लिबी डिबी : (१) पाने, फुलोरे व फळे (शिंबा) यांसह, (२) शिंबा.लिबी डिबी : (इ. दिवी दिवी क. विलायती यळ्‍देकाई लॅ. सीसॅल्पिनिया कॉरियारिया कुल-लेग्युमिनोजी उपकुल- सीसॅल्पिनिऑइडी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨संकेश्वर, ⇨पतंग व ⇨सागरगोटा इत्यादींच्या सीसॅल्पिनिया प्रजातीतील व त्यांच्याशी काही लक्षणांत साम्य दर्शविणारा एक वृक्ष. ह्या प्रजातीत एकूण सु. १०० जाती असून त्यांपैकी भारतात ९ जाती आढळतात काहींची अलीकडे आयात झाली आहे. बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारा), शिंबावंत (शेंगासारखी फळे येणारा) बिनकाटेरी व पसरट फांद्यांचा हा वृक्ष मूळचा द. अमेरिकेतून व वेस्ट इंडीजमधून आलेला असून आता पाकिस्तानात व भारतात  

 

अनेक ठिकाणी स्थायिक झाला आहे. उद्यानांतून शोभेकरिता याची लागवड केलेली आढळते. भारतात याला आणून लावल्यास शंभरावर वर्ष झाल्याची नोंद आढळते. तमिळनाडूत याची यशस्वी लागवड झाली आहे. याची पाने एकाआड एक, संयुक्त, पिसासारखी दोनदा विभागलेली व सु. २३ सेंमी. लांब असून दलांच्या ७-८ जोड्या असतात प्रत्येक दल सु. १५ सेंमी. लांब असून त्यावर असंख्य (सु. ५०-६०), लहान, अरुंद दलके असतात. फिकट पिवळी, सुवासिक व लहान फुले ऑक्टोबरात दाट परिमंजऱ्यांवर [शाखायुक्त फुलोऱ्यावर → पुष्पबंध] येतात. फळे (शिंबी) शुष्क, जाड, गर्द पिंगट व काहीशी पिळवटलेली किंवा दुमडल्याप्रमाणे आणि ५ – ७.५ x  १.८० सेंमी. असतात. फुलाची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलातील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलात (शिंबावंत कुलातील संकेश्वर उपकुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

लिबी डीबीच्या शिंबांत (शेंगांत) टॅनीन द्रव्य विपुल (४०-४५%) असून ते अधिक सुलभ रीत्या मिळू शकते. त्या स्तभक (आकुंचन करणाऱ्याच) व कातडी कमाविण्यास हिरड्याप्रमाणे फार उपयुक्त असून हे टॅनीन कापडांचे रंग पक्के करण्यास वापरतात. ‘कोरियम’ ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ कातडे असा असल्याने त्यावरून कॉरियारिया हे याचे जातिवाचक नाव पडले आहे. या वृक्षाचे लाकूड लालसर पिंगट व कठीण असून त्यापासून लाल रंग मिळतो. शिंबांची पूड व खोडाची साल स्तंभक व पौष्टिक असून पाळीच्या तापावर देतात आणि शिंबांचा काढा मूळव्याधीवर देतात.

झाडांची लागवड बिया लावून करतात. बिया प्रथम पन्हेरीतील वाफ्यात रुजवून रोपे तयार करतात. ती सु. ९-१५ महिन्यांची झाली म्हणजे पावसाळ्यात शेताच्या कडेने सु. ६-७.५ मी. अंतरावर लावतात. एकदोन वर्षे कोरड्या ऋतूत त्यांना पाणी द्यावे लागते. काळी जमीन चांगली परंतु रेताड जमीनही चालते. सु. ५ वर्षांनी फुले येऊ लागतात तथापि २० वर्षांनंतर पूर्ण बहर येतो. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये व नंतर जून- जुलैमध्ये अशी वर्षातून दोनदा फुले येतात. खाली पडलेल्या शिंबा वेचून सुकवितात व नंतर साठवितात. पूर्ण वाढ झालेल्या एका वृक्षापासून दरवर्षी सु. १५० किग्रॅ. शिंबा मिळतात. कोलंबिया, व्हॅनेझुएला, जमेका व भारत येथून लिबी डिबीचा इतर देशांना पुरवठा होतो. द. भारतातील टॅनीनयुक्त वस्तूंत लिबी डिबी सर्वांत स्वस्त आहे.

संदर्भ : C. S. I. R.,The wealth of India, Raw Materials, Vol.II, New Delhi, 1950.

परांडेकर, शं. आ.