ब्रूचर्स ब्रूम ( रस्कस ) : (१) खवल्यासारखे पान, (२) पर्णक्षोड, (३) फूल, (४) खवले (पाने).

ब्रूम : हे इंग्रजी नाव काही फुलझाडांना [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] लावलेले आढळते. ही बहुतेक सर्व शिंबावंत [शेंगा येणारी ⟶ लेग्युमिनोजी] कुलातील झुडपे असून पावसाळ्यात व उन्हाळ्यात त्यांना सुंदर फुलोरे येतात. मूलतः ही यूरोप, उ. आफ्रिका व प. आशिया येथील असून इतरत्र शोभेकरिता बागांतून लावतात. भारतात हिमालयात व निलगिरीत काही जाती लावल्या आहेत. ब्रिटनमध्ये ‘स्कॉच ब्रूम’ हे झुडूप वन्य अवस्थेत आढळते आणि अमेरिकेत ते चांगले स्थिरावले आहे. बारीक उभ्या फांद्या, लहान पाने (कदाचित यातच झाडणीशी साम्य आढळल्याने त्या अर्थाचे ‘ब्रूम’ हे इंग्रजी नाव पडले असावे), सु. ०.३ मी. उंची आणि फिकट पिवळी फुले अशी याची सामान्य शारीरिक लक्षणे आहेत. ‘सामान्य ब्रूम’ नावाच्या जातींना पांढरी आणि जांभळी फुले येतात. या दोन्हींचा अंतर्भाव सायटिसस वंशात केला आहे. ‘एटना ब्रूम’ व ‘स्पॅनिश ब्रूम’ ह्या वनस्पती भिन्न वंशांतील (अनुक्रमे जेनिस्टास्पार्टियम) जाती असून त्यांना पिवळी फुले येतात. त्यांपासून पिवळा रंग काढतात. स्पार्टियमच्या बारीक फांद्यांपासून मिळणारा धागा द. फ्रान्स व स्पेन येथे दोर व जाडेभरडे कापड बनविण्यास वापरतात. पंजाबात टेकड्यांवर स्पॅनिश ब्रूम लावले आहे. ज्वारीच्या एका प्रकारच्या (टेक्‌निकम) लांब, अनेक फांद्यांच्या फुलोऱ्यांचा (परिमंजरीचा) उपयोग कुंचले व झाडू यांकरिता करतात त्यावरून त्या प्रकारास ‘ब्रूमकॉर्न’म्हणतात. अमेरिकेतील मिसिसिपीच्या खोऱ्यात याची लागवड केली जाते. फुलांचा हंगाम संपण्यापूर्वी हे फुलोरे छाटतात व नंतर सुकवून साफ करून वापरतात.‘ब्रूचर्स ब्रूम’(लॅ. रस्कस ॲक्युलिॲटस) हे ⇨ लिलिएसी कुलातील सदापर्णी झुडूप फ्लॉरिडात व कॅलिफोर्नियात वाढते व भारतात बागेत कुंड्यांतून शोभेकरिता लावतात याचे पर्णक्षोड (पानासारखे दिसणारे रूपांतरित खोड) हिरवे व रुंद असून त्याच्या मध्य शिरेवर बारीक खवल्यासारखी एक – दोन पाने व फुले येतात [⟶ खोड]. ब्रिटनमधील एका शोभिवंत जातीलाही (सारोथॅमन्स स्कोपॅरियस) ब्रूम म्हणतात. ही सु. १.५० मी. उंच, सरळ हिरवट शाखांनी युक्त असून हिला खाली त्रिदली पाने व वर साधी पाने आणि मे – जूनमध्ये २.५ सेंमी. लांब, सोनेरी पिवळट व पतंगरूप फुले येतात. या जातीच्या खोडांचाही उपयोग कुंचले व टोपल्यांकरिता पूर्वी करीत. रेतीयुक्त जमीन स्थिर करण्यास ही जाती लावतात ही तागाऐवजी वापरतात. सालीपासून पिवळा व तपकिरी रंग काढून तो कागद व कापड रंगविण्यास वापरतात. कोवळे फुलोरे मूत्रल (लघवी साफ करणारे) असून लहान फांद्या बीर या मद्याला स्वाद आणण्यासाठी वापरतात. फुलांतील मधावर मधमाश्या लुब्ध असतात. जर्मनीत पाने व कळ्या व्हिनेगर व मीठ यांमध्ये ठेवून नंतर खातात. शेळ्यामेंढ्यांना ही वनस्पती उत्तम चाऱ्याप्रमाणे उपयुक्त आहे. (चित्रपत्र ६०).

परांडेकर, शं. आ.