किंकानेला : (खब्बर, कांखीना हिं. बहापिलू सं. पिलू लॅ. सॅल्व्हॅडोरा ओलिऑइड्स कुल – सॅल्व्हॅडोरेसी). ⇨ मिरजोळीच्या वंशातील या लहान सदापर्णी वृक्षाचा प्रसार गुजरात, सिंध, बलुचिस्तान, पंजाब, राजस्थान, एडन इ. ठिकाणी आहे. याचे खोड लहान पिळवटलेले व वाकडे असून त्यावर अनेक कडक व सफेद फांद्या असतात. पाने साधी, पांढरट हिरवी, केशहीन, चिवट व पिकल्यानंतर थोडी मांसल, लांबट, गुळगुळीत, अस्पष्ट शिरांची असून टोकास बारीक काटा असतो. फुलोरा – परिमंजरी             [→ पुष्पबंध] फुले हिरवट सफेद, लहान, बिनदेठाची असून कक्षास्थ (बगलेतील) परिमंजरीवरच्या कणिशात जानेवारी–मार्चमध्ये येतात. संवर्ताची दले चार, वाटोळी पुष्पमुकुट त्यापेक्षा लांबट व प्रदले खाली अंशत: जुळलेली [→ फूल] फळ लहान, गोलसर, अश्मगर्भी (आठळीयुक्त) व जूनमध्ये पिकल्यावर पिवळे होते ते आंबट गोड, खाद्य व वाजीकर (कामोत्तेजक) असते. पाने रेचक व कफनाशक बियांचे फिकट हिरवे तेल संधिवातावर आणि बाळंतिणीस मर्दन करण्यास उपयुक्त मुळांची साल लावल्यास फोड येतात. उंटांना उन्हाळ्याच्या प्रारंभी याची पाने खाण्यास फार आवडतात.

पहा : सॅल्व्हॅडोरेसी.

नवलकर, भो. सुं.