वायूतक: (एरेंकायमा). पाण्यात अंशतः किंवा पूर्णतः बुंडून वाढणाऱ्या वनस्पतीच्या शरीरात हवेचा मोठ्या प्रमाणावर वावर होण्याकरिता कोशिकांच्या (पेशींच्या) मधून मधून (अंतराकोशिकी) लांब व प्रशस्त असे हवामार्ग आढळतात त्यांना वायुमार्ग म्हणतात व अशा लहान-मोठ्या वायुकोटरांनी (हवायुक्त पोकळ्यांनी) भरलेल्या ऊतकास (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहास) वायूतक म्हणतात. पाण्यातून किंवा दलदलीच्या जमिनीतून त्यात वाढणाऱ्या वनस्पतींच्या भागांना पुरेसा हवेचा पुरवठा होत नसल्याने ज्या भागांचा हवेशी संबंध येतो, त्यांच्याद्वारे हवामार्गांतून (वायूतकातून) इतर भागास हवेचा पूरवठा केला जातो. यातील हवा ⇨ प्रकाशसंश्लेषण चालू असते त्या वेळी कार्बन डाय-ऑक्साइडाचा पुरवठा करते व मुक्त झालेला ऑक्सिजन राखून ठेवून पुन्हा तो श्वसन क्रियेस पुरविते. शिवाय अशा हवेच्या आतील साठ्यामुळे त्या भागास (१) तारकोतक: (अ) केळीच्या व (आ) कर्दळीच्या पानांचा आडवा छेद. (२) प्राथमिक वायूतक : पाण्यात बूडलेल्या पानाचा आडवा छेद : (अ) वायूकोटर, (आ) मध्यपट (३) द्वितीयक वायूतक: पाण्यात बुडलेल्या भागाचा आडवा छेद. किंवा त्या सर्व वनस्पतीस तरंगणे सहज साध्य होते. वस्तुतः जलवनस्पतींची ही परिस्थितिसापेक्ष व आवश्यक अशी अनुयोजना (परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता) होय. वायूतकाचे दोन मुख्य प्रकार आढळतात : (१) कोणत्याही भागातील प्राथमिक ऊतकामध्ये त्याचा विकास होत असतानाच मोठी वायुकोटरे बनली असल्यास तिला वायूतक असे सामान्यपणे म्हणण्याचा प्रघात आहे. पानातील, खोडातील किंवा मुळातील ⇨ मध्यत्वचेचा काही भाग वायुमार्गयुक्त बनल्याचे आढळते. यांतील कोशिका कधीकधी तारकाकृती असल्याने त्यांमध्ये आपोआपच मोठ्या पोकळ्या राहतात व अशा ऊतकास तारकोतक म्हणतात (उदा., कर्दळ व केळ यांचे देठ) इतर काहींत (उदा., कुमुद, कमळ, शिंगाडा, पाण्यातील हायासिंथ) पोकळ्यांमोवती साध्या कोशिका असतात. (२) पूर्णपणे द्वितीयक प्रकारचे ऊतक याचा उगम पार्श्विक (बाजूच्या) पण द्वितीयक विभज्येत [सतत नवीन कोशिकांची निर्मिती करणाऱ्या समूहात ⟶ विभज्या] असतो त्या विभज्येला त्वक्षाकर [⟶ त्वक्षा] म्हणतात. पाण्यातील काही वनस्पतींत (खोडात किंवा मुळात) या प्रकारचे वायूतक आढळते. येथे या त्वक्षाकराचा उगम अपित्वचेत किंवा मध्यत्वचेत होतो. त्वक्षाकरापासून एरवी बाहेरच्या बाजूस त्वक्षा-कोशिका (व बुचाने भरलेले थर) बनतात पण येथे मात्र पातळ आवरणाच्या नाजूक कोशिकांचे ऊतक निर्माण होते. यांमध्ये दोन प्रकारच्या कोशिका असतात. काही फारशा लांबरुंद होत नाहीत परंतु काही फक्त त्रिज्येच्या दिशेत अधिक वाढून त्यांचे. उभे पडदे होतात व ठराविक मापाची नियमित वायुकोटरे बनतात. अशा कोशिकांचे थर आतून बनत येतात व बाहेरच्या जुन्या ऊतकांना जास्त बाहेर लोटतात व शेवटी तेथे बरेच रुंद वायूतक बनते. वायूतकातील वायुकोटरात पाणी शिरून वायुमार्ग बंद होऊ नयेत यास्तव मधून मधून बारीक छिद्रे असलेले मध्यपद (आडपडदे) असतात.

पहा : ऊतककर ऊतके, वनस्पतींतील जलवनस्पति त्वक्षा वल्क विभज्या.

संदर्भ : Eames, A. J. MacDaniels, L. H. Introduction  to  Plant Anatomy, Tokyo, 1953.

परांडेकर शं. आ.