कायफळ : (गु.कारीफळ क.किरिशिवणी, इप्पेमरा सं.कटफळ इं.बे-बेरी, बॉक्स मिर्टल लॅ.मिरिका नागी कुल-मिरिकेसी). सु.३-१५ मी. उंचीचा हा सदापर्णी आणि सुगंधी वृक्ष हिमालयाच्या पायथ्यास रावी ते पूर्वेस आसामकडे, खासी, जैंतिया नागा आणि लुशाई टेकडया (९००-२,१०० मी.उंचीपर्यंत) येथे आढळतो. शिवाय चीन व जपानमध्येही सापडतो चीनमध्ये शेकडो वर्षे लागवडीत आहे. साल उदी अथवा पिंगट, उभ्या व खोल भेगांमुळे खरबरीत पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), भाल्यासारखी, अनुपपर्ण (उपपर्णरहित), विशालकोनी फुले एकलिंगी, लहान, कक्षास्थ (बगलेतील) मंजऱ्यांवर येतात. संदले व प्रदले नसतात. केसरदले दोन किंवा अधिक किंजपुटात एक कप्पा आणि एक बीजक [→फूल ] फळ लंबगोल अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळाची साल बारीक उंचवटयांनी भरलेली, लालसर किंवा पिवळसर रंगाची बी अपुष्क (वाढणाऱ्या बीजाच्या गर्भाला अन्न पुरविणारा पेशी समूह नसलेली) फळे खाद्य व आंबटगोड असून उत्तेजक पेय तयार करण्यासाठी वापरतात. फहांवरील मेणाचा पातळ थर उकळत्या पाण्यात टाकून वेगळा करतात. साबण, मेणबत्त्या, कातडयांना लावण्याचे पॉलिश इत्यादींमध्ये ते मेण वापरतात.

 

कायफळ : (१) पाने व फुले, (२) फळे

फळे शामक, दीपक (आकुंचन करणारी), जंतुनाशक ज्वर, दमा, कफ यांवर उपयुक्त असून ती मत्स्यविषही आहे. सालीतील पिवळट रंग कातडी कमावण्यास व रंगविण्यास उपयुक्त, पण त्यामुळे कातडयांना चिरा पडतात. लोकरीस व कापडासही रंगाच्या छटा देतात. साल दातदुखीवर चावण्यास व चघळण्यास वापरतात सालीचा रस जखमा धुण्यास चांगला.

राजे, य.बा.

Close Menu
Skip to content