वनस्पतिवै ज्ञानिक संस्था आणि संघटना : जगात केवळ वनस्पतिविज्ञानाला वाहिलेल्या अनेक संस्था व संघटना आहेत. बहुतेक प्रगत राष्ट्रांत अशी एखादी संस्था वा संघटना अस्तित्वात आहे. वनस्पतिविज्ञानाबद्दल आस्था असणाऱ्या वैज्ञानिकांना एकत्र आणणे, या शास्त्रातील प्रचलित समस्या किंवा संशोधनपर विषय यांवर परिसंवाद वा चर्चासत्र घडवून आणणे, संशोधनाला वाहिलेले नियतकालिक चालविणे अशा स्वरूपाचे कार्य या संघटनांतर्फे चालू असते. संस्थांमध्ये वनस्पतिविज्ञानाच्या विविध शाखांतील संशोधनाची किंवा प्रशिक्षणाची सोय असून काही केवळ एखाद्या विशिष्ट शाखेच्या सखोल अभ्यासाला वा संशोधनाला वाहिलेल्या असतात. याशिवाय निरनिराळ्या कृषिविज्ञान संस्थांत (उदा., इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली) शेतीशी संबंधित असलेल्या वनस्पतिविज्ञानाच्या शाखांच्या (उदा., वनस्पतींचे शरीक्रियाविज्ञान, वनस्पतिरोगविज्ञान, आनुवंशिकी इ.) अभ्यासाची व संशोधनाची सोय असते. हीच गोष्ट वनसंशोधन संस्थांनाही (उदा., मध्यवर्ती वनसंशोधन संस्था व महाविद्यालय, डेहराडून) लागू आहे. काही ⇨शास्त्रीय उद्यानांतून (उदा. नॅशनल बोटॅनिक गार्डन, लखनौ) प्रशिक्षण, संशोधन, ग्रंथालय व ⇨ वनस्पतिसंग्रह यांची उत्तम व्यवस्था असते. प्रस्तुत नोंदीत काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व भारतीय वनस्पतिवैज्ञानिक संस्था व संघटना यांची माहिती दिलेली आहे.  

आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना : इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर प्लँट फिजिऑलॉजी : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील नॉर्थ राईड येथे असलेली ही संघटना कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अखत्यारीखाली १९५५मध्ये स्थापन झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर वनस्पति-शरीरक्रियाविज्ञानाच्या विकासाला चालना देणे, विशेषतः आंतरराष्ट्रीय परिषदा व परिसंवाद यांच्याद्वारे तसेच वनस्पति-शरीरक्रियविज्ञानविषयक माहिती प्रसिद्ध करून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना व वैज्ञानिक नियतकालीके यांच्यातील सहकार्याद्वारे प्रगत व प्रगतशील राष्ट्रांत सहयोग घडवून आणणे हा या संघटनेचा उद्देश आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ बायॉलॉजिकल सायन्सेस या संघटनेतील वनस्पति-शरीरक्रियावैज्ञानिकांचे ही संघटना प्रतिनिधित्व करते. वनस्पति-शरीरक्रियाविज्ञानाच्या ३७राष्ट्रीय संघटना व संबंधित आंतरराष्ट्रीय गट या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना न्युअल न्यूजलेटर हे नियतकालिक प्रसिद्ध करते.

इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर प्लँट टॅक्सॉनॉमी : नेदर्लंड्‌समधील उत्रेक्त येथे असलेली ही संघटना १९५० मध्ये स्थापन झाली. वनस्पतींच्या वर्गीकरणविज्ञानाच्या विकासाला चालना देणे आणि या कामात रुची असलेल्या व्यक्ति व संस्था यांत संपर्क येण्याकरिता प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. ८३राष्ट्रांतील व्यक्ती व संस्था या संघटनेच्या सदस्य आहेत. या संघटनेतर्फे Taxon (त्रैमासिक) व Regnum Vegetable वर्षातून दोन वेळा) ही  नियतकालिके प्रसिद्ध होतात.

इंटरनॅशनल बोटॅनिकल काँ ग्रेस : बर्लिन येथील इंटरनॅशनल काँग्रेस सेंटर येथे या संस्थेचे कार्यालय असून तिची स्थापना १८६४मध्ये झाली. वनस्पतींचे नामकरण, चयापचयात्मक व विकासात्मकवनस्पतिविज्ञान, आनुवंशिकी व वनस्पति-प्रजनन, संरचनात्मक वनस्पतिविज्ञान, वर्गीकरणात्मक व क्रमविकासात्मक वनस्पतिविज्ञान, पर्यावरणीय वनस्पतिविज्ञान या वनस्पतिविज्ञानाच्या विविध शाखांतील अलीकडील प्रगतीची वनस्पतिवैज्ञानिकांना माहिती देण्याचा या संस्थेचा उद्देश आहे.  

