बिक्सेसी : (केसरी कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एकच वंश असलेले एक लहान कुल. ए. एंग्लर व के. प्रांट्‌ल यांच्या वर्गीकरण पद्धतीत याचा समावेश आर्किक्लॅमिडी या उपवर्गातील परायटेलीझ गणात (व सिस्टिनी या उपगणात) केलेला असून जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांनीही (थॅलॅमिफ्लोरी श्रेणीत) त्याच गणात केला आहे. सिस्टेसी व बिक्सेसी यांचेही आप्तभाव आहेत. ए. एल्. तख्तजान यांनी याचा व्हायोलेलीझ या गणात समावेश केलेला आहे व ⇨फ्लॅकोर्टिएसी वा अत्रुण कुलाबरोबर याचे आप्तभाव दर्शविले आहेत. ⇨जे. हचिन्सन यांनी बिक्सेलीझ ह्या गणात या एकाच कुलाचा अंतर्भाव केला आहे. ए. बी. रेंडेल यांनी परायटेलीझ गणात नऊ कुले घातली असून बिक्सेसी हे त्यांपैकी एक आहे. ह्या कुलात पूर्वी चार वंशांचा समावेश केला जात असे परंतु हल्ली फक्त एकच वंश (बिक्सा) त्यात ठेवला असून बाकीचे तीन कॉक्लोस्पर्मेसी [⟶ गणेरी] या नव्या स्वतंत्र कुलात घातले आहेत. या दोन्ही कुलांचे आपसात आप्तभाव आहेत. बिक्सेसीमध्ये केसरी (बिक्सा ओरेलॅना) ही एकच जाती (जे. सी. विलिस यांच्या मते तीन ते चार जाती) असून ती मूळची उष्ण कटिबंधीय अमेरिकातील आहे. तथापि उष्ण कटिबंधात ती इतरत्र अनेक ठिकाणी लागवडीत आहे, कारण ती उपयुक्त आहे. वनस्पतीत लाल रस असतो. बियांवरचा नारिंगी रंग तूप, लोणी, चीज, मिठाई इत्यादींकरिता वापरतात. भारतात कर्नाटकामध्ये केसरीची लागवड केली आहे, शिवाय त्रावणकोर, कॉरोमंडल, मलबार, मुंबई, बंगाल व आसाम या भागांतही अनेक वृक्ष आढळतात. भारतातील दुग्ध व्यवसायात आवश्यक तितके रंगद्रव्य अमेरिकेतून आयात केले जाते या कुलाची व पर्यायाने बिक्सेलीझ गणाची सामान्य शारीरिक लक्षणे केसरी या वनस्पतीच्या वर्णनात दिली आहेत.पहा : केसरी.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965,

2. Rendle, A. B. Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.