संकरज ओज : (हेटोरासीस इं. हायब्रिड व्हिगर). प्राण्याच्या किंवा वनस्पतींच्या दोन जातींपासून तिंवा दोन प्रकारांपासून संकरणाने ( एका जैवीक प्रकारातील दोन भिन्न जातींतील भिन्न लिंगीय जीवांमध्ये कृत्रीम रीत्या प्रजोत्पादन घडवून आणण्याने) निर्माण झालेल्या संततीत (संकरजात) मूळ दोघा भिन्न लिंगीय जीवांपेक्षा अधिक जोम, आकारमान, उत्पादनक्षमता, रोगप्रतिकारशक्ती, परिसराशी जुळवून घेण्याची अधिक क्षमता इ. लक्षणे अनेकदा प्रकर्षाने आढळतात. संकरजाच्या या वैशिष्ट्यांना १९१४ मध्ये जी. एच्. शल या शास्त्रज्ञांनी ‘हेटेरोसीस’ (संकरज ओज) ही संज्ञा ‘हेटेरोझायगॉगिस’ या संज्ञेचे संक्षिप्त रूप करून वापरली.  हेटेरोझायगस म्हणजे विषमरंदुकी [दोन वैकल्पिक भिन्न लक्षणांनी युक्त असलेल्या प्रजोत्पादक कोशिकांच्या (पेशींच्या) संयोगाने बनलेली संयुक्त कोशिका] ही जननविज्ञानातील [⟶ आनुवंशिकी] संज्ञा संकरजासंबंधी वापरण्यास उपयुक्त असल्याने हेटेरोसीस (हायब्रीड व्हीगर) या संज्ञेत वापर समर्थनीय ठरला आहे. ⇨ चार्ल्‌स रॉबर्ट डार्विन (१८०९-८२) व ⇨ ल्यूथर बरबँक (१८४९-१९२६) यांनी वनस्पतींतील अंतःप्रजननाचा (एकाच जातीतील किंवा प्रकारातील दोन जीवांत घडवून आणलेल्या प्रजोत्पत्तीचा) व संकरणाचा [⟶ वनस्पती-प्रजनन] अभ्यास व निरीक्षण अनेक वर्ष करून दोन्हींतील काही परिणाम नमूद केले होते. तथापि १९०५-३० या दीर्घकाळात जी. एच्. शल व . एम्. ईस्ट यांनी या विषयाबाबत बरेचसे शास्त्रशुद्ध संशोधन करून असे दाखवून दिले की, दोन (विशेषतः मक्याच्या) अंतःप्रजनित शुद्ध वाणांपासून संकरजामध्ये इच्छित विशेष लक्षणे आणता येतात संकरणाने मिळालेल्या चेतनेमुळे संकरज ओज हा एका दृश्य परिणाम घडून येतो व तसेच संकरजात घडवून आणलेल्या जननप्रक्रियेत (अंतःप्रजननात) उत्तरोत्तर हा संकरज ओज कमी होत जातो. ज्याला आज आपण संकरज ओज म्हणतो. त्याचा कित्येक शतकांपूर्वीपासूनच मनुष्याने बराच फायदा करून घेतला आहे. घोडा व गाढव यांच्या संकरणाने खेचर निर्माण करून दोन्हीतील उपयुक्त गुणांना (बल, वेग, सहनशक्ती वधिमेपणा) एकत्र आणले आहे व ते जनावर संकरणात वापरलेल्या जनक व जननी पाण्यांपेक्षा काही बाबतींत सरस ठरले आहे. [⟶ खेचर].

