हॉर्नबीम : बेट्युलेसी कुलातील कार्पिनस प्रजातीमधील सु. २५ जातींच्या मंद वाढणाऱ्या शोभिवंत, टणक आणि व्यापारी वृक्षांना’ हॉर्नबीम’ संबोधतात. त्यांचा प्रसार संपूर्ण उत्तर गोलार्धात आहे. हॉप-हॉर्नबीम ही वनस्पती बेट्युलेसी कुलातील दुसऱ्या प्रजातीमध्ये समाविष्ट आहे. हॉर्नबीम वनस्पतीची साल मऊ व करडी असून खोड ऊर्ध्ववक्री असते आणि आडव्या फांद्या पसरट असतात. अंडाकृती वा भाल्यासारख्या आकाराची एकाआड एक पाने हिवाळ्यात वृक्षावर टिकून राहतात. बेट्युलेसी कुलातील इतर वनस्पतींपेक्षा हॉर्नबीम वेगळी असते. कारण पुं-नतकणिश वसंत ऋतूत परिपक्व होईपर्यंत तयार होत नाहीत. फळाभोवती पानासारख्या त्रिखंड चोडाचे आवरण असते. कपालिका १ सेंमी. लांब असते.

 

यूरोपीय हॉर्नबीम (का. बेट्युलस) वनस्पतीचे खोड पिळदार असून फांद्या सरळ पसरलेल्या असतात. ही वनस्पती सु. २० मी.पर्यंत वाढू शकते. याच्या एका प्रकारात साधारण पाने आणि ओक वृक्षासारखी पाने एकाच वृक्षावर आढळतात.

 

अमेरिकन हॉर्नबीम (का. कॅरोलायनियॅना) ही वनस्पती वॉटर बीच आणि ब्ल्यू बीच म्हणून देखील ओळखली जाते. निळ्या-करड्या खोडामुळे या वनस्पतीला ब्ल्यू बीच हे नाव मिळाले आहे. तिची वाढ १२–१८ मी.पर्यंत होते. तिचे गुळगुळीत खोड जोमदार किंवा पीळदार असूनलोंबत्या व लवचिक फांद्यांमध्ये विभागलेले असते. पाने अंडाकृती, तपकिरीहिरवी, १० सेंमी. लांब असतात व उलगडताना त्यांवर पांढऱ्या रंगाची केसांसारखी लव दिसते. परिपक्व पाने निळसर-हिरवी, तर शरद ऋतूत केशरी किंवा नारिंगी-पिवळी होतात. टणक, कठीण व जड लाकडामुळे तिला सामान्यपणे आयर्नवुड म्हणतात.

 

आशियाई हॉर्नबीम (का. कॉर्डेटा) साधारणतः १५ मी. उंच वाढते. तिची हृदयाकृती पाने सु. १५ सेंमी. लांब असतात. जपानी हॉर्नबीम(का. जॅपोनिका) या वनस्पतीची लवयुक्त पाने उलगडल्यावर लालसर तपकिरी होतात. कोरियन हॉर्नबीम (का. एक्झिमिया) उंचीने लहान (सु. ९ मी.) असते आणि तिची लवयुक्त पाने अंडाकृती असून टोके लवचिक असतात.

 

यूरोपीय हॉर्नबीमच्या पांढऱ्या व टणक लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे बनविण्यासाठी होतो. जुन्या जगातील बागांच्या वळणदार पायवाटा आणि वईंवर या वनस्पतीचा शोभेसाठी सामान्यपणे वापर केलेला आढळतो, तसेच त्यांची छाटणी विशिष्ट आकारांत केलेली आढळते. अमेरिकन हॉर्नबीम वनस्पती शोभेसाठी फारशी प्रसिद्ध नाही.

 भारस्कर, शिल्पा चं.

 

हॉर्नबीम
हॉर्नबीम