फालसा : (१) फुलांसह फांदी, (२) फळे.

फालसा : हे मराठी नाव काही शास्त्रज्ञांनी ग्रेविया एशियाटिका या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या लागवडीतील वनस्पतीस उद्देशून वापरले आहे परंतु हल्‍ली ती विशिष्ट जाती ग्रेविया सबइनेक्वालिस आहे असे मानतात. ग्रेविया ह्या ⇨ टिलिएसी कुलातील वा परूषक कुलातील वंशात एकूण सु. १५० जाती असून भारतात त्यांपैकी सु. ४२ जाती आढळतात. त्यांपैकी अनेकांना खाद्य फळे येतात आणि काही चांगल्या लाकडाबद्दल प्रसिद्ध आहेत. ग्रे. सबइनेक्वालिस ही जाती विशेषकरून फळांकरिता लागवडीत आहे. ग्रे. टिलीफोलिया [→ धामणी] पासून उपयुक्त लाकूड मिळते. पुढे दिलेली माहिती ग्रे. सबइनेक्वालिस ह्या जातीबद्दलची आहे. शास्त्रीय नावासंबंधी काही मतभेद आहेत. हिंदी व गुजराती भाषांत हिला ‘फालसा’ आणि संस्कृतात ‘परूषक’ म्हणतात त्यावरूनच कुलनाम सुचविले आहे. मराठीत ‘फालसी’ असाही नामनिर्देश आढळतो.

सुमारे ६ मी. उंच वाढणारा हा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र आढळतो तसेच सर्वत्र (विशेषतः पंजाब, उ. प्रदेश व महाराष्ट्र येथे) ह्याची लागवड करतात. ह्याची साल करडी व खरबरीत असून पानांची खालची बाजू व फुलोरे इ. भागांवर मऊ व पिवळट लव असते. उपपर्णे लांबट व भाल्यासारखी पाने साधी, मोठी, एकाआड एक, तिरपी, तळाशी हृदयाकृती, अंडाकृती व दातेरी ती हिवाळ्यात गळतात व नवीन पाने मार्चअखेर येतात. फुले पिवळी व त्यांचे प्रत्येकी ३-५ चे झुबके पानांच्या बगलेत मार्चमध्ये येतात. संदले आतून लालसर तपकिरी फळ अश्मगर्मी (आठळीयुक्त), गोलसर, वाटाण्याएवढे, गर्द पिंगट अथवा जांभळे व त्यात १-२ बियांच्या आठळ्या असतात. ह्याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ टिलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ स्तंभक (आकुंचन करणारे), शीतक (थंडावा देणारे) व दीपक (भूक वाढविणारे) असते. खोडावरच्या सालीचा फांट [ विशिष्ट प्रकारे तयार केलेला काढा → औषधिकल्प] शामक (शांतता देणारा) मुळाची साल संधिवातावर गुणकारी आणि पाने अंगावर फोड आल्यावर लावण्यास चांगली. लाकूड तांबूस ते पिवळसर पांढरे, बळकट, लवचिक व कठीण असून धनूष्ये, भाल्यांचे दांडे, छपाराच्या पातळ फळ्या इत्यादींकरिता उपयुक्त असते. सालीपासून काढलेल्या धाग्यांचे दोर करतात. फळ स्वादिष्ट व आंबट असून मुखशुद्धीकरिता खातात गुजरातेत त्याचे सरबत करतात व ते उत्तेजक व लोकप्रिय आहे. गुळाच्या उत्पादनात रसातील मळी स्वच्छ करण्यास ह्याच्या खोडाची साल वापरतात. मद्यनिर्मितीत ऊर्ध्वपातनासाठी (द्रवमिश्रण तापवून बनलेले बाष्पमिश्रण थंड करून घटक वेगळे करण्याच्या प्रक्रियेसाठी) व पेये बनविण्यासाठी फळांचा उपयोग करतात, तसेच फळांचे लोणचे घालतात.

फळात सायट्रिक अम्ल २·८ %, शर्करा (सुक्रोज) ११·७ % आणि अल्पसे क जीवनसत्त्व असते. विविध प्रकारची जमीन व हवामान फालसाला चालते. नवीन लागवड कलमे व बिया लावून करतात. पावसाळ्यात ताज्या फळांतील बिया काढून त्या प्रथम उंचवट्यावरील वाफ्यात लावतात आणि एक वर्षानंतर रोपांची शेतात ३-४ मी. अंतरावर लावणी करतात पुढे १३-१५ महिन्यांनी पहिला फळबहार मिळतो. वार्षिक छाटणी आवश्यक असते. रात्री पाने कुरतडणाऱ्या अळ्या याचे नुकसान करतात म्हणून त्यावर लेड आर्सेनेटाचा विद्राव फवारतात. शिवाय पानांवर कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यविरहित वनस्पतींमुळे म्हणजे कवकामुळे, येथे सर्कोंस्पोरा ग्रेवी या कवकामुळे निर्माण झालेले) ठिपके उ. प्रदेशात आढळतात. ह्याला वाळवीचाही उपद्रव होतो शिवाय पोपट व खारी यांपासून फळांचे संरक्षण करावे लागते.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I V, New Delhi, 1956.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.