कडू : (सिलाजीत लॅ. स्वर्शिया डेकसॅटा कुल-जेन्शिएनेसी). ही सु. ०⋅३ – ०⋅९ मी. उंच व सरळ वाढणारी ð ओषधी  भारतात सामान्यतः पश्चिम द्वीपकल्पात (विशेषतः सह्याद्रीच्या डोंगराळ भागात) आढळते. खोडावर पानांची गर्दी असते. ते चौकोनी व सपक्ष असते. पाने बिनदेठाची, समोरासमोर, जात्यसम (पानांच्या एका जोडाची वरच्या व खालच्या जोडीशी ९॰कोन करून झालेली मांडणी), अंडाकृती फुले ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये, गुलुच्छ वल्लरीवर [→ पुष्पबंध] दाटीने भरपूर येतात. संदले (पुष्पकोशाची पानासारखी दले) ४ – ५ व पांढरी असून प्रत्येकाच्या तळाशी एक मधुप्रपिंड (मधाची ग्रंथी) असते. बोंड लांबट असून तडकल्यावर दोन शकले होतात बिया पुष्कळ व सपक्ष असतात. या वनस्पतीत चिरॅटीन हे कडू द्रव्य असून ‘कडू’ या नावाने बाजारात मिळते. किराइताऐवजी ज्वरनाशाकरिता ही औषधी उपयोगात आहे.

पहा: किराईत जेन्शिएनेलीझ.

जमदाडे, ज. वि.