लिली : फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग], लिलीयम या प्रजातीतील वनस्पतींचे सामान्य इंग्रजी नाव तथापि इतर कित्येक प्रजातीतील काही वनस्पतीही याच नावाने ओळखल्या जातात. लिलियम या प्रजातीत सु. ८०-१००जाती आहेत. त्या सर्व ⇨ओषधी (नरम व लहान वनस्पती ) असून त्यांना फांद्या नसतात व जमिनीत कंद (मांसल खवल्यांनी बनलेली रूपांतरित खोडे) असतात. त्यांचा प्रसार मुख्यतः उ. गोलार्धातील समशीतोष्ण कटीबंधात आहे. पुष्कळ जातींची शोभेसाठी लागवड करतात. सु. १२ जाती हिमालयातील उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यात व द. भारतात डोंगराळ भागात आढळतात. बऱ्याच विदेशी जाती व प्रकार भारतात उद्यानांत लावतात त्यांचे आकार-प्रकार, फुलांचे रंग, सुवास व काहींची उपयुक्तता यांमुळे यांचे महत्त्व वाढत आहे. त्या बहुवर्षायू (अनेक वर्षे जागणाऱ्या) असून त्यांच्या योग्य वाढीसाठी वर्षभर भरपूर पाणी देणे आवश्यक असते. डोंगरावरील थंड वातावरण त्यांना मानवते. हलक्या किंवा भारी व चांगल्या निचऱ्याचच्या रेताड किंव चिकण जमिनीत लिली चांगल्या वाढतात परंतु जमिनीत चुनखडी नसावी. थोडी सावलीही आवश्यक असते. अभिवृद्धी(लागवड) बिया,कंद, शल्क (खवले), अपप्ररोह (लहान, जाड व जमिनीवर आडवी वाढणारी व टोकास नवीन वनस्पती निर्मिणारी शाखा) इत्यादींनी होते.

(अ) महापद्म : (१) तरंगणारी पाने, (२) फूल; (आ) ॲमेझॉन लिली : (१) पान, (२) फूल.

काही जातींत खोड जमिनीवर एक दोन मीटरपर्यंत उंच वाढते. पाने बहुधा लांब व अरुंद (रेषाकृती किंवा भाल्यासारखी) असतात. ती मूलज (जमिनीतील मूळ किंवा खोड यापासून जमिनीवर वाढून आलेली) किंवा स्कंधोद्भव (जमिनीवरच्या खोडावर आलेली) अथवा दोन्ही प्रकारची [→ पान] असतात. फुलोरे अग्रस्थ (जमिनीवरील खोडाच्या टोकावर) मंजरी, कणिश  किंवा चामर (चवरी) प्रकारचे [→ पुष्पबंध] असतात क्वचित फुले एकाकी असतात (उदा., कमळ) प्रत्येक फुलात सुटी किंवा जुळलेली सहा परीदले, मधुप्रपिंड (मधासारखा द्रव स्रवणारी ग्रंथी ), सहा केसरदले (पुं-केसर) आणि त्रिपुटक (तीन कप्प्यांचे ) ऊर्ध्वस्थ (इतर पुष्पदलांच्या खालच्या पातळीवरचे) किंजमंडल (स्त्री-केसरांचे वर्तुळ) असते [→ फुल].फळ (बोंड) शुष्क, लंबगोल व त्यावर सहा कंगोरे असून बिया पिंगट, चपट्या व अनेक असतात.