इंटरनॅशनल सोसायटी फॉर ट्रॉपिकल इकॉलॉजी : भारतात बनारस हिंदू विश्वविद्यालयात असलेल्या या संघटनेची स्थापना १९५६मध्ये झाली. उष्ण कटिबंधात मानवी उपयोगाच्या दृष्टीने ⇨परिस्थितिविज्ञानाचा विकास करणे व त्याला चालना देणे, उष्ण कटिबंधातीलपरिस्थितिवैज्ञानिकांना त्यांचे निष्कर्ष इतरांना कळविण्यास मदत करण्यासाठी नियतकालिक प्रसिद्ध करणे आणि उष्ण कटिबंधीय परिस्थितिविज्ञानाच्या सर्वसाधारण क्षेत्रातील ज्ञानस्थितीचा वेळोवेळी सारांश तयार करण्यासाठी परिसंवाद आयोजित करणे हे या संघटनेचे मुख्य हेतू आहेत. या संघटनेर्फे ट्रॉपिकल इकॉलॉजी हे नियतकालिक वर्षातून दोन वेळा प्रसिद्ध होते.  

इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्लँट मॉर्फॉलॉजिस्ट्‌स : दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतिविज्ञान विभागात असलेल्या या संघटनेची स्थापना १९५०मध्ये झालेली असून वनस्पति-आकारविज्ञानातील संशोधनास चालना देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. या संघटनेतर्फे फायटोमॉर्फालॉजी हे त्रैमासिक इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांत प्रसिद्ध करण्यात येते. 

परदेशी नियतकालिके : निरनिराळ्या देशांत वनस्पतिविज्ञानविषयक विविध नियतकालीके प्रसिद्ध होतात, त्यांपैकी इंग्रजीत उपलब्ध असलेल्या काही नियतकालिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : ॲक्टाबोटॅनिका (हंगेरी), ॲक्टा मायकॉलॉजिया (पोलंड), ॲक्टाफायटोपॅथॉलॉजिया (हंगेरी), अमेकिरन जर्नल ऑफ बॉटनी, ॲनल्स ऑफ बॉटनी (ब्रिटन), ऑर्नल्ड अर्बोरेटम जर्नल (अमेरिका), बोटॅनिकल गॅझेट (अमेरिका), बोटॅनिकल मॅगझिन (जपान), बोटॅनिकल रिव्ह्यू(अमेरिका), कॅनेडियन जर्मल ऑफ बॉटनी, कॅनेडियन जर्नल ऑफ प्लॅंट सायन्स, जर्ल ऑफ जॅपनीझ बॉटनी, लिनीअन सोसायटी बोटॅनिकल जर्नल (अमेरिका), पाकिस्तान जर्नल ऑफबॉटनी, फायटॉन(अर्जेटिना), सिस्टिमॅटिक बॉटनी (अमेरिका) वगैरे.  


 भारतीय वनस्पतिवैज्ञानिक संस्था व संघटना : भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था : कलकत्ता येथील ही संस्था १८९०मध्ये स्थापन झाली. भारतात या संस्थेची सहा प्रादेशिक मंडळे आहेत. भारतातील पादपजातविषयक पुस्तिका, ग्रंथ व नियतकालिके या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येतात. [⟶ भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था].  

बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी : लखनौ येथील ही⇨ पुरावनस्पतिविज्ञान विषयक संस्था १९४६मध्ये स्थापन झाली आहे. या संस्थेत जीवश्मरूप (शिळारूप अवशेष) वनस्पतीसंबंधीच्या मुलभूत व अनुप्रयुक्त बाबींविषयी आणि त्यांचा जीवोत्पत्ती, क्रमविकासी दुवे, जीवस्तरविज्ञान (गाळाच्या खडकांच्या स्तरांचा पुराजीववैज्ञानिक अभ्यास), जीवाश्मी वनस्पतींचा संग्रह वगैरे संबंधित विषयांवर संशोधन करण्यात येते. या संस्थेतर्फे पॅलिओबोटॅनिस्ट हे नियतकालिक वर्षातून तीन वेळा प्रकाशित करण्यात येते.  

