पुष्पबंध : (इन्फ्लोरेसन्स). फुले येणाऱ्या अनेक वनस्पती आपल्या पाहण्यात येतात. फुले शोभिवंत आणि कित्येक फारच आकर्षक व शोभिवंत असल्यामुळे वनस्पतीस शोभा येते पण केवळ शोभा देणे हे त्यांचे काम नव्हे. बहुतेक फुलझाडांचे प्रजोत्पादन म्हणजे त्यांची संततिनिर्मिती व त्यांचा प्रसार बीजांच्या द्वारे [→ बीज] होत असतो आणि बीजे तयार होण्यासाठी म्हणजे वनस्पतींचा वंश टिकवून त्यांचा विस्तार करणे यासाठी फुले आवश्यक असतात [→ फूल प्रजोत्पादन वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग]. कित्येक वनस्पतींची फुले एकेकटी व अलग अलग पसरलेली असतात पण इतर कित्येकांची फुले तशी नसून ती एकत्र वाढून त्यांचे समूह झालेले असतात असे समूह असणाऱ्या भागाला ‘पुष्पबंध’ किंवा ‘फुलोरा’ म्हणतात. फुलांच्या भेटीस येणारे कीटक व फुलांवरून वाहणारा वारा एका फुलातील पराग दुसऱ्यात नेण्याचे कार्य [→ परागण] करीत असतात. बीजोत्पादनास याची आवश्यकता असते म्हणून फुले एकेकटी व दूर दूर विखुरलेली असण्याऐवजी एकत्र वाढून त्यांचे समूह झालेले असणे हे परागणाच्या व अप्रत्यक्षतः बीजोत्पादनाच्या प्रक्रियांस अनेक प्रकारे साहाय्यक होते. एकेकट्या विखुरलेल्या लहान फुलांपेक्षा अनेक फुलांचे समूह प्राण्यांचे लक्ष वेधून घेतात व एका फुलातील पराग दुसऱ्यात नेण्याचे (प्राण्यांचे, विशेषतः कीटकांचे) कार्यही समूहातील फुलांत अधिक सुलभ होते. अधिक विकास पावलेल्या म्हणजे अधिक उच्च अशा अनेक वनस्पतींना अनेक लहान फुले एकत्र होऊन तयार झालेले पुष्पबंध विशेषेकरून असतात (उदा. सूर्यफूल, गाजर, संकेश्वर, कुरडू, बाभूळ, शिरीष, वर्षावृक्ष, घाणेरी इ.).

पुष्पबंधांचे (फुलोऱ्यांचे) सामान्य प्रकार : (अ) मंजरी (आ) कणिश (इ) नतकणिश (ई) स्थूलकणिश (उ) कणिशक (उ१) नित्य (उ२) स्पष्ट केलेले : (१) बाह्यतुष, (२) परितुष, (३) अंतस्तुष, (४) केसरदले, (५) किंजमंडल (ऊ) गुलुच्छ (ए) चामरकल्प (ऐ) स्तबक : (ऐ१) क्लोव्हर (ऐ२) रडबेकिया (उभा छेद) : (१) किरण-पुष्पक, (२) बिंब-पुष्पक, (३) छदे (ओ) कुंभासनी (औ) स्थालीकल्प (क) परिमंजरी (ख) एकपद वल्लरी : (ख१) शुंडी (ख२) सर्पगती (वृश्चिकाभ) (ग) द्विपद वल्लरी : (ग१) साधी (ग२) द्विशाख (घ) चषकरूप : (१) छदमंडल, (२) पुं-पुष्पे, (३) स्त्री-पुष्प (च) पुंजवल्लरी.

जगभर ज्यांचा फार मोठा प्रसार झाला आहे अशा ⇨गवते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींनाही नेहमी पुष्पबंधच असतात.


एकापेक्षा अधिक फुले गटाने असलेला फुलझाडाचा भाग, अशी पुष्पबंधाची सामान्य व्याख्या करतात परंतु खरे पाहिले तर पुष्पबंध म्हणजे फुलांची अक्षावरील मांडणी किंवा फुले उमलण्याचा क्रम असा अर्थ दिलेला आढळतो. तसेच काही वनस्पतींच्या फांद्यांच्या टोकांस (उदा. गुलाब, कापूस इ.) किंवा फांदीवरच्या पानाच्या कक्षेत येणारे एकटे फूल (उदा. जास्वंदी, भेंडी, कृष्णकमळ इ.) अथवा जमिनीत खोडापासून वर येणारे एकटे फूल (उदा. कमळ, झेफीर लिली, ट्यूलिप, नार्सिसस इ.) यांनाही कधीकधी फुलोरा (पुष्पबंध) ( अथवा ऱ्हसित पुष्पबंध) म्हटलेले आढळते.

