तामण : (१) फुलांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) अपक्व फळ, (४) तडकलेले फळ.

तामण : (मोठा बोंदारा हिं. अर्जुना, जारूळ, तारूळ क. होलेमट्टी, नीरपेंडेका सं. अर्जुना इं. क्वीन्स फ्लॉवर प्राइड ऑफ इंडिया, क्कीन क्रेप मिर्टल लॅ. लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा कुल–लिथ्रेसी). सु. ९–१८ मी. उंचीचा हा पानझडी वृक्ष शोभेकरिता भारतात सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या दुतर्फा व बागेत हा सामान्यतः आढळतो. पश्चिम द्वीपकल्प, आसाम, ब्रम्हदेश, श्रीलंका, मलाया व चीन इ. प्रदेशांत नद्यांच्या काठाने अगर दलदली भागातही आढळतो. त्रावणकोर, आसाम, ब्रम्हदेश व श्रीलंका ही याची मूलस्थाने समजतात. ह्याची साल फिकट, गुळगुळीत व वेड्यावाकड्या ढलप्यांनी सोलून जाते. पाने आंब्याच्या पानासारखी पण अधिक रुंद असून फेब्रुवारी ते मार्चपर्यंत झडतात ती वर गर्द हिरवी व खाली फिकट असतात. शेंड्याकडे मध्यम आकाराच्या व जांभळट फुलांच्या परिमंजऱ्या एप्रिल ते जूनमध्ये येतात. फुलांची संरचना आणि इतर शारिरीक लक्षणे ⇨ लिथ्रेसी अथवा मेंदी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. संवर्त खाली पेल्याप्रमाणे, वर ६-७ संदले पाकळ्या ६-७, पुष्पदलसंबंध वलिवंत, केसरदले असंख्य बोंडाभोवती खाली संवर्ताचा पेला व टोकास किंजलाचे अवशेष आढळतात [→ फूल]. बिया सपक्ष, फिकट बदामी आणि गुळगुळीत. या झाडाचे लालसर लाकूड ब्रम्हदेशात सागवानाखालोखाल दर्जाचे मानतात ते बळकट, चिवट, पाण्यात व बाहेर टिकाऊ असते पिपे, नावा, होड्या, धक्के, घरबांधणी, पूल, मोटारी, साध्या व तोफांच्या गाड्या, पेट्या इत्यादींसाठी ते उपयुक्त असते. मुळे स्तंभक (आकुंचन करणारी), उत्तेजक व ज्वरनाशक साल आणि पाने रेचक बिया मादक व फळ तोंड आल्यास आतून लावण्यास उपयुक्त असते. जून पानात व पक्व फळात ‘हायपोग्लिसेमिक द्रव्य’ असल्याने हे भाग मधुमेहावर गुणकारी असतात, असे आढळले आहे. पाने गुरांना खाऊ घालतात.

पहा : चिनाई मेंदी.

कुलकर्णी, उ. के.