बाम : (इं. लेमन बाम लॅ. मेलिसा ऑफिसिनॅलिस कुल-लॅबिएटी). ह्या इंग्रजी नावाने ओळखली जाणारी व सुवासिक पानांबद्दल प्रसिद्ध असलेली ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पती फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग]⇨लॅबिएटीमध्ये (तुलसी कुलात) अंतर्भूत आहे. ती मूळची द. यूरोपातील असून आता सर्व समशीतोष्ण कटिबंधात लागवडीत आहे. सु. दोन हजार वर्षांपूर्वीपासून ती लागवडीत असून अरब, ग्रीक व रोमन लोकांना ती चांगली परिचित होती. तिच्या पानांचा उपयोग औषधे, भाजी, सार व कोशिंबिरी यांत घालण्यास करतात. त्यांतील सुगंधी तेलाला लिंबाप्रमाणे वास येतो व ते काही पेयांत व इतर तेलांत घालतात. फुलांना मधाच्या दृष्टीने महत्त्व आहे.

बिलीलोटन : पानाफुलांसह फांदी

बिलीलोटन : (मे. पर्विफ्लोरा). या हिंदी नावाने ओळखली जाणारी बामच्या वंशातील ओषधीय जाती समशीतोष्ण हिमालयात (१,२॰॰ – ३,॰॰॰ मी. उंच प्रदेशात) व खासी टेकड्यांत आढळते. ती ६॰ – १॰॰सेंमी. उंच व सरळ वाढणारी असून तिला २.५ -१॰ सेंमी. लांब व अंडाकृती पाने असतात. फुले पांढरी किंवा लालसर अथवा पिवळी असून फळांचे भाग लांबट एकबीजी, शुष्क (कपालिका), व्यस्त अंडाकृती (तळाशी निमुळते व टोकास गोलसर), गुळगुळीत व काळपट रंगाचे असतात. हिची इतर शारीरिक लक्षणे सामान्यपणे ⇨ लॅबिएटी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. या वनस्पतीचा बामऐवजी उपयोग करतात. शिवाय ती कडू, दीपक (भूक वाढविणारी), क्षयरोगनाशक व ज्वरशामक असून हिरड्यांना काठिण्य आणण्यास व तोंडास चव येण्यास वापरतात. फळे मेंदूस बलवर्धक व रोगविभ्रमी अवस्थेत (स्वत:च्या प्रकृतीविषयी सतत चिंता करणाऱ्या व आपल्याला काहीतरी गंभीर आजार झाल्याची समजूत करून घेणाऱ्या रुग्णाच्या बाबतीत) उपयुक्त असतात. पाने व खोड यकृत आणि हृदय यांच्या विकारांवर व विषारी कीटकदंशावर उपयुक्त असतात. बाम ही सर्वसाधारण संज्ञा यांखेरीज अनेक वनस्पतींना लावलेली आढळते.

संदर्भ :  1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

            2. Kirtikar, K.R. Basu, B.D. Indian, Medicinal Plants, Vol III, Delhi, 1975.

परांडेकर, शं. आ.