आ.१. मेथुरी : फुलांसह फांदी

मेथुरी : (लॅ. मेलोचिया अंबेलॅटा, कुल-स्टर्क्युलिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. ६–९ मी. उंच असलेला एक लहान वृक्ष. दख्खन (कोकण, कूर्ग, केरळ), अंदमान बेटे इ. ठिकाणी हा आढळतो व शोभेकरिता अनेक ठिकाणी बागेत लावतात. तो जलद वाढत असल्याने पुनर्वनरोपण आणि सावली यांकरिताही विशेषेकरून लावतात. भारतात अनेक ठिकाणी तो जंगली अवस्थेतही आढळतो. याच्या कोवळ्या भागांवर तारकाकृती केसांची लव असते. खोडावरील साल करडी, खरबरीत व आडव्या चिरांनी भरलेली असते. पाने साधी, लांब  देठांची,  एकाआड  एक,  रुंदट  अंडाकृती  किंवा काहीशी गोलसर, सु. १०·४ X ७·८ सेंमी., दातेरी व प्रकुंचित (लांबट टोकाची) असतात. उपपर्णे लहान पानांसारखी असतात. फुले लहान, द्विलिंगी, नियमित, पंचभागी, लालसर असून त्यांचे फुलोरे गुलुच्छयुक्त चवरीप्रमाणे [⟶ पुष्पबंध] असतात ते पानांच्या बगलेत वा फांद्यांच्या टोकांस हिवाळ्यात येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्टर्क्युलिएसी किंवा मुचकुंद कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळ (बोंड) शुष्क, आयत, १·३४ सेंमी., पंचखंडी व केसाळ असते त्यातील पाचांपैकी प्रत्येक कप्प्यात एक तपकिरी, गुळगुळीत, पंखयुक्त बी असते फळांचा मोसम पानगळीबरोबर म्हणजे उन्हाळ्याच्या आरंभी येतो. याचे लाकूड पांढरट, नरम, फार हलके व गुळगुळीत असते. त्याचा उपयोग चहाच्या पेट्या, खेळणी, जळण आणि तरंड यांकरिता करतात. सालीच्या धाग्यांपासून दोर बनवितात.

आ. २. बिल्पट : फुलांसह फांदी

बिल्पट : (लॅ. मे. कॉर्कोरिफोलिया). मेलेचिया या प्रजातीमधील ही भारतात आढळणारी दुसरी जाती असून ही विशेषतः  गुजरातेत व कारवार भागात सामान्य तणाप्रमाणे आढळते. ही ओषधी किंवा लहान झुडपाप्रमाणे असते. हिला पांढऱ्या किंवा लालसर, लहान फुलांचे गुच्छ येतात. हिच्या खोडापासून निघणाऱ्या बळकट, रुपेरी धाग्यांचे लहान मोठे दोर करतात. मासेमारीत, भाताच्या पेंड्या बांधण्यास व छप्परांच्या बांधणीत त्यांचा उपयोग करतात. पानांची भाजी किंवा सार करतात पोटावरील सूज किंवा शरीरावरील जखमा यांवर पानांचे पोटीस बांधतात. पाने व मुळे यांचा काढा आमांशावर देतात.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

पराडकर, सिंधु अ. परांडेकर, शं. आ.