पेंडगूळ : (पेंडकूल; पनकूल, बकोरा; हिं. रुक्मिणी, रजना; क. गुडेद साल, किसुकरे; सं. बंधुक, रक्तक; इं. फ्लेम ऑफ द वुड्स; लॅ. इक्सोरा कॉक्सिनीया; कुल-रुबिएसी). फुलझाडांपैकी ह्या वनस्पतीच्या इक्सोरा  वंशात एकूण सु. ४०० जाती असून त्यांपैकी सु. ३० जाती भारतात आढळतात. पेंडगूळ हे सु. एक मी. उंचीचे झुडूप मूळचे ईस्ट इंडीजमधले असून श्रीलंकेत व भारतात जंगली अवस्थेत आढळते; येथे त्याचा प्रसार मुख्यतः प. किनारपट्टीवर असून शिवाय बागेत शोभेकरिता लावतात. पाने साधी, समोरासमोर, फिकट, खरबरीत, बिनदेठाची, चिवट, लांबट, टोकदार, दीर्घवृताकृती किंवा अंडाकृती, ५—१० सेंमी. लांब असतात; उपपर्णे अंतरावृतीय (दोन देठांमध्ये), लांब, ताठर व टोकदार; फुले फांद्यांच्या टोकाकडे दाट चवरीसारख्या फुलोऱ्यावर [वल्लरीय चामरकल्पावर; → पुष्पबंध] वर्षभर येतात, तथापि पावसाळ्यात अधिक; ती गर्द शेंदरी, क्वचित पिवळट असतात. मृदुफळ गोलसर बारीक, वाटाण्याएवढे, किरमिजी व खाद्य असून बी खोलगट असते. इतर सामान्य लक्षणे ⇨रुबिएसी  कुलात (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बियांपासून करतात, बागेत ही वनस्पती कुंपणाकडेने लावतात.

पेंडगुळाचे लाकूड कठीण व टिकाऊ असून हत्यारांच्या दांड्यांस उपयुक्त असते. मुळांचा औषधी उपयोग उचकी, ज्वर, परमा, अग्निमांद्य (भूक मंदावणे), आमांश, अतिसार इ. विकारांत करतात. जठररस व पित्त स्रवण्यास चालना देण्याकरिता व ओटीपोटातील वेदना कमी होण्यास मुळे उपयुक्त असतात. मुळे शामक (शांत करणारी), स्तंभक (आकुंचन करणारी) व पूतिरोधक (जखम चिघळू न देणारी) असल्याने जखमांवर आणि डोकेदुखीवर लावतात. खोकला, आमांश, पांढरी धुपणी, शूलार्तव (मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना) इत्यादींवर फुले उपयुक्त असतात. साल किंवा फुले यांचा काढा नेत्रविकारांवर व जखमा धुण्यास वापरतात. पाने अतिसारावर उपयुक्त असून आमांशात फुले तुपावर भाजून ती जिरे आणि नागकेसराबरोबर चुरतात आणि खडीसाखर व लोणी यांच्याबरोबर देतात. मुळात जहाल वासाचे तेल, टॅनीन, वसाम्ले इ. असतात. (चित्रपत्र ५८).

राईकुडा : (माकडी; सं. नेवाली; इं. टॉर्चवुड ट्री; लॅ. इक्सोरा पर्व्हिफ्लोरा, इक्सोरा आर्बोरिया). पेंडगुळाच्या वंशातील ही दुसरी जाती एक लहान सदापर्णी वृक्ष असून तो भारतात सर्वत्र आढळतो. शिवाय बागेत शोभेकरिता लावतात याची साल जाड व लालसर तपकिरी रंगाची असते. लहान फांद्या थोड्या चपट्या व गुळगुळीत असून पाने पेंडगुळापेक्षा मोठी असतात. जानेवारी-एप्रिलमध्ये अनेक लहान पांढऱ्या व सुवासिक फुलांचे झुबके (गुलुच्छ वल्लरी) फांद्यांच्या टोकास येतात. मृदुफळ काळे, गोल, काहीसे द्विभक्त व वाटाण्याएवढे असते बी एका बाजूस सपाट व दुसरीकडे गोलसर असते. फुले दुधात कुस्करून माकड (डांग्या) खोकल्यावर देतात. साल उकळून रक्तन्यूनता (पांडुरोग, रक्तक्षय) व दुर्बलता यांवर देतात. संथाळ लोक मूत्ररोगावर (लघवी पिवळी किंवा लालसर झाल्यास) फळे व मुळे उपयोगात आणतात; हे लोक फळे खातात व पाने गुरांना चारतात. याचे लाकूड कठीण, जड व पिंगट असते; घासून व रंधून ते गुळगुळीत होते; कातीव व कोरीव कामास चांगले असते. किरकोळ सजावटी सामानास वापरतात. ते जळणास व चुड्यांस (मशालीसाठी) वापरतात.

राईकुडा : (१) फुलोऱ्यांसह फांदी, (२) कळी, (३) फूल, (४) पाकळ्या व केसरदले, (५) केसरदल, (६) संवर्त व किंजमंडल (उभा छेद), (७) फळे असलेली फांदी.

काटकुरा : (लोखंडी; लॅ. इक्सोरा नायग्रिकॅन्स). इक्सोरा वंशातील ही तिसरी जाती पश्चिम घाट, कोकण व द. भारत आणि आसामातील टेकड्या येथे सामान्यपणे आढळते. हे सदापर्णी झुडूप किंवा लहान वृक्षासारखे असते ते शोभिवंत दिसते. फांद्या, पाने व फुलोरे सुकल्यावर काळे पडतात. पाने लंबगोल—आयत अगर भाल्यासारखी व पातळ असून फुले पांढरी व सुवासिक असतात पानांचा उपयोग आमांशावर करतात.

पहा : रुबिएसी.

हर्डीकर, कमला श्री.; परांडेकर, शं. आ.

पेंडगूळ