साध्या फांदीवर पाने असतात त्याप्रमाणेच जिच्यावर फुले येतात अशी एक आखूड किंवा लांब फांदी प्रत्येक फुलोऱ्यात असते, तिला प्राथमिक किंवा मुख्य अक्ष (पुष्पबंधाक्ष) म्हणतात याला फाटे फुटून दुय्यम आणि तिय्यम अक्ष असलेले पुष्पबंधही आढळतात. अक्षावर खवल्यासारखी लहान, हिरवी किंवा इतर रंगाची बहुधा सूक्ष्म पानासारखी उपांगे (अवयव) असतात, त्यांना ‘छदे’ म्हणतात. छदांच्या बगलेतून फुले येतात. लहान अक्षाच्या तळाशीही सामान्यतः छदे असून त्यांशिवाय प्रत्येक फुलाजवळ छदे असल्यास, त्यांना ‘छदके’ म्हणतात. रंगीत छदांमुळे आकर्षण वाढते (उदा., बुगनविलिया, पानचेटी इ.). फार मोठी छदे (‘महाछदे’) सर्व फुलोऱ्याचे संरक्षण करतात (उदा., सुरण, अळू, नारळ, केळ, केतकी, ॲरॉइडी इ.). भाजीसाठी वापरला जाणारा ⇨ फुलकोबी (फुलवर) हे पुष्पबंधाचे सामान्य उदाहरण असून तुती, फणस, अननस व अंजीर ही खाद्यफळे संपूर्ण पुष्पबंधापासून बनलेली असतात [→ फळ]. पुष्पबंधाचे अनेक प्रकार असतात. पुष्पबंधाला शाखा व उपशाखा असणे किंवा नसणे, असल्यास त्यांची मांडणी व फुले उमलण्याचा क्रम वा गोष्टींवरून पुष्पबंधांचे अनेक वर्ग केले आहेत, त्यासंबंधीचा तपशील पुढे दिला आहे.

अकुंठित पुष्पबंध : या प्रकारात प्रमुख अक्षाच्या टोकास फूल येत नाही. अक्षाच्या बाजूवर असणाऱ्या छदांच्या बगलेतून प्रत्येकी एक याप्रमाणे फुले येत राहतात त्यामुळे अक्षाची वाढ न खुंटता चालू असते. यामध्ये नवीन, कोवळी फुले अक्षाच्या टोकाजवळ व जून फुले अक्षाच्या तळाकडील भागात असतात आणि फुले उमलण्याचा क्रम ‘अग्रवर्धी’ म्हणजे तळाकडून अग्राकडे असा असतो. अशा पुष्पबंधाकडे वरून पाहिले असता कोवळी फुले मध्यभागी असून जो जो बाहेरील अंगास परिघाकडे जावे तो तो अधिकाधिक जुनी फुले दिसतात म्हणून या प्रकारास ‘अभिमध्य’ असेही म्हणतात. कित्येक पुष्पबंधांत एकच अक्ष असतो व त्याला फाटे फुटत नाहीत, हा झाला साधा प्रकार पण कित्येक प्रकारच्या पुष्पबंधांच्या प्राथमिक म्हणजे मुख्य अक्षाला फाटे फुटून त्याच्या बाजूस दुय्यम, तिय्यम किंवा चतुर्यक इ. प्रकारचे अक्ष वाढलेले असतात. तेही अकुंठित असून त्यांच्यावरील फुलेही तशीच अग्रवर्धी क्रमाने वाढत असतात. अशा पुष्पबंधास ‘संयुक्त’ म्हणतात. साध्या अकुंठित पुष्पबंधाचे पुढील उपप्रकार आढळतात.

मंजरी : (मंजिरी). मुख्य अक्ष लांब व सडसडीत असून त्याच्या बाजूवरील छदांच्या कक्षेतून फुले उगम पावतात. फुलांच्या देठांची लांबी कमीअधिक पण बहुधा सारखी असते (उदा. बाहवा, संकेश्वर, मुळा इ.).

