टोपीतांबू : (१) कॅलाथिया ॲलौया : ग्रंथिक्षोडासह वनस्पती, (२) कॅ. झेब्रिना (पान).

टोपीतांबू : (लॅ. कॅलाथिया ॲलौया कुल-मॅरेंटेसी). सु. अर्धा मी. उंचीची ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी (आवृतबीजी एकदलिकित) मूळची अमेरिकेच्या उष्ण भागातील आणि वेस्ट इंडीजमधील असून हल्ली श्रीलंकेत लागवडीत आहे टोपीतांबू हे नाव तेथील आहे. कॅलाथिया या लॅटिन नावाने टोपीतांबूच्या वंशातील अनेक जाती विविधरंगी पानांच्या शोभेकरिता बागेत लावतात भारतातही कॅलाथियाच्या काही जाती (उदा., कॅ. लाइटझी) बागेत लावलेल्या आढळतात. सावलीत, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत आणि ओलसर हवामानात भिन्न उंचीवर त्या वाढू शकतात. खोडाच्या तुकड्यांनी नवीन लागवड होते. सामान्य शारीरिक लक्षणे मॅरेंटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात [⟶ सिटॅमिनी]. टोपीतांबूची चार ते दहा पाने कर्दळीसारखी मोठी (०·६–१·२ मी.) असून मूलक्षोडापासून [⟶ खोड] जमिनीवर झुबक्याने येतात. ती वरून फिकट हिरवी व खालून रुपेरी करडी असून कडा तरंगित असते. आवरक देठ सरळ उभा असतो. फुले त्रिभागी आतील तीन केसरदलांपैकी दोन वंध्य व एकावर बाजूस एक परागकोश असतो [⟶ फूल]. फळात तीन बीजे असतात. मूलक्षोडापासून जमिनीत कठीण व सूत्रल ग्रंथिक्षोडे तयार होतात. ती लहान बटाट्याप्रमाणे दिसतात व ती शिजवून खातात. द. अमेरिकेत रस्त्यावर विकली जातात. पेरादेनियात (श्रीलंका) लागवड आहे. अधश्चरांनी (मुनव्यांनी) व अपप्ररोहांनी (धावत्यांनी) नवीन लागवड करतात दहा महिन्यांत पीक येते. हेक्टरी ९८ क्विंटल उत्पादन मिळते.

 जमदाडे, ज. वि.

टोपीतांबू