इंगळी : (सतफल, समुद्रफळ, निवर हिं. हिज्जल क. केंपुकणगिन सं. धात्रीफल, विषया इं. स्मॉल इंडियन ओक लॅ. बॅरिग्टोनिया ॲक्युटँग्युला, कुल-मिर्टेसी). सु.  १०–१५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने, पाणथळ जागी व समुद्रकिनाऱ्याजवळ आढळतो शिवाय श्रीलंका, मलाया, ब्रह्मदेश, उ. ऑस्ट्रेलिया इ. भागांतही तो आढळतो. साल जाड, गर्द तपकिरी पाने साधी, लहान देठाची, चिवट, दातेरी, लंबगोल पण तळाशी निमुळती, एकाआड एक, ७·५० – १३ × ५ सेंमी. फुले लहान, लाल, सुगंधी व लोंबत्या मंजरीवर एप्रिल-मे महिन्यांत येतात. संदले व प्रदले प्रत्येकी चार, केसरदले अनेक, लांब व लाल किंजपुट अधःस्थ [→ फूल मिर्टेसी]. मृदुफळ २·५ – ४ × १·८ सेंमी. सूत्रल (तंतुयुक्त), जाड सालीचे, एकबीजी, चौधारी व लंबगोल. ह्या वृक्षाची जून पाने व मुळे कडू पण पौष्टिक बीजचूर्ण कफोत्सारक व वांतिकारक असून डोकेदुखीवर तपकिरीप्रमाणे ओढतात. साल, बी व मूळ मत्स्यविष पानांचा रस अतिसारावर देतात. साल कातडी कमावण्यास वापरतात. लाकूड मऊ पण टिकाऊ असून ते नावा, विहिरीचा कठडा, कपाटे, गाड्या, किरकोळ सजावटी सामान इत्यादींकरिता उपयोगात आहे.शोभेकरिता हा वृक्ष बागेत लावतात.

पहा : वनस्पति, विषारी.

दोंदे, वि. प.