हूकर, सर विल्यम जॅक्सन : (६ जुलै १७८५–१२ ऑगस्ट १८६५). ब्रिटिश वनस्पतिवैज्ञानिक. ते क्यू (लंडन) येथील रॉयल बॉटॅनिक गार्डन्सचे पहिले संचालक होते (१८४१–६५). त्यांनी शैवले, नेचे, शैवाक वर्ग आणि बुरशी यांसंबंधी तसेच उच्च वर्गातील वनस्पतींच्या माहितीत मोलाची भर घातली. 

 

सर विल्यम जॅक्सन हूकर
 

विल्यम हूकर यांचा जन्म नॉर्विच (नॉरफॉक, इंग्लंड) येथे झाला. त्यांचे वडीलरिचर्ड हूकर सोळाव्या शतकातील ख्यातीप्राप्त धर्मशास्त्रज्ञ होते. १८०५ मध्ये त्यांना योगा-योगानेच एका दुर्मिळ हरिताचा (मॉसचा) शोध लागला. त्याबाबत त्यांनी जेम्स एडवर्ड स्मिथ यांच्या-सोबत पत्रव्यवहार केला. स्मिथहे प्रतिष्ठित लिनीअन सोसायटीचे(लंडन) संस्थापक होते. त्यांनी हूकर यांचा निसर्गविज्ञानात असलेला ओढा बदलून वनस्पतिविज्ञानाकडे वळविला. नॉर्विच येथील ग्रामर स्कूल-मधून शिक्षण घेतल्यानंतर हूकर आइसलँड (१८०९) आणि फ्रान्स, स्वित्झर्लंड व इटली (१८१४-१५) येथील शोधमोहिमांवर गेले. तेथे त्यांना काही प्रमुख वनस्पतिवैज्ञानिकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी वनस्पतिवैज्ञानिक डॉसन टर्नर यांच्या कन्येबरोबर विवाह केला (१८१५). त्यांच्या पाच मुलांपैकी दुसरासर जोसेफ डाल्टन हूकर हा देखील प्रसिद्ध वनस्पतिवैज्ञानिक झाला. विल्यम हूकर ग्लासगो येथे वनस्पतिविज्ञान विषयाचे रिजीयस (राजाद्वारा स्वीकृत) प्राध्यापक होते (१८२०–४१). 

 

हूकर यांनी १८०९ सालापासून पुढील ५० वर्षांत वनस्पतिविज्ञाना-संबंधी अनेक लेख नियतकालिकांमध्ये लिहिले. त्यांचे २० ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचा जर्नल ऑफ अ टूर इन आइसलँड इन द समर ऑफ १८०९ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे (१८११). त्यांना विशेष आवड अबीजी वनस्पतिविज्ञानात (उदा., नेचे, हरिता, शैवले, बुरशी इ.) होती, हे त्यांच्या पुढील ग्रंथांवरून दिसून येते : ब्रिटिश जंगरमॅनीई (१८१६), मस्काय एक्झॉटिकी (१८१८–२०) आयकोन्स फायलिकम (आर्. के. ग्रिव्हेले यांच्यासोबत) (१८२९–३१) जनेरा फायलिकम (१८३८) आणि स्पिशीज फायलिकम (१८४६–६४). त्यांनी पादपजातींसंबंधी देखील महत्त्वपूर्ण अभ्यास केला होता. त्याविषयी त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले : फ्लोरा स्कॉटिका (१८२१), द ब्रिटिश फ्लोरा (१८३०) फ्लोरा बोरिलीस अमेरिकाना : ऑर द बॉटनी ऑफ द नॉर्दर्न पार्ट्स ऑफ ब्रिटिश अमेरिका (१८४०). ते आर्थिक वनस्पतिविज्ञानाचे देखील अध्वर्यू समजले जातात. ते वरील प्रकाशने स्वतः वनस्पतिसंग्रहासह अभ्यासकांना उपलब्ध करून देत. त्यांनी सुरू केलेली अनेक मासिके व नियतकालिके यांच्यामुळे ते ब्रिटिश वनस्पतिविज्ञानाच्या केंद्रस्थानी आले होते. १८४१ मध्ये त्यांना क्यू येथील उद्यानांचे संचालक म्हणून नेमण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली क्यू गार्डन्स जगातील प्रमुख वनस्पतिवैज्ञानिक संस्था बनली. निवृत्तीआधी त्यांनी क्यू येथेच म्यूझीयम ऑफ इकॉनॉमिक बॉटनी (१८४७) याची स्थापना केली. वनस्पतिविज्ञानाचे महत्त्व ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत समजावून सांगत होते. त्यांना १८३६ मध्ये हॅनोव्हरचे ‘नाइट’ बनविण्यात आले.

 

विल्यम हूकर यांचे क्यू (सरे) येथे निधन झाले. 

जमदाडे, ज. वि. वाघ, नितिन भरत