काबरा : (सं. काकदनी हिं. कालंबारी, कळवारी इं. केपर प्लँट लॅ. कॅपॅरिस स्पायनोजा कुल-कॅपॅरिडेसी). ही पसरट वाढणारी झुडुपवजा वेल भूमध्य सामुद्रिक प्रदेशात, उष्णकटिबंधात सर्वत्र, महाराष्ट्रात विशेषेकरून कोरड्या पडलेल्या ओहोळात व कोकणात आढळते. पाने लहान, १⋅३ सेंमी. व्यासाची उपपर्णी काटे वक्र व शेंदरी. मोहक, मध्यम आकाराची व पानांच्या बगलेत एक एकटी फुले जानेवारी-मार्चमध्ये येतात. पाकळ्या पांढऱ्या व केसरदले जांभळी, किंजधर ५ – ७⋅५ सेंमी. लांब [→ फूल] मृदुफळ लिंबाएवढे, लांबट गोल, रेषांकित व लाल बी गोलसर, पिंगट व गुळगुळीत. फुले, कळ्या व फळे यांचे लोणचे करतात. मुळांची साल सौम्य विरेचक, पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणारी), कफोत्सारक, कृमिनाशक, वेदनाहारक व आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी) असून संधिवात, पक्षाघात, पांथरी व क्षयाच्या प्रपिंडावर (गाठीवर) वापरतात. संधिवातावर पानांचे पोटीस लावतात. शुष्क कळ्यांचा ‘केपर सॉस’ नावाचा रुचकर द्रव पदार्थ बनवितात. फ्रान्समध्ये कळ्यांचे लोणचे बनवितात. या दोन्हीस पाश्चात्य देशांत व्यापारी महत्व आहे.

पहा : कॅपॅरिडेसी.

घवघवे, ब. ग.