कणिश : मंजरीच्या फुलांना देठ नसले किंवा ते फार आखूड असले म्हणजे त्यांच्या फुलांचे तळभाग अक्षाला चिकटून असतात हा पुष्पबंध अनेकदा लांबट कणसासारखा दिसतो, म्हणून त्याला ‘कणिश’ म्हणतात (उदा. कुरडू, आघाडा, निशिगंध, माठ, अडुळसा इ.). या प्रकारचा पुष्पबंध लोंबता असल्यास त्याला ‘नतकणिश’ म्हणतात (उदा. कॅलिफा, मिरवेल, तुती, बर्च, ओक इ.). माड, पोफळ, सुरण, केळ व अळू यांच्या कणिशांचे अक्ष जाडजूड असतात म्हणून त्यांना ‘स्थूलकणिश’ व त्यांच्यावर असलेल्या मोठ्या संरक्षक छदाला ‘महाछद’ म्हणतात. काही जातींत पुष्पबंधाच्या अक्षावर एकलिंगी व वंध्य-पुष्पे असतात. सामान्यतः फूल हे पुष्पबंधाचे एकक असते, पण गवतांचे पुष्पबंध वेगळ्या प्रकारचे असतात. एक किंवा दोन लहान परिदलहीन व बिनदेठांच्या लहान फुलांचे (पुष्पकांचे) छोटेसे पुष्पबंध म्हणजे ‘कणिशके’ ही त्यांची एकके असतात पुष्पबंध अनेक फांद्यांचा असतो व त्यांच्यावर कणिशके चिकटलेली असतात. प्रत्येक कणिशकातील पुष्पकांचे संरक्षण तुसांनी (छदांनी) केले जाते (उदा., बाह्यतुषे, परितुषे, अंतस्तुषे इ.). [→ मका गहू ग्रॅमिनी].

गुलुच्छ : हा मंजरीचा प्रकार असून याच्या खालच्या फुलांचे देठ लांब व वरच्यांचे उत्तरोत्तर आखूड असल्यामुळे सर्व फुले साधारणपणे एकाच पातळीत राहतात व एकूण पुष्पबंध लहानशा तुऱ्यासारखा दिसतो (उदा. मोहरी, कासूद, कँडिटफ्ट).

चामरकल्प : हा पुष्पबंध चवरीसारखा किंवा झुबक्यासारखा दिसतो त्याचा मुख्य अक्ष खुजा असतो व त्याच्या टोकाजवळ, छदांच्या बगलेत अनेक फुले दाटीने येतात परंतु फुलांचा उमलण्याचा क्रम अभिमध्य असल्यामुळे हा अकुंठित प्रकारच होय फुले एकाच पातळीत येतात (उदा., कांदा, दुधवेल, ब्राह्मी, गाजर, रुई, कोथिंबीर). सर्व छदांचे बनलेले एक ‘छदमंडल’ अक्षाच्या टोकास बहुधा असते.

स्तबक : हा पुष्पबंध एकाच फुलासारखा दिसतो त्याच्या प्रमुख अक्षाच्या टोकाचा भाग चपटा, फुगीर किंवा उथळ खाचेसारखा, तर क्वचित लांबट (चितीय) असतो. त्याला ‘पुष्पासन’ म्हणतात. त्यावर असंख्य, बिनदेठाची, सूक्ष्म व छदयुक्त फुले (पुष्पके) दाटीने येतात केंद्राजवळ अधिक कोवळी पुष्पके व तेथून परिघाकडे दूर जावे तसतशी जून पुष्पके अधिक आढळतात. ही सर्व पुष्पके एकाच प्रकारची असू शकतात [→ ओसाडी, सहदेवी] पण कॉसमॉस, सूर्यफूल, शेवंती, झिनिया इत्यादींत स्तबकाच्या कडेने पाकळ्यांसारखी दिसणारी ‘किरण पुष्पके’ व त्याच्या आतील भागावर (बिंबावर) स्तबकाचा मोठा भाग व्यापणारी ‘बिंबपुष्पके’ अशी दोन प्रकारची असतात. बिंबपुष्पके किरणपुष्पकांहून बहुधा भिन्न रंगाची व आकाराची असतात. किरणपुष्पकाच्या बाहेरील भागावर खवल्यासारख्या किंवा पानासारख्या हिरव्या छदांचा एखादा वेढा किंवा अनेक वेढे असतात, त्यांना ‘छदमंडल’ म्हणतात. कधी किरणपुष्पके वंध्य व फक्त बिंबपुष्पके जननक्षम असतात, तर कधी सर्वच जननक्षम असतात. बिंबपुष्पकांचा उमलण्याचा क्रम अभिमध्य असतो. या प्रकारच्या पुष्पबंधात अनेक सूक्ष्म फुले एकत्र आल्याने कीटकाच्या एका भेटीत अनेकांचे परागण साधते, तसेच एका मोठ्या फुलाला जेवढे द्रव्य खर्च होते तितक्याच द्रव्यात अनेक फुलांचे परागण साधते व त्यामुळे अनेक बियांचे उत्पादन होते [→ कंपॉझिटी]. या काटकसरीच्या योजनेमुळे हा पुष्पबंध वैशिष्ट्यपूर्ण व प्रगत ठरला आहे.

