फुक्सिया"फुक्सिया : शोभादायक फुलझाडांच्या [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एका वंशाचे शास्त्रीय नाव. मध्य व दक्षिण अमेरिका आणि न्यूझीलंड या प्रदेशांतून यातील वनस्पतींचा प्रथम इतरत्र प्रसार झाला. लेओनहार्ट फुक्स (१५०१- ६६) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांचे नाव या वंशास दिले असून याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ऑनेग्रेसीमध्ये (शिंगाडा कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. यात एकूण ७०-८० (जे. सी. विलिस यांच्या मते १००, तर ए. बी. रेंडेल यांच्या मते ६०) जाती असून त्यांपैकी ३-४ न्यूझीलंडमध्ये व इतर अमेरिकेच्या उष्ण भागातील आहेत. बहुतेक जाती क्षुपे (झुडपे), ओषधी [→ ओषधि] व लहान वृक्ष आहेत. त्यांची पाने साधी, समोरासमोर, प्रत्येक पेऱ्यावर दोन किंवा तीन फुले कक्षास्थ (बगलेत), एकाकी, चतुर्भागी, साध्या मंजरीवर किंवा परिमांजरीवर [→ पुष्पबंध] लोंबती राहतात. संदले व प्रदले भिन्न रंगांची आणि पुष्पमुकुट एकेरी किंवा दुहेरी असतो [→ फूल] त्यावर लाल व जांभळट रंगाच्या अनेक छटा असून काही भाग पांढरे असतात. मृदुफळात चार कप्पे असतात व ती खाद्य आहेत. भारतात डोंगरी भागात ही झाडे चांगली येतात सु. १,२४० मी. उंचीवर त्यांची वाढ चांगली होते व ती बहरतात. म्हैसूर व बंगलोर यांसारख्या ठिकाणच्या सौम्य हवामानातही ती चांगली वाढतात त्यांना थंड व ओलसर हवा मानवते. मैदानी भागात त्यांना मार्च-एप्रिलमध्ये फुले येतात. कलमे व फुटवे किंवा बिया लावून त्यांची नवीन लागवड करतात. कुंड्या, वाफे, लोंबत्या टोपल्या, खिडक्यांजवळचे वाफे यांत लावण्यास फुक्सियाच्या काही जाती फार चांगल्या आहेत. यांचे अनेक संकरित प्रकार मिळाले आहेत. बहुतेक संकरित जाती फु. फुलजेन्स, फु. कॉक्सीनियाफु. मॅगेलॅनिक यांपासून निर्माण केलेल्या आहेत. फु. एक्सकॉर्टिकॅटा या काष्ठमय झाडाच्या प्रत्येक भागाचा बाष्पस्‍नानात व प्रसूतीनंतर होणाऱ्या अंतर्गत रक्तस्त्रावावर न्यूझीलंडमध्ये उपयोग करतात. चिलीतील फु. मॅक्रोस्टेमा या झाडाच्या लाकडापासून काळा रंग काढतात. फु. मॅगेलॅनिकां यांच्या पानांचा व सालीचा उपयोग मूत्रल (लघवी साफ करणारी ) आणि ज्वरनाशी ह्या दृष्टींनी करतात.

कुलकर्णी, उ. के.