मोरिंगेसी : (शेवगा कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील या लहान कुलाचा समावेश ⇨ सॅपिंडेलीझ किंवा अरिष्ट गणात केला आहे. या कुलात फक्त एकच प्रजाती आणि तिच्यातील तीन जातींचा समावेश होतो. ते सर्व पानझडी व जलद वाढणारे वृक्ष असून सिंध, बलुचिस्तान, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका व भारत (पश्चिम हिमालय, राजस्थान, कोकण व दख्खन) या प्रदेशात विशेषेकरून आढळतात. त्यांची लागवडही केली जाते. यांची खोडे मऊ असतात व सालीतून डिंक पाझरतो. पाने मोठी, एकाआड एक, संयुक्त असून ती दोन- तीनदा पिसासारखी विभागलेली असतात. दले व दलके यांच्या तळाशी सूक्ष्म प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुलोरा कुंठित परिमंजरी [⟶ पुष्पबंध] असून फुले मध्यम आकाराची, द्विलिंगी, पांढरी किंवा फिकट पिवळसर असतात. पाच संदलांचे मंडल आकाराने पेल्याच्या आकाराचे आणि पुष्पमुकुटाच्या रंगाचे असते. प्रदले (पाकळ्या) पाच असून वरची दोन लहान, पुढील एक मोठे व बाजूची दोन उभट असतात. एकूण दहापैकी पाच केसरदले वंध्य व पाच कार्यक्षम असतात ती सर्व संदलमंडलाच्या आतील एका वलयाकार बिंबावर असून परागकोशधारी दले पाकळ्यांसमोर व वंध्य दले त्यांच्या एकाआड एक अशी मांडणी असते. परागसिंचन कीटकांकडून होते. फळे लांब, शेंगासारखी, दोन्हीकडे टोकदार व रेषांकित ३–६ कोनी असून तडकल्यावर त्यांतून अनेक त्रिपक्ष किंवा अपक्ष बिया बाहेर येतात व वाऱ्याने पसरविल्या जातात. ⇨ शेवगा व ⇨ सुज्ना ह्या या कुलातील महत्त्वाच्या वनस्पती होत. खाद्य शेंगा व शोभा यांसाठी हे वृक्ष लावतात.

संदर्भ : Lawrence, G. H. M. Taxononty of Vascular Plants, New York, 1965.

मुजुमदार, शां. ब.