इंडियन बटरकप : (१) वनस्पतीची फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा उभा छेद.

बटरकप : (क्रोफूट. कुल-रॅनन्क्युलेसी). फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गाच्या [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] रॅनन्क्युलस ह्या वंशातील चमकदार पिवळ्या रंगाच्या व रूंद पेल्याच्या आकाराची फुले येणाऱ्याच विविध वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक हंगामांत जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या) ओषधीय [⟶ओषधि] वनस्पतींना ‘बटरकप किंवा क्रोफूट’ म्हणतात. रॅनन्क्युलस वंशात एकूण सु. २५०-४०० जाती असून त्यांपैकी भारतात अंदाजे २६ आढळतात व इतर सर्व उत्तर समशीतोष्ण प्रदेशात पसरलेल्या आहेत. काहींनी सर्वच जातींना ‘बटरकप’ म्हटले आहे. कित्येकांची शोभेकरिता बागेत लागवड केली जाते. जमिनीवर तर काही पाण्यात वाढतात. कित्येकात तिखट रस असतो. खोड सरळ किंवा आडवे धुमाऱ्याप्रमाणे वाढते. पाने एकाआड एक, खंडित किंवा साधी अखंड फुले नियमित टोकाकडे एकटी किंवा झुबक्यात येतात. याची इतर शारिरीक लक्षणे सामान्यपणे ⇨रॅनन्क्युलेसी कुलात (मोरवेल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात [⟶रॅनेलीझ]. हिरवट संदले ३-५, प्रदले तितकीच किंवा अधिक तळाशी मधुरसयुक्त खाच किंवा खवला केसरदले अनेक किंजदले अनेक बीजक प्रत्येकास एक [⟶फूल] . घोसफळातील प्रत्येक, लहान शुष्क फळ हे कृत्स्नफल असते.

कॉर्न बटरकप (रॅ. अर्धेसिस) ही जाती प. हिमालयात आढळते. ती पाळीच्या तापावर, दमा आणि संधिवातावर देतात. इंडियन (ब्लिस्टर) बटरकप (रॅ.सेलेरॅटस) ही जाती उत्तर भारत व हिमालयात काश्मीर ते आसाममध्ये (१,५००मी. उंचीपर्यंत) आढळते. ती फार जहाल असल्याने कातडीला लागल्यास फोड येतात. सुकल्यावर किंवा शिजवल्यावर हिचे विषारी गुणधर्म जातात. ती उत्तेजक व मूत्रल (लघवी साफ करणारी) आहे. जनावरांनी ती ताजी असताना बाधक ठरते. बिया पौष्टिक व दीपक (भूक वाढविणाऱ्या) आहेत त्या मूत्रपिंड विकारांवर देतात पर्शियन बटरकप (रॅ.एशियॅटिकस) शोभेकरिता भरपूर लावतात. निलगिरी, सह्याद्री व काश्मीर येथे दलदलीच्या ठिकाणी रॅ. म्यूरिकॅटस ही जाती आढळते. रॅ.रेनिफॉर्मिस ही जाती सह्याद्रीतील फार उंच ठिकाणी आढळली आहे. अमेरिकेत (यू.एस.ए.) ‘बल्ब बटरकप’ हिरवळीवर फार शोभून दिसते.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.

१. बाहवा : (१) पान, (२) फुलोरा, (३) फूल, (४) शिंबा (शेंग).
बॉटलब्रश
बटरकप
बांबूच्या विविध जाती : (१) हिरव्या पट्ट्यांचा (बांबुसा व्हल्गॅरिस प्रकार स्ट्राएटा), (२) काळा (फिलोस्टॅकिस निग्रा) (३) रंगीबेरंगी (ऑक्लँडा) स्ट्रिडयूला प्रकार मॅक्युलेटा), (४)राक्षसी (डेंड्रोकॅलॅमस जायगँटियस), (५)कासवाच्या कवचासारखा (फिलोस्टॅकिस प्युबिसेन्स प्रकार हेटेरोसायक्ला), (६) चौरसाकृती (शिमोनोबांबुसा क्वॉड्रँग्युलॅरिस), (७)सोनेरी (फिलोस्टॅकिस ऑरिया).