सर्वसाधारणतः प्रत्येक जीवात काही लक्षणे प्रकट वा प्रभावी व काही अप्रकट किंवा अप्रभावी (सुप्त) असून त्यांबद्दल त्या जीवाच्या गंतुकांत (प्रजोत्पादक कोशिकांत) अशी जनुके असतात [आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकाला गुणसूत्र म्हणतात आणि गुणसूत्रावरील माळेसारख्या रचनेतील घटकाला जनुक म्हणतात ⟶ जीन गुणसूत्र आनुवंशिकी]. प्रभावी किंवा अप्रभावी जनुके असलेल्या दोन गंतुकांपासून बनलेल्या रंदुकांस ‘ समरंदुक ’ व त्यापासून बनलेल्या जीवास ‘ समरंदुकी ’ म्हणतात. तसेच एक प्रभावी व एक अप्रभावी जनुकयुक्त गंतुकांच्या संयोगाने बनलेल्या रंदुकांस ‘ विषमरंदुक ’ व त्यापासून बनणाऱ्या जीवास ‘ विषमरंदुकी ’ म्हणतात. विशिष्ट लक्षणापुरते बोलताना समरंदुकीला शुद्ध व विषमरंदुकीला अशुद्ध म्हणतात. दोन समरंदुकीच्या किंवा दोन विषमरंदुकीच्या प्रजोत्पादनास ‘ अंतःप्रजनन ’, दोन भिन्न समरंदुकींच्या जननप्रक्रियेस ‘ संकरण ’ व त्यांच्या संततीस ‘ संकरज ’ म्हणतात ते विषमरंदुकी असते.

अंतःप्रजनन विरूद्ध संकरण : अंतःप्रजननात मूळच्या प्रकारातील (किंवा जातीतील) कित्येक लक्षणे सर्वसाधारणतः न बदलता राहतात, त्यामुळे व्यक्तीतील दोष पिढ्यान्‌पिढया चालू राहतात व त्या व्यक्ती दुर्बल राहतात. काही अहितकारक अप्रभावी जनुके समरंदुकावस्थेत साचून राहतात परंतु यदृच्छया संबंध घडून आल्यास काही दुर्मिळ अप्रभावी जनुके विषमरंदुकात गोवली जातात. अंतःप्रजननात अशा जनुकांना संधी मिळते व संततीत ती व्यक्त होतात. जीवनातील स्पर्धेत दोषयुक्त व्यक्ती नैसर्गिक निवडीमुळे बाजूस पडून अप्रभावी जनुके नामशेष होतात व सर्व वाण (किंवा प्रकार) सुधारतो तसेच एक वेळची अपायकारक ⇨ उत्परिवर्तने (एकदम दिसून येणारे विशेष फरक) बदलत्या परिस्थितीत उपकारक ठरून ⇨ क्रमविकास (उत्कांती) चालू राहतो. कित्येकदा अप्रभावी जनुकांचा दुष्परिणाम आईबापापैकी एकात (दोन्ही जनुके अप्रभावी असलेल्यात) दिसतो परंतु त्यांचा प्रभावी जनुके असलेल्या शुद्ध व्यक्तीशी झालेल्या संकरणानंतरच्या संततीत, प्रभावी जनुकांमुळे, लोप पावलेला आढळतो हा संकरणाचा एक फायदा होय. अंतःप्रजननातील पिढ्यान्‌पिढ्या चालू राहणारे व्यक्तीतील दोष संकरणाने टाळणे शक्य होते शिवाय वर सांगितलेले इतर महत्त्वाचे बदल संकरजामध्ये होतात. संकरणामुळे जातींचे किंवा प्रकारांचे स्थैर्य कमी होते, परंतु काही वेळा विशेष जोम दिसतो यामध्ये जनुकांच्या जोड्या विषमरंदुकावस्थेत राहिल्याने अप्रभावी जनुकांना नैसर्गिक निवडीत संरक्षण मिळते विषमरंदुकता कायम राहून क्रमविकासाला प्रभेदांचे साहाय्य होते शिवाय संकरज ओज प्राप्त झाल्याने व्यावहारिक महत्त्व वाढते. कित्येक वनस्पतींत स्वफलन टाळून परफलन [⟶ परागण] घडवून आणण्यासाठी नैसर्गिक योजना आढळतात. यावरून अंतःप्रजननाचे दोष टाळून संकरणाचे फायदे व्हावेत अशी नैसर्गिक प्रवृत्ती दिसते. अंतःप्रजननापासून विशेष हानी होत नाही, अशीही काही उदाहरणे आढळतात. काही वनस्पती (उदा., ओट) पिढ्यान्‌पिढ्या स्वफलनच चालू ठेवतात, तर मनुष्याने काही पाळीव जनावरांच्या बाबतीत निकटवर्ती अंतःप्रजनन चालू ठेवले आहे कारण त्यामुळे काही फायदेशीर लक्षणे परंपरेने चालू राहतात. मनुष्यांचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, ते ईजिप्तमधील प्राचीन राजघराण्यातील (फारोहातील) भावाबहिणींच्या विवाहाचे आहे ह्यापासून दुष्परिणाम झाल्याचे नमूद नाही, तथापि मनुष्यसमाजात निकटच्या संबंधातील अंतःप्रजननावर नियंत्रणे असल्याचे चालीरीतींवरून आढळते. त्यामुळे काही अंशी तरी संकरण आवश्यक मानले गेले आहे असे दिसते. काही छोट्या व्यक्तिसमूहात आढळणाऱ्या काही दोषांचे (व्यंगांचे) कारण त्या समूहातील अंतःप्रजनन आहे, असे मानले जाते. इतरांप्रमाणे संकरणामुळे संकरज ओजाची प्राप्ती होते, असा अनुभव अनेकदा येतो. प्राचीन ग्रीक व अर्वाचीन फ्रेंच, इंग्रज, जर्मन आणि अमेरिकन लोक इत्यादींतील विशेष प्रकारची क्षमता ही त्यांची उत्पत्ती संकरणामुळे झाली असल्याने बनली असावी, असे काही तज्ञ मानतात. तथापि काही देशांत सकृत्‌दर्शनी फार वेगळेपणा आढळणाऱ्या मानवी वंशातील व्यक्तींच्या शरीरसंबंधाविरूद्ध प्रस्थापित संकेत असून कोठे कोठे कायदेशीर बंधने आहेत.

