खटखटी : (क. किरकली लॅ. ग्रेविया पायलोजा कुल-टिलिएसी). या लहान वृक्षाचा प्रसार महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक येथील पानझडी जंगलांत सर्वत्र आहे. पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती, काहीशी दातेरी, दोन्ही बाजूंस केसाळ, तीन मुख्य शिरांची असतात, परंतु खालून भुरकट नसतात. पिवळट फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात ऑगस्ट—ऑक्टोबरात येतात. किंजपुटावर (ज्यात बिजांडे तयार होतात अशा फुलांच्या फुगीर भागावर) तारकाकृती केस असून फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), केसाळ, वाटाण्याएवढे, पिवळसर तपकिरी असते. त्याची साल कठीण, मध्यकवच जाड व धागेदार असते. फळे खाद्य असतात.

गुळगोळप : (क. कौरी, गुरगुरी लॅ. ग्रे. लिव्हिगॅटा ). ही खटखटीच्या वंशातील जाती असून तिचे लहान वृक्ष कारवार व कोकण येथील पानझडी जंगले, पू. हिमालय (खासी टेकड्या), प. व द. भारत, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रह्मदेश इ. प्रदेशांत आढळतात. फांद्या बारीक, पाने साधी, पातळ, एकाआड एक, अरुंद, लांबट, तीन शिरांची, दंतुर असून उपपर्णे लांबट आणि अरुंद असतात. लहान, पिवळी फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या वल्लरीत ऑगस्ट—ऑक्टोबरात येतात. पुष्पस्थली (पुष्पासन) लांबट, फळ अश्मगर्भी, गुळगुळीत व १—४ खंडी. सालीपासून बळकट, भरड व पिवळसर तपकिरी धागे निघतात ते दोऱ्या व इतर घरगुती कामांसाठी उपयोगात आहेत.

पहा : टिलिएसी.

जमदाडे, ज. वि.