत्रिम असून दोघांनी वनस्पतिशास्त्राच्या विभिन्न क्षेत्रांतील माहिती एका वर्गीकरणवैज्ञानिक चौकटीत मांडली आहे, तथापि दोन्ही लेखकांना याची कल्पना आहे की, कितीतरी आवृतबीज वनस्पती गटांची माहिती अपुरी, अर्धवट, पुष्कळांच्या बाबतीत गोंधळात टाकणारी असून वर्गीकरणाचे अनेक बारकावे अनिश्चित आहेत. ह्या दोन्ही पद्धतींत समान बाबीही खूप आहेत. समान पूर्वजांपासून समांतर मार्गाने स्वतंत्रपणे त्यांचा विकास झाला आहे (बेसी यांच्या पद्धतीपासून क्रन्क्विस्ट यांची पद्धती, तर हॅलियर यांच्या पद्धतीपासून तख्तजान यांची पद्धती) व त्यांचा एकमेकींवर परिणाम होऊन दोन्ही पद्धती अधिकाधिक एककेंद्रित होत आहेत. अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या त्यांच्या आवृत्तीत आवृतबीज वनस्पतींना मॅग्नोंलिओफायटाचा विभाग मानून त्याचे मॅग्नोलिओप्सिडा (द्विदलिकित) व लिलिओप्सिडा (एकदलिकित) हे दोन वर्ग केले आहेत. ही नवी नावे नामकरणातील विभागाच्या दर्जापर्यंतच्या प्रकार या संकल्पनेचा विस्तार आहे. मॅग्नोलिओप्सिडा व लिलिओप्सिडा यांच्या उपविभागांच्या उपवर्गाच्या व इतर अनेक मुद्यांच्या बाबतीत एकमत आहे. हंगेरियन वनस्पतिशास्त्रज्ञ आर्‌. सू. (१९६७) व अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ रॉबर्ट एफ्‌. थॉर्न (१९६८) यांनी सुचविलेल्या आधुनिक वर्गीकरणाच्या अन्य दोन पद्धती आहेत. या पद्धतींचे क्रन्क्विस्ट व तख्तजान यांच्या पद्धतींशी बरेच साम्य आहे.

पहा : वनस्पति, अबीजी विभाग वनस्पति, प्रकटबीज उपविभाग वनस्पति, बीजी विभाग वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग वर्गीकरणविज्ञान.

संदर्भ : 1. Bakker, Robert T. Dinosaur Feeding Behaviour and the Origin of Flowering Plants,  Nature, Vol., 274, 17 August, 1978.

           2. Coultor, J, M, Chamberlain, C. J. Morphology of Flowering Plants, Allahabad, 1965.

           3. Crot quist, A. The Evolution and Classification of Flowering Plants, 1968. 

           4. Eames, A. J. Morphology of the Angiosperms, London, 1961.

           5. Heywood, V. H.. Ed., Modern Methods in Plants Taxonomy, 1968.

           6. Hutchinson, J. The Fanuilies of Flowering Plants, London, 1959.

           7. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           8. Mitra, J. N. An Introduction to Systemic Botany and Ecology, Calcutta, 1964.

           9. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

         10. Takhtadzhian (Takhtajan),  A. L. Flowering Plants, Origin and Dispersal, 1961.

राजे, य. वा. परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.