लिलियमच्या दोन जाती (लि. जायगॅन्शियम व लि . वॉल्चियानम) हिमालयात आढळतात व त्या औषधीही  आहेत. लिली ह्या सामान्य नावाने इतर प्रजातींतील किंवा कुलांतील काही वनस्पती ओळखल्या जातात. उदाहरणार्थ⇨ कमळाला [→ निंफिएसी ] वॉटर लिली व महापद्माला (व्हिक्टोरिया रेजिया ) जायंट  वॉटर लिली म्हणतात.⇨ कळलावीला ग्लोरी लिली ⇨ सापकांदा म्हणजेच कोब्रा लिली. स्टार-लिली (हिपिॲस्ट्रम रेजिनी), स्पायडर लिली [→ कुमूर], ॲमेझॉन लिली (यूकॅरिस ग्रॅन्डिफ्लोरा), बेलाडोना लिली (ॲमरिलिस बेलाडोना ), ⇨ झेफिर लिली (झेफिरॅन्थस ग्रॅन्डिफ्लोरा) व पिन कुशन लिली (हिमॅन्थस) ह्या सर्व वनस्पती⇨ ॲमारिलिडेसी कुलातील आहेत. लिली ऑफ द व्हॅली (कॉन्व्हलॅरीया मॅजॅलिस) व लेमन-डे लिली (हेमेरोकॅलिस फ्लॅ‍व्हा) ह्या⇨ लिलिएसी अथवा पलांडू कुलातील आहेत. चीन व जपान काही जातींच्या कंदांचा व फुलांचा अन्नासारखा उपयोग करतात.

महापद्म : (इं. रॉयल वॉटर लिली लॅ. व्हिक्टोरीया ॲमेझॉनिका, व्हि.रेजिया कुल-निंफिएसी). ही अमेरिकी जलवनस्पतीची जाती भारतात लागवडीखाली आणली असून ती बहुवर्षायू , काटेरी व जायंट वॉटर लिली ह्या इंग्रजी नावाला शोभेशी एक प्रचंड पाणवनस्पती आहे. हिचा शोध  प्रथम १८०१ मध्ये लागला. तथापि १८३७ पर्यंत तिची माहिती फारशी नव्हती. हिचे खोड (मूलक्षोड) ग्रंथिल (गाठीसारखे) असून ते चिखलात उभे वाढते त्यापासून अनेक नरम सुविरल मुळे फुटतात ती पानांच्या तळाजवळून निघतात. या ग्रंथिल खोडाचा व्यास सु. १५ सेंमी. व उंची सु. ६० सेंमी. असते त्याची वाढ वरच्या टोकास होते आणि खालच्या टोकास त्याचा कुजून नाश होत राहतो. हिची सु. १.५ मी. खोल पाण्यावर तरंगणारी, सपाट, गोलाकार व ताटासारखी पाने सु. २ मी. व्यासाची असून ती सु. ७५-१०० किग्रॅ. वजन पेलू शकतात. द. अमेरिकेत ही वनस्पती ॲमेझॉन नदीत निसर्गतः आढळते. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीवरून या वनस्पतीस नाव दिले आहे. पानाची किनार वर काटकोनात वळलेली असून ती सु. ७.५-२० सेंमी. असते. हिला सु.३०-४५ सेंमी. व्यासाची , सुवासिक, फिकट पिवळी व रात्री फुलणारी, मोठी, एकाकी व व्दिलिंगी फुले येतात ती सायंकाळी सु. पाच वाजता उमलू लागतात, रात्रभर पूर्ण उमलून दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हे येताच मिटतात पुन्हा सायंकाळी आधल्या दिवशीप्रमाणे त्यांची उघडझाप होते तिसऱ्या दिवसापासून पुढे मात्र उमलणे थांबते. फुलांना सौम्य व अननसाप्रमाणे वास येतो. फुलात चार संदले व ५०-७० पाकळ्या असतात केसरदले १५०-२०० आणि वंध्य केसरदले सु. २० असतात :किंजदले ३०-४०, जुळलेली व किंजपुट अधःस्थ असतो. मृदुफळ मनुष्याच्या डोक्याच्या निम्म्या आकारमानाचे व काटेरी असते. बिया अनेक, हिरवट किंवा गर्द तपकिरी असतात त्यात पुष्क (दलिकाबाहेरील अन्नांश) व परिपुष्क (पुष्काबाहेरचा अन्नांश) असतात. भारतात सु. दोन वर्षांनंतर बिया रुजतात. ब्राझीलमध्ये बिया भाजून खातात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे निंफिएसी अथवा कमल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पहा : कमळ; निंफिएसी.

संदर्भ :  1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol.III, New York, 1961.

2. C. S. I. R. The  Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

जमदाडे, ज. वि.; परांडेकर, शं. आ.