रुद्राक्षी : (बांदोग इं. बॅस्टर्ड सीडर , लॅ ग्वाझुमा उल्मिफोलिया, ग्वा. टोमेंटोझा कुल-स्टर्क्युलिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा लहान किंवा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष मूळचा उष्ण कटिबंधीय अमेरिकेतील असून त्याच्या ग्लाझुमा प्रजातीत एकूण ४-५ जाती आहेत. भारतात (प.बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र इ. भागांत) उद्यानांतून रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता व सावलीकरिता लावलेला आढळतो. कित्येक ठिकाणी हा जंगली अवस्थेत दिसतो. ह्याला अनेक पसरट रुद्राक्षी : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) किंजपुटाचा आडवा छेद, (४) फळे.फांद्या असतात व खोडावर तपकिरी खरबरीत साल असते. याची पाने साधी, लवदार, एकाआड एक, मध्यम आकाराची (७–११×५ सेंमी.), आयत, कुंतसम (भाल्यासारखी), प्रकुंचित (लांबट टोकाची), दातेरी किनारीची आणि तळाशी हृदयाकृती व तिरपी असतात. याला जुलै-ऑगस्टमध्ये पानांच्या बगलेतील वा फांद्यांच्या टोकांवरील शाखायुक्त फुलोर्यातवर [वल्लरीय परिमंजरावर ⟶ पुष्पबंध] असंख्य, लहान, पंचभागी, पिवळी किंवा गडद जांभळी फुले येतात त्यातील दहा केसरदलांची एक नळी बनते त्या नळीचा वरचा भाग पाच वंध्य व पाच जननक्षम केसरदलांत विभागलेला असतो [⟶ फूल]. फळ (बोंड) कठीण, न तडकणारे, साधारण लांबट गोल, २·५ सेंमी. व्यासाचे, बारीक व बोथाट काट्यांचे, काळे व अनेक बीजी असते. बी बारीक, लंबगोल व कोरडे असते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨स्टर्क्युलिएसी अथवा मुचकुंद कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

फळात गोड, बुळबुळीत व खाद्य मगज (गर) असतो. तो स्तंभक (आकुंचन करणाऱ्या) व वेदनाहारक असून अधिक खाल्ल्यास अतिसार होतो. पाला गुरांना खाऊ घालतात. अंतर्सालीचा काढा उसाचा रस शुद्ध करण्यास वेस्ट इंडीजमध्ये वापरतात श्वासनलिकादाहावर फळाचा वापर मॉरिशसमध्ये कफोत्सारक (कफ काढून टाकणारा) म्हणून करतात. जावामध्ये भाजलेल्या बिया स्तंभक समजून पोटाच्या तक्रारीवर देतात. पानांचा अर्क मेदवृद्धी कमी करण्यास वापरतात. साल पोंष्टित व शामक असते. कोवळ्या फांद्यांपासून काढलेल्या धाग्यांपासून दोर व दोऱ्या करतात. लाकूड तपकिरी किंवा पिवळट, बळकट, काहीसे हलके असून त्याला घासून व रंधून उत्तम झिलाई करता येते. त्याचा उपयोग खोके, तावदाने, सजावटी सामान आणि पिपे व तत्सम वस्तूंकरिता करतात तसेच त्याचा कोळसाही करतात. या वृक्षाची नवीन लागवड बिया व काट कलमे लावून करतात.

पराडकर, सिंधू अ.