कॉटिलेडॉन : हे नाव क्रॅसुलेसी कुलातील एका फुलझाडाच्या वंशाचे असून यातील काही जातींची पाने खोलगट असल्याने त्यातील पोकळीला अनुलक्षून प्लिनी या वनस्पतिशास्त्रज्ञांनी हे नाव दिले आहे. यातील एकूण जाती सु. १०० असून त्या यूरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडात आढळतात. त्या जाड, मांसल, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) षधी  किंवा झुडपे असून त्यांच्या शारीरिक वैचित्र्यांमुळे (पानांचे स्वरूप, मांडणी, फुलांचा रंग, आकार इ.) त्यांना हल्ली बागेत विशेष स्थान प्राप्त झाले आहे. काही जाती कुंड्यांत किंवा वाफ्यांत फुलोऱ्याकरिता अथवा खडकमिश्रित जमिनीत लावतात. खिडक्यांतील लहान वाफ्यांत व पादपगृहात (नियंत्रित परिस्थितीत वनस्पती वाढविण्याच्या काचगृहात) काही जाती विशेषेकरून शोभा देतात. यांच्या जाड व मांसल आणि केव्हा ताठर पानांचा जमिनीवरच झुबका येतो व त्यामधून विविधरंगी फुलांची मंजरी अथवा वल्लरी येते. काही जातींचे खोड सरळ उभे असून त्यावर समोरासमोर किंवा एकाआड एक, बिनदेठांची किंवा लहान देठांची गर्द किंवा भुरकट हिरवी अथवा निळसर अखंड किंवा दंतुर पाने येतात. फुले लहान, सरळ किंवा लोंबती आणि भिन्नस्वरूपी (नलिकाकृती, घंटाकृती इ.) असून त्यांतील भाग पाचांच्या गटांनी येतात. केसरदले कधी दहा व किंजदले सुटी पाकळ्या खाली जुळलेल्या असतात. [ →फूल]. पेटिकाफळात (घोसफळात) अनेक लांबट, रेषांकित व बारीक बीजे असतात.

कॉटिलेडॉन

नवीन लागवड खोडाचे तुकडे वा पाने लावून करतात. साधारपणपणे थंड व ओलसर जमीन यांना मानवत नाही.

 

परांडेकर, शं. आ.