शोला : (हिं. सोला क. बेंडू इं. सोला पिथ प्लँट लॅ. एशिनोमेन ॲस्पेरा कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] पाणथळ जमिनीत वाढणारे हे लहान व शेंगा येणारे बहुवर्षायू झुडूप भारत, म्यानमार, मलाया व पाकिस्तान येथे सर्वत्र आढळते. तळ्यांच्या काठांवर ते सामान्यपणे वाढते. त्याची उंची २-३ मी. व खोडाचा व्यास ६ सेंमी. असतो. खोडात मऊ, हलका, पांढरा भेंड असतो. त्याला फार फांद्या येत नाहीत. पाने बिनदेठाची व लांबट, संयुक्त, पिसासारखी व तळाशी लहान उपांगे असलेली असतात. पानांच्या बगलेत फुलांच्या गुलुच्छासारख्या मंजऱ्या ऑगस्ट-डिसेंबरमध्ये येतात. शेंगा कठीण, सरळ, बारीक व ५-८ सेंमी. लांब असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

शोलाच्या खोडातील हलक्या व विरळ लाकडाचा उपयोग कोळी लोक आपल्या जाळ्यांसाठी करतात. पोहण्याचे पट्टे, बाटलीची बुचे, खेळणी, कृत्रिम फुले इत्यादींसाठी भेंड उपयुक्त असते. सर्वांत उत्तम प्रतीचे भेंड कोलकात्याच्या बाजारात मिळते.

पश्चिम बंगाल, आसाम व दक्षिण भारतात आढळणाऱ्या ए. इंडिका या जातीच्या वनस्पतीपासूनही भेंड निघते पण ते कठीण असल्यामुळे टोप्यांसाठी (विशिष्ट प्रकारच्या हलक्या हॅटसाठी) सोयीस्कर नसते, तरीही बाहेरून शोलाच्या भेंडाचे थर लावून टोप्या तयार करतात.

परांडेकर, शं. आ.