अकुंठित पुष्पबंधाचे आणखी काही विशेष प्रकारही आढळतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर यांमध्ये पुष्पासन चंबूसारखे किंवा लहान गोटीप्रमाणे असून त्याच्या आतील बाजूस असलेल्या पोकळीभोवती सूक्ष्म एकलिंगी फुले येतात व त्यांचे परागण कीटकांमार्फत, पण टोकाशी असलेल्या एका छिद्राद्वारे होते [→ मोरेसी अंजीर]. या पुष्पबंधास ‘कुंभासनी’ म्हणतात. या उलट ⇨ डॉर्स्टेनियात पुष्पासन लहान थाळीप्रमाणे असून त्यात फुले अंशतः रुतलेली असतात, म्हणून हा ‘स्थालीकल्प’ पुष्पबंध होय. वर उल्लेखिलेल्या साध्या प्रकारांच्या मूळ साच्यांची पुनरावृत्ती होऊन संयुक्त पुष्पबंध बनतात. उदा. कोथिंबिरीचा संयुक्त चामरकल्प गव्हाचे संयुक्त कणिश कँडिटफ्टचा संयुक्त गुलुच्छ आंबा व निंब यांची संयुक्त मंजरी असून तिला ‘परिमंजरी’ असेही म्हणतात. अनेकदा परिमंजरीतील प्राथमिक अक्षावर अनियमितपणे काही दुय्यम अक्ष आणि काही तिय्यम अक्ष मंजरीप्रमाणे असतात. [→ मका ग्रॅमिनी].


कुंठित पुष्पबंध: या पुष्पबंधाच्या प्रकारात मुख्य अक्षाच्या टोकाशी फूल येते व त्यामुळे त्या अक्षाची वाढ खुंटते, म्हणून त्याला कुंठित पुष्पबंध म्हणतात. मुख्य अक्षाच्या टोकास फूल आल्यानंतर त्याच्या बाजूस छदांच्या बगलेत लहान अक्षासारख्या फांद्या येऊन त्यांच्या टोकांशी फुले येतात व त्यांचीही वाढ थांबते. मुख्य अक्षावरील फुले आधी व त्याच्या बाजूच्या फांद्यांवरील फुले नंतर उमलतात म्हणजे फुले उमलण्याचा क्रम तलवर्धी किंवा अपमध्य (टोकाकडून तळाकडे) असतो अशा पुष्पबंधाकडे वरून पाहिले असता मध्यभागी जून फुले व मध्यभागापासून दूर जाताना अधिकाधिक कोवळी फुले असा क्रम आढळतो. कुंठित पुष्पबंधाचे मुख्य उपप्रकार पुढे दिले आहेत. यांमध्ये सर्वांत साधा प्रकार म्हणजे वनस्पतीच्या मुख्य अक्षावरचे एकच अग्रस्थ फूल (उदा., कापूस).

एकपद वल्लरी : मुख्य अक्षाच्या टोकाशी फूल आल्यावर त्याच्या एकाच बाजूस छदाच्या बगलेत फांदी फुटते व तिच्या टोकाशी फूल आल्यावर तिलाही त्याच बाजूस किंवा विरुद्ध बाजूस एक फांदी व तिच्यावर फूल येते आणि असाच प्रकार पुनःपुन्हा घडून येऊन काहीसा वक्र पुष्पबंध बनतो. यामध्ये ‘शुंडी’ व ‘सर्पगती किंवा वृश्चिकाभ’ असे दोन उपप्रकार आढळतात. (अ) नवीन फांद्या (अगर फुले) मूळ अक्षाच्या एका बाजूस पण पुनःपुन्हा त्याच दिशेस आल्यास नंतर तो पुष्पबंध सोंडेप्रमाणे दिसतो म्हणून त्यास शुंडी म्हणतात (उदा. गेळा, हॅमेलिया) (आ) नवीन फांद्या मूळ अक्षाच्या एका बाजूस पण दर वेळी विरूद्ध दिशेस (आणि भिन्न पातळीत) आल्याने काहीशी नागमोडी मांडणी होते म्हणून त्यास सर्पगती किंवा वृश्चिकाभ म्हणतात (उदा., ड्रॉसेरा, कॉमेलिनेसी, हेलिओट्रोपियम इ.) हा पुष्पबंध सरळ मंजरीसारखा दिसला, तरी छदांच्या संमुख स्थानांवरून ओळखता येतो. (अ) आणि (आ) यांमधील भेदाबद्दल मतैक्य आढळत नाही. दोन्ही प्रकारांना ‘वलयित’ असेही म्हणतात.

द्विपद वल्लरी : मुख्य अक्षावर एकच फूल आल्यावर त्याच्या दोन्ही बाजूंस छदांच्या बगलेत एकेक फूल येते, यास ‘साधी वल्लरी’ (उदा. मोगरा) म्हणतात बाजूच्या फुलांऐवजी एकेक अक्ष व त्यावर पुन्हा टोकास एक फूल व बाजूस पूर्वीप्रमाणे पुन्हा एकेक फूल किंवा अक्ष अशी मांडणी असल्यास (उदा., सायली, वनजाई, चमेली इ.) त्याला ‘द्विशाख वल्लरी’ म्हणतात.

