व्हर्बिना बायपिनॅटिफिडा – (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा पुष्पिमुकुट उघडलेला, (५) किंजपुट, (५) फळ.व्हर्बिना : (कुल-व्हर्बिनेसी). एक फुलझाड. व्हर्बिना ह्या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रजातीतील सु. २५० जाती मूळच्या दक्षिण अमेरिकेतील असून मुख्यत: अमेरिकेच्या उष्ण भागात व कॅनडात त्यांचा प्रसार आहे. कित्येक जाती तेथे व भारतात बागेत शोभेकरिता लावतात. बागेतील विविध रंगांच्या व सुवासिक फुलांच्या आकर्षक जाती ‘संकरज’ असून लोकप्रिय आहेत. हिमालय, पंजाब व बंगाल येथील एक स्थानिक जाती व्हर्बिना ऑफिसिनॅलिस ही बागेत तणासारखी उगवते व ती औषधी आहे. ही रानटी जाती असावी असे वनस्पतिशास्त्रज्ञ हरमेनगिल्ड सांतापाव यांचे मत आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये व दक्षिण युरोप ते भूमध्य सामुद्रिक प्रदेशातही ती आढळते. ह्या प्रजातीतील बहुतेक सर्व जाती लवदार ⇨औषधी व लहान झुडपे असून त्यांपैकी काही वर्षायू व काही बहुवर्षायू आहेत. यांची पाने साधी, समोरासमोर, क्वचित अखंड, बहुधा कातरल्याप्रमाणे दातेरी आणि क्वचित मंडलित किंवा एकाआड एक असतात. यांच्या पसरट फांद्यांच्या किंवा मुख्य खोडांच्या टोकास व पानांच्या बगलेत शोभिवंत फुलोरे [मंजिऱ्या, कणिशे, गुलुच्छ इ. → पुष्पबंध] असतात. फुले द्विलिंगी, अनियमित लहान, विविध रंगांची, बिनदेठाची व दाटीने येतात. प्रत्येक फुलात पाच पाकळ्या, दोन ओठांप्रमाणे, खाली जुळून वर सुट्या व पसरट असतात. त्याखालचा भाग (संवर्त) नळीसारखा असून त्यावर उभे कंगोरे असतात. केसरदले (पुं-केसर) चार व त्यांपैकी दोन लहान, दोन मोठी किंजपुट ऊर्ध्वस्थ (इतर पुष्पदलांच्या वरच्या पातळीत) व त्यात चार कप्पे असून प्रत्येकात एक बीजक असते [→ फूल]. शुष्क फळांचे चार एकबीजी व संवर्ताने वेढलेले जाड सालीचे भाग (कपालिका) बनतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨व्हर्बिनेसी कुलात (साग कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

व्ह. बोनारिएन्सिस ही जांभळ्या फुलांची जाती मूळची दक्षिण अमेरिकेतील असून भारतात सर्वत्र उद्यानांतून सामान्यपणे लावतात. ती सामान्यपणे हिमालयात व निलगिरीत आढळते. ऑस्ट्रेलियात गायीचा गर्भपात होण्यास ती कारणीभूत होत असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांच्या बहुतेक जाती व्ह. पेरुव्हियाना ह्या अमेरिकेतील जातीपासून निर्माण झालेल्या संकरज असल्याचे मानतात. व्ह. व्हिनोजा ह्या निळसर जांभळ्या फुलांच्या अमेरिकेतील जातीस परिमंजिरीवर थंडीत फुले येतात. पाळीव जनावरांना हिच्यापासून दाह होतो हिच्या मांसल मुळांचा काढा आफ्रिकेत पोटदुखीवर देतात. व्ह. बायपिनॅटिफिडाची लागवड शोभेकरिता मुद्दाम लहानमोठ्या मोकळ्या जागेत करतात. व्ह. इन्सिसा ह्या गुलाबी फुलांच्या जातीला जानेवारी-फेब्रुवारीत बहर येतो. तिच्या जवळपास पडलेल्या बियांपासून नवीन झाडे वाढतात. व्ह. हायब्रिडा आणि व्ह. पेरुव्हियाना ह्या जाती बागेतील खडकमिश्रित जमिनीत वाढवितात, त्यामुळे शोभा वाढून खडकाळ भाग झाकला जातो. व्ह. लॅसिनिऍटाची पाने फारच विभागलेली असतात.

