पापटी : (पापट, पापडी हिं. पापरी क. पप्पडी, सुळे बोट्‍टू सं. तिर्यक्‍फला, पापटा इं. इंडियन पेलेट श्रव लॅ. पॅव्हेटा इंडिका कुल-रुबिएसी). सु. एक मीटर किंवा अधिक उंच वाढणारे हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) क्षुप (झुडूप) भारतात विशेषतः टेकड्यांवर सर्वत्र, हिमालयात सु. १,५०० मी. उंचीपर्यंत व अंदमानात आढळते. शोभेकरिता बागेतही लावलेले आढळते. ह्या वनस्पतीच्या वंशात (पॅव्हेटा ) सु. ४०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. ३०

पापटी : (१) फुलोर्‍यासह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) फळाचा आढवा छेद, (५) बी.

जाती आढळतात. पापटीच्या खोडावरची साल पिवळट पातळ व गुळगुळीत असून पाने साधी, सोपपर्ण (उपपर्ण असलेली), पातळ, भिन्न आकारमानांची व आकारांची आणि चकचकीत असतात. उपपर्ण अंतरावृत्तीय [→ पान] अनेक लहान, पांढरी, सुवासिक, पाच पाकळ्यांची फुले मार्च ते मेमध्ये टोकाकडे गुलुच्छ फुलोऱ्यात [→ पुष्पबंध] येतात संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ रुबिएसी  कुलात (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे. मृदू फळ लहान काळे, मांसल व वाटाण्याएवढे असून पक्क झाल्यावर किंचित गोड असते. कच्च्या फळांचे लोणचे करतात कोवळी फुलेही खाद्य असतात. फुलांचा सुवासिक रस थायलंडमध्ये सुगंधी द्रव्यात वापरतात. मूळ सौम्य रेचक, कडू, मूत्रल (लघवी साफ करणारे) व शक्तिवर्धक असून कावीळ, डोकेदुखी, मूत्रविकार इत्यादींवर देतात. जलसंचय ह्या विकारात मुळांचे चूर्ण व सुंठ तांदळाच्या धुवणातून देतात. पानांचे व मुळांचे पोटीस गळू व कंडू यांवर लावतात. याचे लाकूड जळणास उपयुक्त असते. लाकडाचा फांट [→औषधिकल्प] संधिवातावर देतात. कधीकधी पानांवर येणार्‍या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्मजंतू विपुल असुन अशी पाने हिरवे खत म्हणून उपयुक्त असतात. मुळांच्या सालीत डी-मॅनिटॉल असते मुळे पाण्यात उकळल्यावर सुगंध येतो खोडात बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल ०.५५ %, रेझीन १.९ % , एक अल्कलॉइड १.४ %, पेक्टिक पदार्थ ७.८ % इ. असतात. पानांतही अल्कलॉइडे असतात. पॅव्हेटा  सबकॅपिटॅटा  या दुसर्‍या जातीच्या झुडपाची पाने आसामी लोक खातात. पॅ. टोमेंटोजा  ही लहान वृक्षासारखी जाती भारतात सर्वत्र आढळते. तिचे उपयोग पापटीसारखे आहेत. दक्षिण भारताखेरीज इतरत्र आढळणारी जाती (पॅव्हेटा क्रॅसिकॉलिस ) भिन्न असावी असे काहींचे मत आहे.

हर्डीकर, कमला श्री. परांडेकर, शं. आ.