अनेकपद वल्लरी : मुख्य अक्षाच्या टोकास फूल आल्यानंतर त्याच्या बाजूवरील छदांच्या बगलेतून त्याच पेऱ्यावर अनेक दुय्यम व तिय्यम अक्ष येऊन प्रत्येकाची स्वतंत्र वल्लरी बनते किंवा त्यांवर एकच फूल येते (उदा., राईकुडा) व हा पुष्पबंध चामरकल्पासारखा भासतो. यास कोणी ‘अकुंठित वल्लरी’ किंवा ‘वल्लरीय चामरकल्प’ म्हणतात.

संमिश्र पुष्पबंध : काही वनस्पतींवर येणाऱ्या पुष्पबंधात वर वर्णन केलेल्या कुंठित व अकुंठित रचनांचे मिश्रण असलेले आढळते. एकूण पुष्पबंध अकुंठित (किंवा कुंठित) पण त्याच्या अक्षावरचे लहान पुष्पबंध कुंठित (किंवा अकुंठित) म्हणजे उलट प्रकारचे असा प्रकार असणे शक्य असते [→ ओसाडी ॲस्टर इ.] ⇨ पानचेटीचा [यूफोर्बिया वंश → यूफोर्बिएसी] पेल्यासारखा (चषकरूप) पुष्पबंध आणि ⇨ तुळस व सब्जा यांच्या ‘पुंजवल्लरी’ संमिश्र पुष्पबंध होत. पुंजवल्लरीमध्ये एका अकुंठित अक्षाच्या प्रत्येक पेऱ्यावरच्या दोन्ही बाजूंस द्विपद वल्लऱ्यांच्या जोड्या गर्दीने उगवलेल्या व अक्षाला वेढून असतात. फुलांना देठ नसतात.

पाइन, फर, देवदार [→ कॉनिफेरेलीझ] यांसारख्या वनस्पतींचे त्रिकोणाकृती किंवा भोवऱ्याच्या आकाराचे असे जे बीजोत्पादक इंद्रिय असते, त्याला ‘शंकू’ म्हणतात. काहींच्या मते शंकू हा फुलाचा एक प्रकार आहे इतर काही शंकूला पुष्पबंध मानतात. [→ पाइन].

पुष्पबंधाच्या दोन मुख्य प्रकारांची तुलना करून पाहिली, तर असे दिसून येते की, अकुंठित पुष्पबंधांची विशेषतः स्तबक, चामर, गुलुच्छ इत्यादींची सर्व फुले जवळजवळ एकाच वेळी उमलत असतात. त्यांच्या उमलण्याचा एकूण अवधी सापेक्षतः अल्प असतो त्या अल्प कालावधीत बीजनिर्मितीस अनुकूल अशी परिस्थिती असेलच असे नाही व ती प्रतिकूल असणेही शक्य असते. शिवाय काही आकस्मिक कारणाने कोवळ्या मंजरीचे टोक मोडून गेले, तर नवीन फुले निर्माण होण्याची क्रिया अल्पकाळ तरी थांबते. उलट कुंठित पुष्पबंधात प्राथमिक अक्षाच्या टोकास फूल येऊन अक्षाची वाढ खुंटल्यावर त्याच्या बाजूवर फांद्या फुटून त्यांना फुले येणे या प्रक्रिया घडून येण्यास सापेक्षतः अधिक काळ लागतो. प्राथमिक अक्षाच्या फुलाच्या मानाने मागाहून निर्माण झालेल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या इ. प्रतींच्या अक्षावरील फुले सापेक्षतः बरीच नवी असतात व ती बाहेरच्या अधिक उघड्या भागात असतात. त्यांचा उगम आणि वाढ चालू असताना अधिक जुन्या व सापेक्षतः अधिक सुरक्षित भागातील फुलांची वाढ पूर्ण होऊन त्यांच्यापासून झालेली फळेही पिकू लागतात. आणखी असे की, काही आकस्मिक कारणाने कुंठित पुष्पबंधाचे टोक तुटले, तर एखादे फूल नाहीसे होते पण बाजूच्या अक्षांची वाढ स्वाभाविक रीत्या चालू राहत असते शिवाय एकूण पुष्पबंधांचा विकासाचा अवधी सापेक्षतः अधिक असल्यामुळे हवामानाच्या फेरबदलात एकूण पुष्पबंधांपैकी काही फुलांना अनुकूल परिस्थिती प्राप्त होण्याचा किंवा प्रतिकूल परिस्थिती टळण्याचा संभव असतो हे फायदे लक्षात घेतले, तर कुंठित पुष्पबंध अधिक प्रगत होत असे म्हणता येईल आणि ते अकुंठित पुष्पबंधांचा विकास होऊन उद्‌भवले, अशी एक कल्पना प्रचलित आहे परंतु यांसंबंधी मतभेद आहेत. एका कुंठित प्रकारापासून अकुंठित प्रकार उद्‌भवले असावेत, असे कित्येक वैज्ञानिकांचे मत आहे व त्याला पुरावाही देण्यात आला आहे.