द इंडियन बोटॅनिकल सोसायटी : या संघटनेचे कार्यालय बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या वनस्पतिविज्ञान विभागात असून तिची स्थापना १९२० मध्ये झाली. भारतातील वनस्पतिवैज्ञानिकांना एकत्र आणून वनस्पतिविज्ञानातील समस्या व संशोधन यांबाबत चर्चा व परिसंवाद घडवून आणणे, संशोधनास चालना देणे, वनस्पतिविज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस ‘बिरबल सहानी सुवर्णपदक’ प्रदान करणे हे या संघटनेचे कार्यक्षेत्र आहे. या संघटनेतर्फे जर्नल ऑफ द इंडियन बोटॅनिकल सोसायटी या त्रैमासिकाचे व कधीकधी परिसंवाद पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येते. 

पॅलिनॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया : लखनौ येथील नॅशनल बोटॅनिक गार्डन्स येथे या संस्थेचे कार्यालय असून तिची स्थापना १९६५मध्ये झाली. परागविज्ञानाच्या अभ्यासकांना एकत्र आणणे, परिसंवाद, चर्चासत्रे व वार्षिक व्याख्याने आयोजित करणे आणि दर तीन वर्षांनी इंडियन पॅलिनॉलॉजिकल कॉन्फरन्स भरविणे यांचा या संघटनेच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. या संघटनेतर्फे जर्नल ऑफ पॅलिनॉलॉजी हे नियतकालिक वर्षातून दोन वेळा प्रसिद्ध होते.  

इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी : नवी दिल्ली येथील या संघटनेची स्थापना १९४७मध्ये झाली. व्हायरसविज्ञान, सूक्ष्मजंतुविज्ञान, कवकविज्ञान, सूत्रकृमिविज्ञान व वनस्पतिरोगविज्ञान या विषयांतील संशोधनास व प्रगतीस हातभार लावणे, परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करणे हे कार्य या संघटनेतर्फे करण्यात येते. इंडियन फायटोपॅथॉलॉज हे त्रैमासिक ही संघटना प्रकाशित करते.  

इंडियन प्लॅंट फिजिऑलॉजिक सोसायटी : नवी दिल्ली येथील या संघटनेतर्फे भारतातील वनस्पति-शरीरक्रियाविज्ञानाच्या अभ्यासकांना व संशोधकांना एकत्र आणणे आणि संशोधनास चालना देणे हे कार्य करण्यात येते. इंडियन जर्नल ऑफ प्लट फिजिऑलॉजी हे त्रैमासिक या संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.  

ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट : ही संस्था केरळातील पाचा-पालोद येथे १९७९मध्ये स्थापन झाली. वनस्पतिवैज्ञानिक, उद्यानवैज्ञानिक आणि वनस्पति-जैवतंत्रविद्या संशोधनासाठी शास्त्रीय उद्यान, वृक्षोद्यान व प्रयोगशाळा उभारणे, दुर्मिळ व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या जातींचे रक्षण आणि आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पतींच्या विकासाच्या अभ्यासास संशोधनास चालना देणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत. या संस्थेतर्फे ॲन्युअल रिपोर्ट, इंडेक्शन सेमिनम, ट्रॉपगार्डन न्यूज ही नियतकालिके तसेच माहितीपर पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येतात.  

भारतात वरील संस्था व संघटना प्रसिद्ध करीत असलेल्या नियतकालिकांखेरीज प्रसिद्ध होणाऱ्या वनस्पतिवैज्ञानिक नियतकालिकांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत. ॲक्टा बोटॅनिका इंडिका (वर्षातून दोन वेळा मीरत), बोटॅनिका (वर्षातून दोनवेळा दिल्ली), बोटॅनिक (त्रैमासिक, नागपूर), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लट्‌स न्यूजलेटर (त्रैमासिक लखनौ), करंट लिटरेचर इप्लट सायन्स (मासिक लखनौं), इंडियन जर्नल ऑफ बॉटनी (वर्षातून दोन वेळा हैदराबाद),इंडियन जर्नल ऑफ जेनेटिक्स अँड प्लॅंट बिडिंग (वर्षातून तीन वेळा नवी दिल्ली), न्यू बोटॅनिस्ट (त्रैमासिक, नवी दिल्ली), फायकॉस (वर्षातून दोन वेळा, नवी दिल्ली)  

पहा : भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था राष्ट्रीय प्रयोगशाळा.  

ज्ञानसागर, वि. रा. भदे, व. ग.