बाळवेखंडाचे

बाळवेखंड: (पुष्करमूळ हिं. केवडेका मूल, पोहकर मूल सं. पद्मपुष्कर, हैमवती इं. जर्मन आयरिस, फ्लॅग आयरिस लॅ. आयरिस जर्‌मेनिका कुल-इरिडेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व लहान ओषधी [⟶ ओषधि] आयरिस वंशातील आहे. यूरोप व भूमध्यसामुद्रिक प्रदेशात हिचा आढळ असून मुख्यतः इटलीत लागवड करतात. पूर्वेकडील देशांत ख्रिस्तपूर्व काळी हिची लागवड होत असल्याचा उल्लेख आढळतो. आठव्या शतकात मुस्लीम राज्यकर्त्यांनी स्पेन देश जिंकल्यावर ती वनस्पती स्पेनबाहेर नेल्याचे कळते. बाळवेखंडाच्या खोडाची भारतात इराणमधून आयात होते. हल्ली काश्मिरात थोडी लागवड केली जाते.

ही वनस्पती सु. ६० – ९० सेंमी. उंच असून हिचे खोड (मूलक्षोड) जमिनीत वाढते व त्यापासून जमिनीवर मूलज (मुळापासून वाढल्याप्रमाणे असलेल्या) पानांचा झुबका येतो पाने साधी,लांबट, तलवारीसारखी व दोन रांगांत उभी असून त्यांचे तळभाग अर्धवट परस्परांत गुंतून (परस्परांस वेढून) राहतात. त्या सर्वांमधून फुलोऱ्याचा दांडा वाढून त्यावर पांढऱ्या व जांभळठ रंगाच्या मिश्रछटा असलेले नियमित, सच्छद, द्विलिंगी फूल येते परिदले पाकळ्यांसारखी, सहा (३+३), खाली जुळलेली, वर सुटी आणि पसरट बाहेरील परिदलांवर लांबट केस असतात. केसरदले फक्त तीन, बाहेरील परिदलासमोर व त्यांना चिकटलेली तीन किंजदलांचा एक संयुक्त अधःस्थ किंजपुट, त्यात तीन कप्पे व अनेक बीजके मध्यवर्ती अक्षाला चिकटलेली असतात. किंजले तीन, सपक्ष व पाकळ्यांसारखी असून किंजल्क तिकोनी व त्यांच्या खालच्या बाजूस असतात केसरदले त्यांनी झाकलेली असतात[⟶ फूल]. तीन उभ्या चिरा पडून याचे बोंड (शुष्क फळ) फुटते. बिया सपुष्क (गर्भाभोवती भरपूर अन्नांश असलेल्या). फुलांची एकंदर संरचना कीटकांकडून परागण घडवून आणण्यास सोयीची असते.

बाळवेखंडाला भरपूर सूर्यप्रकाश, चांगली सकस व निचऱ्याची जमीन आवश्यक असते लावणीपूर्वी भरपूर शेणखत घालावे लागते. अभिवृद्धी (लागवड) बिया व खोडाचे तुकडे लावून करतात. अनेक आकर्षक संकरज प्रकार लागवडीत आहेत. मळ्यातील लागवडीत हेक्टरी ५ – ६ टन सुकी मूलक्षोडे दर तीन वर्षांनी मिळतात. लावणीनंतर २ – ४ वर्षांनी फुले येतात. सापेक्षतः अधिक रुक्ष व खोल जमिनीत वाढलेल्या मूलक्षोडास तीव्र वास येतो.

‘ओरिस’, ‘ओरिसरूट’, वा ‘इरिडिस ऱ्हायझोमा’या नावाने मूलक्षोडाचे सोलून वाळविलेले तुकडे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे असतात. साधारणपणे ते ५ – १० X २ – ३ सेंमी. आकाराचे, सुरकुतलेले आणि साधारण चपटे असतात. त्यांना सुगंध येतो, पण ते कडू व तिखट असतात तसे ते बाजारात मिळतात. भारतीय ओरिसचे तुकडे सोललेले नसतात ते रंगाने अधिक काळपट असून यूरोपीय मालापेक्षा कमी सुगंधी असतात. आयरिस वंशातील इतर काही जातींच्या खोडाचे तुकडे समानधर्मी असतात. ह्या तुकड्यांत ‘ओरिस तेल’ असते त्यांचा उपयोग सौंदर्यप्रसाधने, दंतधावने इत्यादींना स्वाद व सुगंध आणण्यास करतात ओरिस तेल बाष्पनशील (उडून जाणारे) असते. काही लोकांना ते मानवत नाही असे कळल्यावरून ते आता कोणी वापरीत नाहीत. थंड पेये, मिठाई, जेली इत्यादींत हे घालून स्वाद आणतात. ओरिस तेलात सीडार तेल, गुर्जन बाल्सम व मिरिस्टिक अम्ल यांची भेसळ करतात. ओरिसतेलामध्ये औषधी गुणही आहेत. ओरिस तेल अत्तरांकरिता फार महत्त्वाचे असते मात्र सुगंधी तेलाकरिता आ. पॅलिडा ही जाती सरस ठरली आहे. बाष्पनशील विद्रावकांच्या (विरघळणाऱ्या पदार्थांच्या) साहाय्याने मूलक्षोडापासून रेझिनॉइडेही मिळतात. ओरिस तुकड्यांत ‘इरिडिन’ हे फ्लॅव्होन-ग्लुकोसाइड, शर्करा, स्टार्च, रेझिने आणि टॅनिने असतात. ओरिस तुकड्यांत उत्तेजक, विरेचक, मूत्रल (लघवी साफ करणारे) गुणधर्म असून खोकला, जलसंचय, यकृतविकार यांवर त्यांचा उपयोग करतात. पुरळ व जखमा यांवर यांचा लेप किंवा पोटीस लावतात. अरुची, अपचन इ. कमी करण्यास ओरिस देतात. इटलीत ओरिसचे मणी बनवून त्यांच्या माळा करतात. केसास लावण्याची तेले सुवासिक करण्यास, मुखास सुगंध येण्यास व दात ढिले झाल्यास किंवा दुखत असल्यास ओरिसचा उपयोग करतात. आ. फ्लोरेंटिना याच्याही मूलक्षोडापासून सुगंधी द्रव्य मिळते. आ. फेटिडिसिमाचे मूलक्षोड उन्मादावर उपयुक्त असते.

पहा : इरिडेसी.

संदर्भ : 1. C. S. I. R.The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

2. Lawrence, G. H. M.Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

3. Rendle, A. B.The Classification of Flowering Plants, Vol. I. Cambridge, 1963.

४. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

टिळक, शा.त्रिं. परांडेकर, शं. आ.