उगम, विकास इत्यादी : प्रारंभी कार्ल लिनीअस (१७५१) यांनी फुलांच्या उमलण्याच्या रीतीला पुष्पबंध म्हटले होते त्यांच्या संकल्पनेत ते एक कार्य किंवा घटना होती. त्यांनी प्रचारात आणलेल्या काही पारिभाषिक संज्ञा आज वर्गीकरणात वापरात आहेत, तथापि एच्. लिंक (१८०७) व त्यानंतर जे. रोएपर (१८२६) यांच्या सापेक्षतः अशास्त्रीय निरीक्षणांवर ते वर्गीकरण आधारलेले आढळते. ⇨ वर्गीकरणविज्ञानात  आवश्यक अशा निकषांच्या दृष्टीने उपयुक्त असे त्याचे प्रकार व उपप्रकार ओळखता यावेत, असे पुष्पबंध हे वनस्पतीच्या शरीराचे ‘संरचनात्मक एकक’ असल्याचे ह्या दोघांनी मान्य केले होते लिनीअस यांच्या संकल्पनेत हे अभिप्रेत नव्हते. फुलझाडांच्या वर्णनात रोएपर यांनी प्रथम सुचविलेले पुष्पबंधाचे आधारभूत कुंठित व अकुंठित प्रकार आणि उपप्रकार थोडाफार बदल करून आज वापरले जातात. एच्. डब्ल्यू. रिकेट (१९४४) यांनी पुष्पबंध हे शाखा तंत्राचे प्रकार असून त्यांचा उगम एका मूलभूत प्रकारातून झाला असावा हे दर्शविण्याइतके त्यांचे परस्परांतील नाते आहे, असा अभिप्राय व्यक्त केला आहे. प्रारंभिक पुष्पबंध किंवा त्याचा पूर्वज अनेक शाखांचा बनलेला असून त्या प्रत्येक शाखेच्या शेंड्यावर फूल होते, ही गोष्ट सामान्यपणे आता बहुतेकांनी मान्य केली आहे. हे शेंडेफूल त्या शाखातंत्राचे एकक असून ते धारण करणाऱ्या टोकास पुष्पस्थली, पुष्पासन, देठ किंवा पुष्पबंधाचा दांडा (पुष्पबंधाक्ष) असे म्हणतात व ती संरचना एका फुलाचा अक्ष असते. फुलझाडांच्या वर्गीकरणात पुष्पबंधांचा उपयोग होण्यास कोणता प्रकार प्रारंभिक व इतर प्रकार त्यापासून कोणत्या अवस्थेतून आले आहेत, हे समजणे आवश्यक आहे. अद्यापि फुलझाडांच्या भिन्न कुलांचे पारंपरिक संबंध पूर्णपणे कळून आलेले नाहीत त्यांसंबंधी फक्त अंदाज केले गेले आहेत तथापि पुष्पबंधाच्या उगमासंबंधीची उपलब्ध माहिती उपयोगात आणून ही समस्या सोडविणे शक्य होईल असा विश्वास वाटतो. पुष्पबंधाची प्रारंभिक अवस्था व त्या पूर्वजांपासून विद्यमान प्रकार कसे उद्‌भवलेले असावेत यांसंबंधी पुढील तीन सिद्धांत मांडले गेले आहेत: (१) हा पूर्वज परिमंजरीसारखा असावा (२) पूर्वज एक अग्रस्थ पुष्प (शेंडेफूल)असावे (३) पूर्वज द्विशाख वल्लरी असावी. सी. डब्ल्यू. फोन नेअगेली (१८८३), एल्. एफ्. चेलाकॉव्हस्की (१८९२), आर्. पिल्जर (१९२२) आणि के. आय्. ई. फोन गोबेल (१९३१) हे पहिल्या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. दुसऱ्यासिद्धांताचे समर्थन करताना जे. पार्किन (१९१४) यांनी पुढील स्पष्टीकरण दिले आहे: एकपुष्पी पुष्पबंधापासून अनेकपुष्पी पुष्पबंधांचा विकास होत असताना पानांच्या किंवा छदांच्या बगलेतील वाढीमुळे मुख्य अक्षाच्या बाजूच्या (पार्श्विक) फुलांची आणि ती धारण करणाऱ्याअक्षांची भर पडली असावी. ही विचारसरणी मान्य करण्यापूर्वी एक सर्वमान्य दृष्टिकोन विचारात घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शारीरिक संघटनेत शाखा तंत्र (संस्था) हा मौलिक भाग असतो फूल हे अतिरूपांतरित शाखा तंत्राचे बनलेले आहे. पाने किंवा तत्सम अवयव ही अतिरूपांतरित शाखा तंत्रे आहेत ही गोष्ट मान्य केल्यास प्रारंभिक पुष्पबंध हेही एक शाखा तंत्र असून विद्यमान एकाकी फुले ही ऱ्हास व दमन यांमुळे बनलेल्या संरचनेची उत्तम उदाहरणे आहेत, ह्या सिद्धांताला बळकटी येते. पार्किन यांचा सिद्धांत स्वीकारण्यात यामुळे अडचण येते.

