फापटी: (पपली हिं. दमनपापडा गु. पर्पट, खेतपापडा क. कळ्‌ळसबत्रसिगे सं. पर्पट, क्षेत्रपर्पट लॅ. ओल्डेन्लॅन्डिया कॉरिम्बोजा हेडिओटिसकॉरिम्बोजा कुल-रूबिएसी). ही सु. ३८ सेंमी. उंच, लहान, वर्षायू (एका हंगामात पूर्ण होणारी) व पसरट फांद्याची ओषधीय [→ ओषधि] वनस्पती श्रीलंका, फिलीपीन्स, जावा, भारत, आफ्रिकेतील व अमेरिकेतील उष्ण भाग इ. ठिकाणी विशेषतः पावसाळ्यात तणासारखी वाढलेली आढळते. हिच्या ओल्डेन्लॅन्डिया या वंशात सु. १०० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त दहा जाती आढळतात. फापटी भारतात सर्वत्र आढळते. हिची पाने साधी, लहान देठाची, अरूंद, लांबट, टोकदार व समोरासमोर असून उपपर्णे पापुद्र्यासारखी, रोमश (राठ केश असलेली) व छेदित (टोकांस सपाट) असतात, त्यांच्या बगलेत पांढरी, फार लहान सच्छद २-३ फुले [→ फूल]किंवा क्वचित ४ फुले वल्लरीसारख्या फुलोऱ्यात [→ पुष्पबंध] सप्टेंबर ते नोव्हेंबरात येतात सामान्य संरचना कदंब कुलात[→ रूबिएसी] वर्णिल्याप्रमाणे असते. बोंडे (फळे) लहान, गोलसर व टोकांशी सपाट, काहीशी द्विभक्त असून बीज कोनीय व तपकीरी असते. ही वनस्पती शीतकर (थंडावा देणारी), ज्वरनाशी व दीपक (भूक वाढविणारी) असून तिचा काढा कावीळ, यकृतविकार, कृमी, जठरदाह (पोटातील आग) व मज्जाविकाराने आलेली ग्लानी यांवर देतात. तापात हातापायांच्या तळव्यांच्या होणाऱ्या जळजळीवर ह्या वनस्पतीचा रस लावतात. फिलीपीन्समध्ये दातदुखीवर चुळा भरण्यास तिचा काढा वापरतात.

 

फापटी : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) फळ.परिपाठ: (सं. पर्पट). ही फापटीच्या वंशातील दुसरी जाती (. बायफ्लोराहे. बायफ्लोरा) ईशान्य भारतात व कर्नाटक किनाऱ्यावर आढळते. हिच्या फांद्या काहीशी पंखधारी (धारेवर पातळ पंखासारखी उपांगे असलेल्या ) व चौधारी असून हिचे औषधी गुणधर्म सर्वसाधारणपणे फापटीप्रमाणेच आहेत. . हर्बेशिया ह्या तिसऱ्या जातीलाही परिपाठ म्हटल्याचे आढळते. भारतात ही डोंगराळ भागात १,६५० मी. उंचीपर्यंत आढळते. हत्ती रोग व शरीरवेदना यांवर ती तेलात उकळून ते तेल लावतात. दमा व क्षयरोग यांमध्ये पाने कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी) म्हणून वापरतात. ही वनस्पती कडू, पौष्टीक व ज्वरनाशी असून हिवतापावर व गोवरावर तिचा काढा देतात तिचे चूर्ण मधाबरोबर संधिवातातील ज्वर व सूज यांवर घेतात. मुळांची साल लाल रंग मिळविण्यास वापरतात. कधीकधी फापटीचा उल्लेखही परिपाठ या नावाने केला जातो.

 

 

 

 

 

पहा: रूबिएसी.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India Raw Materials. Vol. V. New Delhi, 1959.

          2. Dutta. S. C. A Handbook of Systematic Botany, Bombay, 1965.

 

हर्डीकर, कमला श्री. परांडेकर, शं. आ.