काकर : (पाकर, भेकल, तांबट हिं. बिलांग्रा गु. कंकोड क्र. हत्तरीमुळळू इं. गव्हर्नर्स प्लम, मादागास्कर प्लम लॅ. प्लॅकोर्टिया रॅमोची कुल-प्लॅकोर्टिएसी). या लहान, काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान उष्णकटिबंधीय आफ्रिका व आशिया असून त्याचा प्रसार भारतात (हिमालयाचा उत्तर व दक्षिण भाग) भिन्न प्रकारच्या जंगलांत आहे. पाने हिरवी, चकचकीत, विविध आकाराची व प्रकारची ती जानेवारी ते फेब्रुवारीत गळतात व एप्रिल-मेमध्ये नवीन पालवी येते. फुले हिरवट पिवळी, मंजरीवर, नोव्हेंबर-मार्चमध्ये येतात. अश्मगर्मी (आठळीयुक्त) फळे आंबट, कधी तिखट-गोड, जांभळी, गोलसर व रसाळ असून ती मार्च-जुलैत येतात बिया ८-१६ असतात. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथे या वृक्षाचे तीन प्रकार आढळतात (सॅपिडा, लॅटिफोलिया व ऑक्सिडेंटॅलिस).

फळ कावीळ व प्लीहेवर (पानथरीवर) व डिंक इतर औषधांबरोबर पटकीवर देतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व मूत्रल (लघवी साफ करणारी) असून कातडी कमावण्यासही वापरतात. लाकूड लाल, कठीण, सुबक, टिकाऊ असते पण भेगा पडण्याची शक्यता असते. कोरीव व कातीव काम, शेतीची अवजारे, खांब इत्यादींकरिता ते वापरतात. फळे स्वादिष्ट, क्षुधावर्धक, पाचक व खाद्य असून त्यांचे मुरंबे, जेली वगैरे करतात. पाला जनावरांना खाऊ घालतात.

पहा : फ्‍लॅकोर्टिएसी.

जमदाडे, ज. वि.