अजमोदा. (१) पान, (२) फुलोरा, (३) फूल, (४) फळ.

अजमोदा : (हिं. अजमूद गु. बोडी अजमो सं. उग्रगंधा इं. सेलरी लॅ. अ‍ेपियम ग्रॅव्हिओलेन्सकुल-अंबेलिफेरी). ही ६०-९० सेंमी. उंच व वर्षायू ओषधी मूळची समशीतोष्ण यूरोपातील असून इंग्लंड ते आशिया मायनर या प्रदेशात आढळते. भारतात वायव्य हिमालयाचा पायथा, पंजाब व उत्तर प्रदेश येथे ती सापडते. व्यापारी दृष्ट्या मोठी लागवड करून वार्षिक उत्पादन बरेच करतात. हा लागवडीतला प्रकार (डुल्से) द्विवर्षायू असून मुळे मांसल, त्यावर लांब दांड्याच्या संयुक्त पानांचा झुबका व पांढऱ्‍या फुलांचा चामरकल्प (चवरीसारखा) फुलोरा असतो. दांडे रसाळ व मोठे असून कृत्रिम प्रकाशबंदीने ते अधिक पांढरट बनविता येतात यांनाच ‘सेलरी’ हे व्यापारी नाव आहे. फळे शुष्क,गर्द पिंगट, रेषांकित व बारीक असतात. इतर  शारीरीक लक्षणे ⇨ अंबेलेलीझगणाच्या वर्णानात दिल्याप्रमाणे [→गाजर, कोथिंबीर]. मुळे व पाने, भाजी, सार अथवा फक्त स्वाद ह्याकरिता वापरतात.

सेलेरिआकया यूरोपीय प्रकारच्या (रॅपेशियम) मांसल मुळांचा उपयोग सार व स्वाद यांकरिता विशेषेकरून करतात. बियांतील स्वादिष्ट तेल पदार्थास खमंगपणा आणते. भारतात या प्रकारची बागेत लागवड करितात. मुळे शामक, मूत्रल (लघवी साफ करणारी), आरोग्य सुधारणारी, सूज व शूल (तीव्र वेदना) कमी करणारी बिया उत्तेजक, पौष्टिक, वायुनाशी, मूत्रल, आर्तवजनक (विटाळ सुरू करणाऱ्‍या) व हृद्‌बल्य (हृदयास बल देणाऱ्‍या) असतात. दमा, खोकला, यकृतविकार, प्लीहाविकार इत्यादींवर उपयुक्त. फळांचे तेल सुगंधी द्रव्यांत वापरतात.

परांडेकर, शं. आ.