लव्हाळा : (१) वनस्पतीचा तळभाग, (२) फुलोरा, (३) कणिश, (४) फूल, (५) अंब्रेला प्लँट.

लव्हाळा : ( हिं. नागरमोथा सं. नागरमुस्तक इं. नटग्रास लॅ. सायपेरस स्कॅरिओसस कुल-सायपेरेसी). ह्या सु. ४०-९० सेंमी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) गवतासारख्या एकदलिकित ⇨ ओषधीचा प्रसार बंगाल, उ. प्रदेश, पू. व द. भारतात आणि ऑस्ट्रेलियात ओलसर जागी (दलदलीत) आहे. खोडाच्या तळाशी असलेल्या आखूड व बारिक (०.८-५ सेंमी. × १.६ मीमी.) तिरश्चरावर (जमिनीसरपट वाढणाऱ्या व टोकास नवीन वनस्पती निर्माण करणाऱ्या फांद्यांवर) विरळ व लांबट खवले असतात. वायवी खोड सरळ, उंच, भरीव व टोकास त्रिकोणी असते. पाने साधी, विविध आकारांची, आखूड, नाजूक कधी लांब तर कधी त्यांचा अभाव असतो. फुलांचे चवऱ्यांसारखे मोठे फुलोरे बारीक असून त्यांवरचे लहान फुलोरे (कणिशे) रेखाकृती व फिकट गवती रंगाचे असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सायपेरेसी किंवा मुस्तक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. ग्रंथिक्षोड गर्द तपकिरी व सुगंधी असून त्यांचा उपयोग सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती व औषधे यांकरिता ⇨ मोथा या जातीच्या वर्णनात दिल्याप्रमाणे करतात. वाफेच्या साहाय्याने केलेल्या ऊर्ध्वपातनने ०.०७५-०.०८०% उडून जाणारे सुगंधी तेल मिळते. लव्हाळ्याच्या ग्रंथिक्षोडाचा काढा परमा व उपदंशावर देतात.

अंब्रेला प्लँट : (अंब्रेला पाम लॅ. सा. आल्टर्निफोलियस). या नावाची लव्हाळ्याच्या प्रजातीतील दुसरी जाती मूळची ऑस्ट्रेलियातील असून शोभेसाठी बागेत लावतात. शैलोद्यानात (खडकाळ जमिनीच्या बागेत), नेचागृहात पादपगृहात व (विशिष्ट प्रकारे वनस्पती-संवर्धन करणाऱ्या कोठीत) लावण्यास ही चांगली असते. ती झुबकेदार व सु. ३०-१२० सेंमी. उंच असून वायवी खोड धारदार व शूलाकृती (लांब काट्याप्रमाणे) असते. छदमंडलातील गर्द हिरवी पाने सु. २०, पसरट किंवा थोडी लोंबती, रेखाकृती, १०-२० सेंमी. लांब असतात कणिशे विपुल असतात. व्हॅरिगेटसग्रॅसिलिस हे दोन शोभिवंत प्रकार आहेत. लव्हाळ्याच्या सायपेरस या प्रजातीत एकूण सु. ६०० जाती असून त्यांपैकी सु. १०० जाती भारतात आढळतात.

संदर्भ :

1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

2. kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol. IV, New Delhi, 1975.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.