संकरज ओजाचा कार्यकारणभाव : हा येथे खालील तीन सिद्धांतांव्दारे सांगितला आहे.

वैकल्पिक जनुकांची अन्योन्यक्रिया : संकरणामुळे विकल्प दर्शविणारी दोन किंवा अधिक जनुके संकरजामध्ये एकत्र येतात व तेथे परस्परांवर प्रभाव पडणे किंवा परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया होणे शक्य असते. संकरज ओजाचे मूळ यात असावे, म्हणजेच विषमरंदुत्व या परिमाणाला आवश्यक ठरते. उदा., एकाच बिंदुपथाबद्दल ही दोन वैकल्पिक जनुके मानली तर, समरंदुकातील अथवा ह्या युती विषमरंदुकातील या युतीपेक्षा कनिष्ठ ठरतात येथे एक प्रकारची प्रभावातील अन्योन्यक्रिया होते. याला ‘अतिप्रभाव’ ही संज्ञा दिली जाते. याचा अधिक खुलासा असा की, ह्या वैकल्पिक जनुकांचे वैयक्तिक उत्पाद भिन्न असतात परंतु त्यांची गोळाबेरीज किंवा त्या जनुकांच्या प्रतिक्रियेचा उत्पाद समरंदुकीपासून बनलेल्या उत्पादापेक्षा श्रेष्ठ असतो. या स्पष्टीकरणाला प्रायोगिक पुरावा देण्यात आला आहे. कित्येक प्रयोगांत समरंदुकीपेक्षा विषमरंदुकी व्यक्तीच्या शरीरावर (सरूपविदया) अधिकतर परिणाम दिसतो तसेच कधी हा परिणाम प्रतिगामी स्वरूपाचाही (ऋण संकरज ओज) असतो.


