पिशा : (१) नर-वृक्षाची फुलोऱ्यासह फांदी, (२) स्रीस्-वृक्षाची फुलोऱ्यासह फांदी, (३) पुं-फुलोरा, (४) पुं-पुष्प (वंध्य किंजमंडलासह), (५) केसरदले (प्रपिंड-ग्रंथियुक्त), (६) स्त्री -पुष्प, (७) वंध्य केसरदल, (८) किंजमंडल.

पिशा : (पिसा, पिचली क. हग्गोदिमर, तुडगेनसू लॅ. क्टिनोडॅफ्ने हूकेरी कुल-लॉरेसी). फूलझाडांपैकी मध्यम आकारमानाचा सदापर्णी वृक्ष (आवृतबीज, द्विलिकित) याच्या वंशात (क्टिनोडॅफ्ने ) एकूण ७० जाती असून त्यांपैकी सु. १५ जाती भारतात आढळतात. पिशाचा प्रसार द. भारताचा पू. व प. घाटमाथा, उ. कारवार, ओरिसा व सिक्कीम येथील दाट जंगले आणि महाराष्ट्रातील कोकण, महाबळेश्वर, माथेरान, आंबा घाट इ. प्रदेशात आहे. खोडावरची साल भुरी व गुळगुळीत असून कोवळी पांढरट लवदार पाने झुबक्यांनी लोंबतात इतर कोवळे भाग तांबूस व लवदार पाने साधी, चिवट, काहीशी मंडलित, वरून चकचकीत, दीर्घवृत्ताकृती-कुंतसम (भाल्यासारखी), तळाशी गोलसर व टोकाकडे लघुकोनी असून फांद्यांच्या टोकास ५–८ च्या झुबक्यांनी येतात पानांतील शिरांची मांडणी पिसासारखी असते. पानांच्या बगलेत एकलिंगी, पिवळट, लहान फुले स्वतंत्र झाडावरच्या पर्णहीन फांद्यांवर येतात ती परस्परांवर अंशत: झाकून राहणाऱ्या (परिहित) सोनेरी खवल्यांनी झाकलेली असतात. पुं-पुष्पे ऑक्टोबर ते नोव्हेंबरात आठाच्या झुबक्यांनी येतात स्त्री-पुष्पे तशीच पण चामरकल्प (चवरीसारख्या) फुलोऱ्यात असतात. केसरदले पुं-पुष्पात नऊ व जननक्षम आणि स्त्री-पुष्पात सपाट व वंध्य असतात तंतूवर पांढरट विपुल केस आणि आतील तीन केसरदलांच्या तळाशी प्रत्येकी दोन-दोन प्रपिंडे (ग्रंथी) असून परागकोशात चार कप्पे आणि प्रत्येक कप्पा झडपेने उघडणारा असतो किंजपुटात एक कप्पा, किंजल जाडसर, किंजल्क मोठा व छत्राकृती आणि बीजक एकच असते [→ फूल] इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लॉरेसी कुलात (तमाल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ सु. १·५ सेंमी., लंबगोल, लाल व ⇨ ओकच्या वंजुफळाप्रमाणे परिदलाच्या पेल्यात आधारलेले असून फेब्रुवारी ते मार्चमध्ये फळांचा बहर येतो.

पिशाचे लाकूड फिकट तपकिरी, मध्यम कठीण व उत्तम प्रतीचे असते. पाने गुरांना खाऊ घालतात. पानांचा फांट [→ औषधिकल्प] बुळबुळीत असून मूत्रविकार व मधुमेह यांवर गुणकारी असतो. बियांचे तेल मुरगळलेल्या अवयवांवर चोळतात. ⇨ तेल माडातील तेल व खोबरेल यांपेक्षा पिशाच्या बियांतील तेल लॉरिक अम्लाकरिता अधिक चांगले व उपयुक्त असते. लॉरिक अम्लाचा अनेक उद्योगांत मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. साबणापेक्षा प्रक्षालनाचे (स्वच्छ करण्याचे) कार्य अधिक चांगले करणारे सोडियम लॉरी सल्फेट बनविण्यास हे अम्ल उपयुक्त असते. बियांत ४८% घन मेद (स्निग्ध पदार्थ) व त्यामध्ये ९६% ट्रायलॉरीन असते. खोडाच्या सालीत ॲक्टिनोडॅफ्नीन हे अल्कलॉइड असते. पिशाच्या वंशातील दुसरी जाती ॲ.अंगुस्तिफोलिया बिहार, ओरिसा व प. भारत येथे आढळते तिच्या बियांत ३७% घन मेद व त्यात ९०% ट्रायलॉरीन असते हिची फुलेही पिवळट असतात. ह्या दोन्ही जाती एकच असाव्यात असे पूर्वी मानीत व अद्यापही कोणी मानतात. .लॅनॅटा आणि . रेटिक्युलॅटा या अन्य जातीही भारतीयच आहेत पहिली प. घाट व निलगिरीत आणि दुसरी खासी टेकड्यांत आढळते.

पहा : पिसी.  

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.