भोती: (धैवान हिं. दही-पळस, धेमान क. ताडंग लॅ. कॉर्डिया मॅक्लिओडी कुल-बोरॅजिनेसी). ⇨भोकराच्या वंशातील सु. ९-१२ मी. उंच वाढणाऱ्या या मध्यम आकाराच्या पानझडी वृक्षाचा प्रसार मध्य प्रदेश, छोटा नागपूर, उ. कारवार, कोकण, मावळ, कर्नाटक व दक्षिणेकडील रुक्ष जिल्ह्यांत झालेला आहे. कोवळ्या भागांवर दाट लव असते. साल गुळगुळीत, मऊ, पांढरी व त्वक्षीय (बुचासारख्या पदार्थाने भरलेली) पाने साधी, मध्यम आकाराची, गोलसर, एकांतरित (एकाआड एक) किंवा अल्पसंमुख (काहीशी समोरासमोर), वरच्या बाजूस खरबरीत व लांब देठाची असतात. फुले बहुयुतिक, लहान, पांढरी, कक्षास्थ (पानांच्या बगलेत) किंवा अग्रस्थ (फांद्यांच्या टोकांस) वल्लरीत मार्च-एप्रिलमध्ये येतात. केसरदले ६ पुं-पुष्पातील किंजपुट अविकसित व वंध्य असतो [⟶ फूल], फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), लहान (१.३-२ सेंमी. लांब), लंबगोल, पेल्यासारख्या सतत संवर्तावर आधारलेले व अखाद्य असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बोरॅजिनेसीत (भोकर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. साल काविळीवर देतात. लाकूड गर्द तपकिरी, मध्यम जड, फार कठीण, कणखर व टिकाऊ असते. ते गाड्या, कुऱ्हाडींचे दांडे, शेतीची अवजारे, सजावटी सामान, मासे पकडण्याच्या काठ्या, कोरीव व कातीव काम, कपाटे, चित्रांच्या चौकटी इत्यादींस चांगले असते. पाने व कोवळे प्ररोह (कोंब) जनावरांना चारण्यास उपयुक्त असतात.

जमदाडे, ज. वि.