भिन्न प्रभावी जनुकांची अन्योन्यक्रिया : संकरज ओजाकरिता अतिप्रभावाची आवश्यकता नसून त्याऐवजी साध्या प्रभावी व अप्रभावी ह्या वैकल्पिक जनुकांच्या जोड्यांची कल्पना गृहीत धरल्यास त्यांचे स्पष्टीकरण होऊ शकते. यामध्ये काही जनुके ओजाबद्दल जबाबदार म्हणून प्रभावी व त्याची वैकल्पिक जनुके ओजाचा अभाव म्हणून अप्रभावी असे मानता येते. पूर्वी सांगितलेले अंतःप्रजननाचे परिणाम ध्यानात घेतल्यास ही उपपत्ती पटते. निसर्गात स्वफलित राहिलेल्या काही सजीवांत अहितकारक अप्रभावी लक्षणे जीवनाच्या स्पर्धेत सतत बाजूला पडतात हे पाहिलेच आहे त्यावरून ओटसारख्या वनस्पतीत, निसर्गतः परफलित अशा इतर वनस्पतीइतकाच जोम कसा राखला जातो, याचा उलगडा होतो.

जीवरासायनिक आधार : कोणत्या सारायनिक प्रक्रियेमुळे संकरज ओजाची निष्पत्ती होते हे अद्याप निश्चितपणे कळलेले नाही तथापि याबाबत केलेला काही प्रायोगिक अभ्यास तत्‌संबंधी अधिक संशोधन करण्यास मार्गदर्शक ठरतो. काही रासायनिक वृद्धि-घटकांना जनक वनस्पती व संकरज यांनी दर्शविलेल्या प्रतिक्रियांची तुलना करून डब्ल्यू. जे. रॉबिन्स (१९४१) यांनी काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. वृद्धीस आवश्यक अशा क्रियाशीलतेमुळे संकरज ओज व्यक्ती होते व ती संकरजातील पूरक जनुकांच्या क्रियेमुळे घडून येते, असा त्यांच्या टोमॅटो व त्यांचे संकरज यांवरच्या प्रयोगांचा सारांश आहे.

संकरज ओजाचे स्थिरीकरण : ग्रेगोर योहान मेंडेल यांनी केलेल्या संकरणाच्या प्रयोगांत संकरजांच्या पुढच्या पिढ्यांत लक्षणांचे विभक्तीकरण होत जाऊन त्यांच्यासारख्याच व्यक्तींची संख्या उत्तरोत्तर कमी होत जाते, असा अनुभव होताच. शल व ईस्ट यांनाही संकरज ओज संकरजांच्या अंतःप्रजननात कमी होत जातो, असे दिसून आले होते. जोंधळा किंवा मका यांचे संकरज प्रकार लागवडीत घेतल्यावर हाच अनुभव येऊ लागल्यामुळे ह्या अडचणीकडे विशेष लक्ष देऊन स्थिरत्व लाभलेले संकरज प्रकार मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

मक्यात पहिल्या संकरज ओजाचे स्थिरीकरण अद्याप अशक्यच ठरले आहे. जेव्हा शुद्घ वंश प्रकारात ओजाबद्दल जबाबदार अशा प्रभावी जनुकांचे अनेक भिन्न बिंदुपथ असतील, तेव्हा त्यांच्या संततीपासून एक विशिष्ट समरंदुकी काढण्याची शक्यता फार कमी असते, ती मिळाल्यास स्थिरीकरणाची समस्या सुटते. सध्या तरी विषमरंदुकोत्पन्न ओजाचे समरंदुकी प्रकारात प्रायोगिक रीत्या स्थिरीकरण जवळजवळ अशक्य मानले गेले आहे. तथापि अनेक भिन्न सजीवांत हितकारक जनुकयुक्त व वैकल्पिक मिश्रणे, पुनर्मिश्रणाव्दारे न फुटू देता, स्थिर राखण्याच्या जननिक यंत्रणा आढळतात त्यांपैकी तिन्हींचे विवेचन खाली केलेले आहे.

