उडिचिराइत : (हिं. बारा चिरायत लॅ. एक्झॅकम बायकलर कुल-जेन्शिएनेसी). सु. ६० सेंमी. उंच व सरळ वाढणाऱ्या या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार भारताच्या पश्चिम द्वीपकल्पात सामान्यपणे चराऊ रानात आढळतो. मुळे सूत्रल (तंतुमय) खोड चौकोनी व फांद्या फार कमी पाने साधी, संमुख (समोरासमोर) भिन्न आकाराची, बिनदेठाची, अंडाकृती किंवा कुंतसम (भाल्यासारखी) फुले आकर्षक, शेंड्याकडे वल्लरीत ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये येतात. संवर्त सपक्ष पुष्पमुकुट ४-५ टोकदार पाकळ्यांचा, ४-५ सेंमी. लांब ह्या पाकळ्या खालून पांढऱ्या व वरून निळ्या परागकोश छिद्रांनी टोकास फुटतात केसरदले ४-५ व पुष्पमुकुटाच्या कंठाशी चिकटलेली किंजदले दोन व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा व प्रत्येकात अनेक बीजके [→ फूल] बोंड लहान, गोलसर, पिवळट भुरे, चकचकीत बिया बारीक व अनेक.

ही ओषधी शक्तिवर्धक व दीपक (भूक वाढविणारी) असून अशाच स्वरूपाचे गुणधर्म असलेल्या जेन्शियन व ⇨ किराइत  या वनस्पतींऐवजी वापरतात. भारतात ती देशी (जंगली) चिराइत म्हणून विकली जाते. बागेत शोभेकरिता बियांपासून हिची लागवड करतात. 

पहा : जेन्शिएनेलीझ एक्झॅकम प्युमिलम.

जमदाडे, ज. वि.