शूलपर्णी (अमेरिकन हॉली) : फळांसह फांदी.शूलपर्णी : (इं. यूरोपियन किंवा अमेरिकन हॉली लॅ. इलेक्स ॲक्विफोलियम कुल-ॲक्विफोलिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक सदापर्णी वृक्ष. हॉली हे नाव उत्तर व दक्षिण अमेरिका, उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय आशिया, युरोप, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथे आढळणाऱ्या इलेक्स प्रजातीतील सु. २७५ जातींच्या सदापर्णी व पानझडी वृक्षांना आणि झुडपांना दिलेले आढळते. भारतात इलेक्सच्या सु. २२ जाती आढळतात. तो चीनमध्येही आढळतो.

भारतात समशीतोष्ण ठिकाणी शूलपर्णी वृक्ष बागांत लावलेला आढळतो. त्याची उंची सु. १२ मी. असून साल करडी असते, पण नंतर भेगाळते. फांद्या आखूड व पसरट असून वृक्षाचा माथा आयत व पिरॅमिडासारखा दिसतो. पाने साधी, आखूड देठांची, एकाआड एक, दीर्घवृत्ताकृती किंवा आयत, चिवट, चकचकीत व तरंगित काटेरी किनारीची असतात. लागवडीतील काही प्रकारांत पानांवर पांढरे व किंवा पिवळट ठिपके असतात. कधी त्यांच्य किनारीही तशाच असतात. फुले सामान्यत: एकलिंगी (क्वचित द्विलिंगी), पांढरी किंवा पिवळी, सुगंधी असून मधमाश्या त्यांतून मधाची लयलूट करतात. मे महिन्यात पानांच्या बगलेत झुपक्यांनी फुले येतात. स्त्री-पुष्पातील वंध्य केसरदले (पुं-केसर) मोठी असल्यामुळे द्विलिंगी फुलासारखी दिसतात. आठळीयुक्त फळे शेंदरी, गोलसर, वाटाण्याएवढी व चकचकीत असून ती मे-जून मध्ये येतात.

शूलपर्णीचे लाकूड पांढरे किंवा करडे, कठीण, जड व न चिंबणारे असून त्याला उत्तम झिलई करता येते. किटलीच्या मुठी, काठ्या, तक्ते, कातीव व कोरीव काम यांकरिता ते वापरतात. याची साल वेदनाहारक, मूत्रल व वांतिकारक असते. पाने जलोदरावर व काविळीवर उपयुक्त असतात. 

परांडेकर, शं. आ.