कांदॉल, ऑगस्टीन पीराम दे: (४ फेब्रुवारी १७७८-९ सप्टेंबर १८४१). स्विस वनस्पतिशास्त्रज्ञ, सपुष्प वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरणासंबंधी महत्वाचे कार्य. त्यांचा जन्म जिनिव्हा येथे झाला व शिक्षण तेथेच झाले. नंतर ते पॅरिसमध्ये (१७९६) स्थायिक झाले. तेथे त्यांनीPlantarum succulentarum historia(मांसल वनस्पतींचा इतिहास-४ खंड, १७९९-१८२९) हा ग्रंथ व वनस्पतींच्या औषधी गुणधर्मावरील निबंध (१८०४) लिहून आपले नाव सर्वतोमुखी केले. १८०२ मध्ये त्यांनी लिहिलेल्याAstragalogiaया वाटाण्याच्या कुलासंबंधीच्या ग्रंथामुळे जी. क्यूव्ह्ये व जे. बी. लामार्क यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले व त्यांनी त्यांच्याकडे फ्रान्समधील वनस्पतींसंबंधीच्याFlore francaise(१८०५-१५) या ग्रंथाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याचे काम सोपविले. या ग्रंथाला प्रास्ताविक म्हणून Principes elementaires de botanique (वनस्पतिविज्ञानाची मूलतत्वे) या शीर्षकाखाली लिहिलेल्या भागात त्यांनी पहिल्यानेच लिनीअस यांच्या कृत्रिम वर्गीकरणाच्या पद्धतीऐवजी आपली नैसर्गिक पद्धती विशद केली होती. त्यांनी फ्रेंच सरकारच्या विनंतीवरुन सर्व फ्रेंच राज्याचे शेतकी व वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने सर्वेक्षण करुन १८१३ मध्ये त्यासंबंधीचा वृत्तांत प्रसिद्ध केला. मॉपेल्ये येथे १८०८-१६ या काळात वनस्पतिविज्ञानाचे ते प्राध्यापक होते व त्यानंतर जिनिव्हा येथे ते अध्यापनासाठी परत आले. तेथे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य वनस्पतिकोटीच्या नैसर्गिक वर्गीकरणाच्या पद्धतीवर ग्रंथ लिहिण्यात खर्च केले. त्यांचा मुलगा आल्फोन्स लूइस प्येअर पीराम दे कांदॉल (१८०६-९३) यांनी ते काम (एकूण १६ खंडांत) पुढे चालविले. ऑगस्टीन पीराम हे जिनिव्हा येथे ख्रिस्तवासी झाल्यानंतर तेथेच १८४२ पासून त्यांचा हा मुलगा प्राध्यापक झाला. वडिलांनी ७०,००० वनस्पती त्यांच्या स्वाधीन केल्या होत्या. वनस्पतींच्या नामकरणाचे नियम व मशागती, वनस्पतींच्या उत्पत्तीसंबंधीचा अभ्यास आणि त्यासंबंधी त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांकरिता ते विशेष प्रसिद्ध आहेत.

जमदाडे ज. वि.