तिसरा सिद्धांत (द्विशाख वल्लरीचा) रिकेट (१९४४) यांनी मान्य केला असून त्याचे समर्थनही केले आहे. द्विशाख वल्लरीचा सर्वांत सोपा प्रकार म्हणजे एका अक्षावरची तीन फुले (उदा., मोगरा), एका अक्षाला शेंडेफूल आल्यावर त्याखाली अक्ष विभागून त्याचे दोन उपाक्ष होतात व प्रत्येकाला शेंडेफूल येते (साधी वल्लरी). यापुढील विकास याच पद्धतीने बाजूचे अक्ष वाढून होणे शक्य आहे. निसर्गात हा पुष्पबंध साधा किंवा संयुक्त असू शकेल तसेच तो विपुल किंवा मर्यादित असेल त्यांपैकी आधी कोणता व नंतरचा कोणता पूर्वजस्थानी असेल याचा अंदाज करणे कठीण आहे. परिमंजरीपेक्षा द्विशाख वल्लरी आधीची असावी हे सिद्ध करण्यास जीवाश्मांचा (शिळारूप अवशेषांचा) आधार नाही त्याउलटहीप्रकार असेल, हे सिद्ध करणे कठीण आहे. कोणत्याही एका प्रकारापासून दुसरा अवतरला असणे शक्य आहे. यात काही तुरळक उदाहरणांवरून एकपुष्पी पूर्वज आधीचा मानण्यास जीवाश्मांचा पुरावा आहे. प्रकटबीज वनस्पतींपैकी ⇨ बेनेटाइटेलीझ गणात खोडावर द्विलिंगी फुले असून त्यामध्ये खाली लघुबीजुकपर्णे व त्यावरच्या पातळीत गुरुबीजुकपर्णे होती. हा गण फुलझाडांपूर्वीचा आहे. आर्. फ्लोरीन (१९४८) यांनी परिमंजरीसारखा पुष्पबंध काही प्रारंभिक विलुप्त (निर्वंश) शंकुमंतांत [→ कॉनिफेरेलीझ] आढळल्याचे दर्शविले आहे. मात्र त्यावरून आवृत्तबीज वनस्पती प्रकटबीजींपासून अवतरल्या असाव्यात, असा निष्कर्ष काढता येत नाही.⇨बीजी नेचे ह्या गटात नेचांसारख्या पानांवर विखरून वाढलेली बीजके (बीजाच्या पूर्वावस्था) असतात व हा प्ररोह परिमंजरीशी साम्य दर्शवितो तसेच इतर लक्षणे विचारात घेता, फुलझाडांचा पूर्वज बीजी नेचांसारखा असावा, असे कित्येक शास्त्रज्ञ मानतात.

 


