सोस्यूर, निकोलस टेओडोर द : (१४ ऑक्टोबर १७६७ -१८ एप्रिल १८४५). स्विस रसायनशास्त्रज्ञ व वनस्पतिक्रियावैज्ञानिक. त्यांनी पाणी, हवा व पोषक घटक यांच्या वनस्पतींवरील प्रभावाविषयीचे राश्यात्मक प्रयोग केले. या प्रयोगांमुळे वनस्पतिरसायनशास्त्र या विज्ञानशाखेचा पाया घातला गेला. त्यांनी वनश्री व पर्यावरण यांचा संबंध दाखवून दिला आणि या संशोधन कार्यामुळे मृदाविद्या आणि परिस्थितिविज्ञान ही नवीन क्षेत्रे निर्माण झाली.

सोस्यूर यांचा जन्म जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे झाला. त्यांचे वडील होरेस-बेनेडिक्ट द सोस्यूर हे भूवैज्ञानिक होते. त्यांनी आपल्या वडिलांना अनेक प्रयोग व मोहिमा यांमध्ये साहाय्य केले होते. सोस्यूर यांचे संशोधनकार्य जोसेफ प्रीस्टली, त्यांचे शिक्षक झां सेनेबीए व यान इंगेन हाऊस यांच्या संशोधनावर उभे राहिले होते. सोस्यूर यांना जिनीव्हा ॲकॅडेमीमध्ये वनस्पतिक्रियाविज्ञान या विषयातील पद मिळाले नाही, त्याऐवजी खनिजविज्ञान व भूविज्ञान या विषयांतील सन्माननीय प्राध्यापक पद मिळाले (१८०२-३५).

सोस्यूर यांचे कार्‌बॉनिक अम्ल व त्याची वनस्पतीच्या ऊतकांमधील (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समूह) निर्मिती याच्या संशोधनावर ॲनल्स ऑफ केमिस्ट्री या इंग्रजी शीर्षकार्थाच्या नियतकालिकात १७९७ मध्ये तीन लेख प्रकाशित झाले. केमिकल रिसर्च ऑन व्हेजिटेशन (इं. शी.) या १८०४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात सोस्यूर यांनी सूर्यप्रकाशात वनस्पतींचे हिरवे भाग पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात व वनस्पतींच्या वजनात वाढ होते, ही स्टीव्हन हेलेस यांनी मांडलेली उपपत्ती सिद्ध करून दाखविली. त्यामुळे ते प्रकाशसंश्लेषणाच्या अभ्यासातील प्रमुख संस्थापक ठरले. नंतर त्यांनी असे दाखवून दिले की, वनस्पती नायट्रोजन प्राप्त करण्यासाठी मृदेवर अवलंबून असतात.

सोस्यूर यांनी १८०८ सालापासून महत्त्वपूर्ण लेखांची मालिका प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. या लेखांमध्ये त्यांनी मुख्यत्वे वनस्पतींच्या कोशिकांमधील जीवरासायनिक विक्रियांचे विश्लेषण केलेले होते. बियांमधील फॉस्फरसाचे प्रमाण (१८०८), ऑक्सिजन व पाणी यांच्या साहाय्याने स्टार्चचे ग्लुकोजात होणारे रूपांतर (१८१४ आणि १८१९), फळांमधील साठविलेले तेल (१८२०), फळ तसेच फूल परिपक्व होताना होणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रिया (१८२१-२२), गव्हाचे अंकुरण होताना होणारी साखरेची निर्मिती (१८३३) आणि अंकुरण ते किण्वनामध्ये होणाऱ्या प्रक्रियांचा तुलनात्मक अभ्यास (१८३३) हे त्यांचे महत्त्वाचे लेख होत. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात ते वनस्पतींचे पोषण या विषयाकडे वळले (१८४१). त्यांचा शेवटचा लेख तेलबियांच्या अंकुरणासंबंधी होता (१८४२).

 

सोस्यूर यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. १८२५ सालापर्यंत ते यूरोपातील बहुतेक सर्व ॲकॅडेमीचे सदस्य झालेले होते. १८४२ मध्ये लिआँ सायन्टिफिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. १८३७ मध्ये ए. पी. डी. कॉन्डोली यांनी संयुक्त फुलाला सोस्यूरी आणि प्रजातीच्या भागाला टेओडोरा असे नाव दिले.

सोस्यूर यांचे जिनीव्हा येथे निधन झाले.

 

पहा : प्रकाशसंश्लेषण वनस्पतींचे खनिज पोषण वृद्धि, वनस्पतींची.

 

ठाकूर, अ. ना.