करंज : (हिं. किरमल, कांजा गु. कानजी क. करंजमरा, होंगे सं. नक्तमाला, करंजा इं. इडियन बीच लॅ. पाँगॅमिया पिनॅटा कुल-लेग्युमिनोजी-पॅपिलिऑनेटी). सुमारे १२ – १८ मी. उंचीच्या या पानझडी वृक्षाचा प्रसार आशिया व ऑस्ट्रेलिया खंडात भरपूर असून भारतात तो समुद्रकिनाऱ्यावर व नद्यांच्या काठी सामान्यपणे आढळतो. याच्या वंशातील ही एकच जाती असून ती फक्त उष्णकटिबंधातच सापडते. साल मऊ व काळसर हिरवी पाने संयुक्त, पिसासारखी, १२ – २३ सेंमी. लांब दले समोरासमोर पाच ते नऊ. चकचकीत फुलोरे (मंजऱ्या) पानांच्या बगलेत असून त्यांवर जांभळट किंवा गुलाबी छटा असलेली पांढरी लहान फुले एप्रिल ते जूनमध्ये येतात. फुलांत मध भरपूर असून परागण (परागसिंचन) कीटकांद्वारे होते. फुलांची संरचना पतंगरूप [→ अगस्ता] असते. शेंग (शिंबा) ३ – ५ × १.५ – २.५ सेंमी., वाकडी, लांबट, चपटी, दोन्हीकडे टोकदार व गुळगुळीत, कठीण व न तडकणारी बी एक किंवा दोन आणि मूत्रपिंडाकृती. लाकूड घरांची बांधकामे, तेलाचे घाणे, गाड्यांची चाके, जळण इत्यादींसाठी उपयुक्त असते.

या झाडाचे सर्व भाग औषधी आहेत. मुळांचा रस जखमा धुण्यास, ताज्या सालीचा रस रक्ती मूळव्याधीवर पोटात घेण्यास व पानांचे पोटीस कृमियुक्त जखमांवर लावण्यास उपयुक्त असते बियांची पूड ज्वरनाश व अशक्तता नाहीशी करणारी, कफोत्सारक व माकड खोकल्यावर (डांग्या खोकल्यावर) गुणकारी फुले अग्निमांद्यावर बियांचे तेल (करंजेल) संधिवातावर, कातडीच्या रोगांवर (खरूज, नायटे, पुरळ इत्यादींवर), खोकल्यावर वगैरे उपयोगांत असून साबण बनविण्यास व दिव्यात जाळण्यासाठीही वापरतात. मुळे व बी मत्स्यविष आहेत. पाने गुरांना खाऊ घालतात व जमिनीत गाडून खतही करतात. पेंडीच्या खतामुळे शेतातील वाळवीचा उपद्रव कमी होतो. हा वृक्ष शोभादायक असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा व मोठ्या बागांत लावतात. सालीतील धागे काढून ते पिंजून बुरणूस बनवितात.

पहा : लेग्युमिनोजी.

कानेटकर, मो. रा.

करंज : (१) संयुक्त पान, (२) फुलोरा (मंजरी), (३) शिंवा, (४) बी.