व्हर्बिना ऑफिसिनॅलिस : ही वर उल्लेखिलेली व्हर्बिनाची जाती भारतीय असून, ती काहीशी सरळ (सु. ३० – १५० सेंमी. उंच) वाढते, तथापि बहुतेक फांद्या जमिनीसरपट वाढून टोकास सरळ वर वळतात. जमिनीतील मूलक्षोड [→ खोड] कठीण व जाडजूड असते तिचा प्रसार काश्मीर ते भूतान येथे आणि खासी, अका व लुशाई टेकड्यांत सु.३००-१,८०० मी. उंचीवर आहे. बिहार, प. बंगाल, आंध्र प्रदेश येथे व महाराष्ट्रात हिचा प्रसार आढळतो. हिचे खोड चौकोनी असते पाने समोरासमोर किंवा तिनांच्या झुबक्यात व कमी-जास्त विभागलेली असून फुले निळी व फळांचे स्वतंत्र भाग (कपालिका) आयत, बाहेरून गुळगुळीत पण आतून त्यांवर तीन कंगोरे असतात. ह्या वनस्पतीत व्हर्बेनॅलिन हे ग्लायक्रोसाइड विशेषत: फुलांत व कळ्यांत अधिक असते शिवाय फुलांपासून एक सुगंधी बाष्पनशील तेलही मिळते. त्याचा उपयोग सुगंधी द्रव्यांत करतात परंतु व्हर्बिना तेल या नावाने जे व्यापारी तेल मिळते, ते हे नव्हे. ह्या वनस्पतीत ज्वरनाशक, स्तंभक (आकुंचन करणारे), कृमिनाशक गुण असून पोर्तुगालमध्ये हिचा असा औषधी वापर करीत असत. संधिवातात व जखमांवर ताज्या पानांचा रस देतात. पानांपासून बनविलेले मलम गर्भाशयाच्या सुजेवर लावतात. युरोपात तापावर व सर्दीवर आणि आफ्रिकेत जुनाट हट्टी इसब, श्वासनलिकादाह व मासिक पाळीतील दोष इत्यादींवर ही वनस्पती वापरतात. तिला काहीशी कडू व वासट चव असते.

लिंबाच्या वासाचा व्हर्बिना : (इं. लेमन व्हर्बिना लॅ. लिपिया सिट्रिओडोरा किंवा अलोयसिआ ट्रायफायला). व्हर्बिनाच्या कुलातील परंतु अन्य प्रजातीतील (लिपियातील) ही जाती एक मोठे झुडूप किंवा लहान वृक्ष असून तिचे मूलस्थान चिली आहे व मोरोक्कोत तिची लागवड आहे. अर्ल ऑफ क्लेर यांनी ते प्रथम जुन्या मुंबई इलाख्यात आणल्यावर गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक येथे उद्यानांतून तिचा प्रसार झाला. हिचे स्वरूप काहीसे ⇨घाणेरी (टणटणी) सारखे दिसते. लिपिया प्रजातीत सु. २०० जाती असून त्यांपैकी भारतात चारपाच आढळतात. त्या सर्व लहानमोठी झुडपे आहेत. त्यांपैकी एक लिपिया आल्बा सु. १-२ मी. उंचीचे, तीव्र सुगंधी पण शोभादायक झुडूप आहे. त्याला लालसर फुले येतात. खासी टेकड्यांत पाने भाजीकरिता उपयोगात आहेत. ब्राझील व पॅराग्वाय येथे याचा उपयोग भूक वाढविणारे म्हणून व मज्जासंस्थेच्या दोषांवर करतात. मध्ये प्रदेशात याला ‘बासूला’ म्हणतात. लिपिया सिट्रिओडोरा सु. ३ –६ मी. उंच झुडूप असून त्याला साधी, भाल्यासारखी सुगंधी पाने तिनांच्या झुबक्यांत येतात. खोडाच्या व फांद्यांच्या शेंड्याकडे झुबकेदार फुलोर्यांथवर लहान, फिकट जांभळी, निळी किंवा पांढरी फुले येतात. खरे व्हर्बिना तेल या वनस्पतीच्या ताज्या पानांसह तुकड्यांपासून ऊर्ध्वपातनाने काढतात. ते ०·१ –०.७% हिरवट पिवळे व बाष्पनशील तेल असून त्याला गवती चहाच्या तेलासारखा पण अधिक सौम्य व मोहक सुगंध येतो. त्यात २६ – ३९% सिट्रॉल असते. ‘स्पॅनिश व्हर्बिना तेल’ हे याहून भिन्न असते. लिपिया प्रजातीतील दुसरी जाती लिपिया नोडिफ्लोरा (फायला नोडिफ्लोरा) ही ‘रातोलिया’ अथवा ⇨जलपिंपळी नावाने प्रसिद्ध आहे.

पहा : व्हर्बिनेसी.

चौगले, द. सी. परांडेकर, शं. आ.