परिमंजरी किंवा द्विशाख वल्लरी यांपैकी सापेक्षतः प्रारंभिक कोण हे विवाद्य असले, तरी पुष्पबंधाच्या क्रमविकासाबद्दलचे (उत्क्रांन्तीबद्दलचे) रिकेट यांचे पुढील विचार उपयुक्त आहेत. थोडा संरचनेत बदल होऊन (रुपांतर होऊन) द्विशाख वल्लरी पुष्पबंधापासून द्विपद व एकपद वल्लऱ्या, शुंडी, सर्पगती, पुंजवल्लरी इ. प्रकार आणि काही अक्षांची लांबी कमी होऊन (कांड्यांचा लोप होऊन) चामरकल्पे, गुलुच्छ व स्तबक हे प्रकार बनणे रिकेट यांच्या मते शक्य आहे. तसेच काही जटिल प्रकार द्विशाख वल्लऱ्यांची विविध मिश्रणे आणि संकलन यांमुळे बनले असणे शक्य आहे. या दृष्टीने विचार केल्यास साधी मंजरी व कणिश हे जटिल परिमंजरी किंवा द्विशाख वल्लरीपासून ऱ्हास झालेले प्रकार असून त्यांचा उगम क्रमविकासाच्या एका किंवा अनेक मार्गांद्वारे होत आला असावा. मंजरी किंवा कणिश पुष्पबंध यांच्या क्रमविकासात द्विशाख वल्लरीचे रूपांतर एकपुष्पी फुलोऱ्यात व त्याचबरोबर पानांचे  रूपांतर तळाजवळच्या छदांत झाले असावे. हल्ली तर असे मानले जाते की, अकुंठित व कुंठित हा तथाकथित प्रकार प्रमाण नसून तो पुढे येणाऱ्यापुष्पबंधांच्या वर्गीकरणात नाममात्र राहील. उदा., चामरकल्प पुष्पबंधात दोन्ही प्रकार आढळतात कोथिंबीर, गाजर बडीशेप यांमध्ये मागे वर्णन केल्याप्रमाणे चामरकल्प अकुंठित प्रकारचा आहे, कारण केंद्रवर्ती फुले शेवटची आहेत परंतु कांद्याच्या तत्सम पुष्पबंधात पहिली फुले केंद्रात असून नंतरची केंद्रापासून दूर आहेत (कुंठित) तसेच पेलार्‌गॉनियमामध्ये चामरकल्प पुष्पबंध एकपद वल्लरीपासून उत्क्रांत झाला असावा, असे मानल्यास चूक ठरणार नाही द्विपाद वल्लरीपासून एकपद वल्लरी व त्यानंतर ऱ्हसनामुळे (ऱ्हास झाल्याने) चामरकल्प उद्‌भवली असावीत. येथे चामरकल्प पुष्पबंधांचा उगम भिन्न मार्गांनी झाला असल्याने त्यांचा आप्तसंबंध मानला जात नाही.

 

अशा प्रकारच्या उपपत्तींच्या चर्चेतून असा निष्कर्ष काढला जातो की, परिमंजरी किंवा द्विशाख वल्लरी (क्वचित एकच फूल) हा प्रारंभिक पुष्पबंध असून इतर प्रकार त्यांपासून क्रमाने विकास पावले असावेत. प्रचलित मंजरी कणिशापेक्षा अधिक प्रारंभिक आणि दोन्ही प्रकार परिमंजरीपेक्षा अधिक प्रगत असावेत परिमंजरी हा प्रारंभिक पुष्पबंध मान्य करून काही विद्यमान परिमंजरींचे प्रकार प्रारंभिक जटिल परिमंजरीपासून (मिश्र परिमंजरीपासून) विकास पावले असावेत इतकेच नव्हे, तर विविध प्रकारचे कुंठित पुष्पबंध वर उल्लेख केलेल्या पुष्पबंधांपेक्षा कदाचित अधिक प्रारंभिक असावेत. त्याचप्रमाणे प्रचलित सामान्यपणे आढळणारा एकपुष्पी पुष्पबंध ऱ्हसनाने निर्माण झाला असावा व त्याचा पूर्वज अनेक बहुपुष्पींपैकी एक असून संबंधित गटांमधील विविध पुष्पबंधांशी तुलना करूनच त्याचा उगम मिळू शकेल.

वर्गीकरणविज्ञानातील पुष्पबंधाचे महत्त्व आता पूर्णपणे ओळखले गेले असून काही कुलांत [उदा., अंबेलीफेरी (चामर कुल), कंपॉझिटी (सूर्यफूल कुल), लॅबिएटी (तुलसी कुल), ग्रॅमिनी (तृण कुल), क्रॅसुलेसी (घायमारी कुल) इ.] व वंशांत (उदा. स्मायलॅक्स, मॅलस, यूफोर्बिय इ.) विशिष्ट प्रकारचा पुष्पबंध ते कुल किंवा वंश याचे निश्चित लक्षण असल्याचे आढळले आहे.

 

पुष्पबंध परपरागणास साहाय्यभूत होतो हे वादातीत आहे व त्यामुळे वनस्पतींच्या क्रमविकासातही प्रगतीस वाव मिळाला आहे, असे मानतात.

 

पहा: परागण प्रजोत्पादन फूल वनस्पती, आवृत्तबीज उपविभाग वनस्पती, प्रकटबीज उपविभाग.

 

संदर्भ:1. Lawrence, G. H. M.Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

             2.    Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

            3. Parkin, J. The Evolution of the Inflorescence, Journal of Linnaean Society, Vol. 42,  1914.

            4. Rickett, H. W.The Classification of  Inflorescence, Botanical  Review, Vol.10. 1944.

परांडेकर, शं. आ.