एरिओकॉलॉन : (इं. पाइपवर्ट कुल-एरिओकॉलेसी). एकदलिकित फुलझाडांपैकी एका वंशाचे लॅटिन नाव. ह्यातील सु. २५० जाती उष्ण प्रदेशात आढळतात. भारतात एकूण ६० जाती असून जगात सर्व जाती पाणथळ जागी आढळतात. त्या वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या), लहान व बहुधा खुज्या खोडांच्या ओषधी [→ओषधि] असून त्यांच्या तळाशी गवतासारख्या अनेक निरुंद, लांब आणि मूलज (मुळापासून निघालीत अशा वाटणाऱ्या) पानांचा झुबका असतो. काही जाती कोरड्या व रुक्ष ठिकाणी वाढतात. पानांच्या झुबक्यातून वर वाढणाऱ्या अनेक पोकळ, बारीक व रेषांकित दांड्यांवर प्रत्येकी एक गेंदासारखा गोल किंवा लंबगोल फुलोरा [स्तबक, → कंपॉझिटी पुष्पबंध] येतो त्यात एकलिंगी, लहान, छदयुक्त, करडी फुले असतात. ती द्वि-त्रि-भागी, अवकिंज व छदमंडलाने वेढलेली असून परिदले पातळ व दोन मंडलांत असतात [→ फूल]. बोंडात सपुष्क (वाढणाऱ्या बियांच्या गर्भांना अन्न पुरवठा करणाऱ्या पेशी समूहाने युक्त) बिया असतात.

एरिओकॉलॉन : (१) पानांचा झुबका, मुळे व वर आलेले दोन फुलोरे, (२) एक पुं-पुष्प, (३) स्त्री-पुष्प (संवर्त काढलेले), (४) किंजमंडल.

उथळ पुष्पपात्रात शोभेकरिता ही वनस्पती ठेवतात. मलायात भात खाचरात तणाप्रमाणे हिची एक जाती (. सेक्यँग्युलेर  ) उगवते व नांगरताना ती जमिनीत गाडून तिचे खत बनवितात. भारतीय द्वीपकल्पात, विशेषत: कारवारापासून पुढे दक्षिणेत, ही विपुल आढळते. . सेप्टँग्युलेर ही जाती यूरोपीय आहे उ. अमेरिकेतही ती आढळते.

परांडेकर, शं. आ.