अलिंग जनन : लक्षणांचे विभक्तीकरण व पुनर्मिश्रण यांना अलिंग पद्धतीत वाव नसतो, त्यामुळे जनक व्यक्तींत विषमरंदुकत्वाचे प्रमाण जितके मोठे असेल तितके परंपरेने राखले जाते याचा व्यावहारिक फायदा वनस्पती प्रजनकांनी बराच घेतला आहे. ऊस, केळ, गुलाब व आंबा यांच्या कित्येक जातींतील लक्षणांची परंपरा त्यांचे उत्पादन अलिंग पद्धतीनेच करून टिकविली जात आहे [⟶ प्रजोत्पादन].

संतुलित मारक घटक : काही वनस्पतींच्या (उदा., ईव्हिनिंग प्रिमरोझ लॅ. इनोथेरा लामार्कियाना) गंतुकनिर्मितीपूर्व विभाजनात (न्यूनीकरण) मध्यावस्थेत रंगसूत्रांची मांडणी अशी असते की, मातेकडून आलेली सर्वच रंगसूत्रे (गॉडेन्स) एका टोकास व पित्याकडून आलेली (वॅलेन्स) दुसऱ्या टोकास असतात. यानंतर प्रत्येकी दोन प्रकारची (पुं. व स्त्री.) गंतुके बनतात. एकाच प्रकारच्या म्हणजे गॉडेन्सयुक्त दोन किंवा वॅलेन्सयुक्त दोन (पुं. व स्त्री.) गंतुकांपासून बनलेल्या समरंदुकापासून संतती बनत नाही. दोन्ही रंगसूत्र-गटांत भिन्न मारक जनुके असतात ती (म्हणजे एक गॉडेन्स व एक वॅलेन्स) एकत्र आल्यास परस्परास सांभाळून घेत असल्याने अशा विषमरंदुकीपासून व्यक्तिविकास होतो परंतु दोन सारखी मारक जनुके एकत्र आल्यास (समरंदुकत्व) रंदुकविकास नष्ट होतो. अशा ‘ संतुलित मारक ’ जनुकांच्या यंत्रणेमुळे विषमरंदुकांची संतती शुद्ध राहते.

उभयद्विगुणितत्त्व : कधीकधी वंध्य संकरजापासून निर्माण झालेल्या, पण द्विगुणित गंतुकांच्या संयोगाने चतुर्गुणित रंदुक बनते त्याला ‘ उभयद्विगुणित ’ म्हणतात. अशा प्रकारच्या अंतराजातीय किंवा अंतरावंशीय संकरजात संकरज ओज निर्माण झाले, तरी ते पिढ्यान्‌पिढ्या टिकून राहणे शक्य आहे.


आ.१. द्विसंकरण-संकरज : चार अंतःप्रजनित वाणांच्या दोन संकरणाने एक स्थिर संकरज ओज असलेला वाण बनविण्याची पद्धत (अ) आणि (आ) पासून (उ) वाण (इ) आणि (ई) पासून (ऊ) वाण (उ) आणि (ऊ) वाणांपासून (ए) हा इच्छित वाण (१) पराग.मक्याच्या संकरज ओजाचा शेतकऱ्याला व्यावहारिक उपयोग व्हावा म्हणून मोठया प्रमाणावर त्याचे संकरज बी पुरविणे आवश्यक आहे. याची शक्यता पाहताना अमेरिकेत प्रथम असा अनुभव आला की, फक्त दोन अंतःप्रजनितांच्या संकरणापासून मिळालेले संकरज बी संख्येने फारच थोडे होते त्यापासून आलेल्या झाडांचे स्वरूप, उत्पादन इ. लक्षणे संकरज ओजाशी सुसंगत असली, तरी त्यांच्यापासून मिळालेल्या बियांत अशुद्धांचे (विजातीय) प्रमाण अधिक होते. ही आपत्ती टाळण्यास अमेरिकन तज्ञांनी ‘ द्विसंकरण-संकरज ’ मिळविण्याची पद्धत वापरली (आ.१). यामध्ये चार निवडक शुद्ध (अंतःप्रजनित) प्रकार घेऊन प्रथम त्यांतील प्रत्येक जोडीपासून एक अशी दोन भिन्न संकरजे मिळविली त्यानंतर मिळालेल्या या दोन संकरजांचे पुन्हा संकरण करून एक अंत्य संकरज बी मिळविले याचा वापर करण्यास ते शेतकऱ्यांनी पुरविले व त्याचा इष्ट तो उपयोग झाला [⟶ वनस्पति-प्रजनन].

