हेदी : (हेदू, होनांगी हिं. हल्दू, करम गु. हलदखो क. हेड्डे त. कदंबू ते. कदंबे सं. सुपुष्पा, कदंबका इं. यलो टीक, सॅफ्रनटीक लॅ. ॲडिना कॉर्डिफोलिया कुल-रुबिएसी) . या पानझडी वृक्षाचीउंची १२–२४ मी. (जास्तीत जास्त सु. ५० मी.) व घेर १.२–४.५ मी. (जास्तीत जास्त सु. ६ मी.) असून तो म्यानमार, श्रीलंका व भारतात सर्वत्र, विशेषतः मध्य प्रदेश व म्हैसूर या भागातील पानझडी जंगलांत, हिमालयाच्या पायथ्यास यमुनेपासून पूर्वेस (सस.पासून सु. ९०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. 

 

हेदी (ॲडिना कॉर्डिफोलिया) : (१) पानांफुलोऱ्यांसहित फांदी, (२) पानांफळांसहित फांदी.
 

हेदी वृक्षाची साल अंशतः करडी किंवा काळपट आणि अंशतःफिकट किंवा रुपेरी पांढरी, खरबरीत व खवल्यांनी सोलत जाणारी( अपपर्णन) असून कोवळे भाग लवदार असतात. पाने साधी, संमुख, लालसर (१०–२५ सेंमी. व्यासाची), गोलीय, प्रकुंचित (निमुळती), तळाशी हृदयाकृती (त्यावरून जातिवाचक लॅटिन नाव), वरती केशहीनव खाली लोमश वृंत ३.८–१० सेंमी. लांब व लोमश उपपर्णे १.३–१.८ सेंमी. लांब, आयताकृती किंवा व्यस्त अंडाकृती खोडाच्या तळाशी वेडीवाकडी आधारमुळे पानांच्या बगलेत लांब १–३ देठ असूनप्रत्येक देठावर १-२ गोलाकार स्तबक (फुलोरे) [→ पुष्पबंध] वत्यावर पिवळी किंवा लालसर पिवळी सुवासिक लहान फुले जून–ऑगस्टमध्ये झुबक्यांत येतात. फुलांची सामान्य रचना ⇨ रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असते [→ फूल]. अनेक लांब किंजले वकिंजल्क फुलाबाहेर वाढलेले आढळतात. स्तबकातील सर्वच फुलांतील फळे एकत्र मिळून गोलाकार काळे संयुक्त फळ बनते प्रत्येक साधेफळ (बोंड) दोन कुड्यांचे असून बिया अनेक व सपक्ष (पंखासारख्या विस्तारित भाग असलेल्या) असतात. नवीन लागवड बियांपासून करतात. लॅटिन प्रजातिवाचक नाव ‘ॲडिना’ ग्रीक ‘ॲडिनॉस’ (गर्दी) यांवरून पडले आहे, कारण स्तबकावर फुलांची गर्दी असते. 

 

हेदी वनस्पतीचे लाकूड मध्यम बळकट व टणक असून ते मुख्यतः फिरक्यांकरिता (बॉबिन), घराचे बांधकामासाठी (दारे, खिडक्या, जिने इ.), फर्निचर, शेतीची अवजारे, आगगाडीचे डबे, खेळणी व इतर किरकोळ वस्तू बनविण्यासाठी वापरतात. साल तिखट, कडवट असून तिला तीव्र झोंबणारा वास येतो सूज, दाह, चर्मरोग इत्यादींवर गुणकारी तसेच ती जंतुनाशक व ज्वरनाशक असते. सालीचा काढा व ऑरोक्सायलम इंडिकम याचे शर्करायुक्त (साखर) मिश्रण उन्हाळे लागणे यावर उपयुक्त असतो. जखमेतील कीड मारण्यास झाडाचा रस वापरतात. कंबोडियात आमांशावर मुळांचा उपयोग स्तंभक म्हणून करतात. याचे लहान अंकुर व काळीमिरी एकत्र दळून केलेली पूड हुंगल्यावर तीव्र डोकेदुखीवर उपयुक्त ठरते.

 

पहा : कदंब. 

हर्डीकर, कमला श्री.