आ. २. ज्वारीच्या संकरज ओजाचे स्थिरीकरण : [पुं-वंध्यत्व पद्धतीचा वापर करून संकरज ज्वारीचे (आणि इतर पिकांचे) उत्पादन करण्यास उपयुक्त असा सैद्धांतिक आधार दर्शविणारी आकृती]. (अ) जननक्षम पुं-पुष्पे असलेला अन्य अंतःप्रजनित वाण यांमध्ये पुं-जननक्षमता पुन:प्राप्त करून देण्यास समर्थ असलेले जनुक (जीन) असते. (आ) पुं-वंध्यत्व असलेला अंतःप्रजनित वाण (इ) शेजारच्या दोन आकृतींत दर्शविलेल्या वाणांच्या संकराने निर्माण झालेला नवीन पुं-जननक्षम व्यापारोपयोगी वाण (संकरज) (१) पराग, (२) संकरित बी.

जोंधळ्याच्या (ज्वारीच्या) संकरजामध्ये संकरज ओजाचे स्थिरीकरण करण्याची प्रक्रिया याहून काहीशी भिन्न आहे, कारण त्याच्या फुलोऱ्यात द्विलिंगी फुले असतात. येथे संकरज-निर्मितीत ‘ पुं-वंध्यत्व ’ पद्धतीचा वापर करतात. प्रथमत: येथे वंध्य-परागाला जबाबदार असलेले जनुक धारण करणारे वाण बनवून घेतात पुढे अशा वाणांचा संकर नित्य प्रकारच्या वाणाशी घडवून आणतात व त्याकरिता दोन्हींची मिश्रपेरणी करतात. त्यामुळे वंध्य-पराग वाणाच्या फुलातील किंजल्कावर नित्य वाणाच्या फुलातील पराग येतात, फलधारणा होते व त्यापासून बिया बनतात. त्यांपासून मिळणारा वाण नित्याप्रमाणे जननक्षम असतो पुढे त्यापासून अंतःप्रजननाने बनणारे बी हवे तितके व तसे मिळते. विशेष नमूद करण्यासारखी बाब अशी की, वरील संकरणात वापरलेल्या नित्य वाणाच्या परागात जननक्षमतेची पुनर्निर्मिती करणारा जनुकही असतोच. कांदा, बटाटा, बीट यांच्या संकरण पद्धतीत याच तत्त्वाचा अवलंब करतात. इतकेच नव्हे, तर मका व गहू यांचे अशाच प्रकारे संकरज मिळविण्याबाबत प्रयोग सुरू आहेत.

दिवसेंदिवस संकरणाचा अधिकाधिक उपयोग करून संकरज ओज असलेल्या नवीन जाती व प्रकार बनवितात. फलोद्योग, बागाईत, रेशीम उत्पादन, कृषी, पशुसंवर्धन, कवकसंवर्धन इत्यादींत ते निर्माण केले जात आहेत. बिनबियाची फळे (द्राक्ष, पेरू, पपई इ.), साखरेचा बीट व व्हाइट लेगहॉर्न कोंबडी ही उदाहरणे त्यांपैकीच होत.

पहा : क्रमविकास खेचर प्रिमरोझ.

संदर्भ : 1. Baker, H. G. Plants and Civilisation, Belmont, 1965.

            2. Gardener, E. G. Principles of Genetics, London, 1964.

            3. Greulach, V. A. Adams, J. E. Plant Life, New York, 1962.

            4. Sinnott, Dunn Dozhansky, Principles of Genetics, Tokyo, 1958.

            5. Srb, A. M Owen, R. D. General Genetics, Tokyo, 1960.

 

परांडेकर, शं. आ.